Homeवैशिष्ट्येब्रिटिश कालीन नाशिक जिल्ह्यातील वन्यप्राणी व चित्ते

ब्रिटिश कालीन नाशिक जिल्ह्यातील वन्यप्राणी व चित्ते

ब्रिटिश कालीन नाशिक जिल्ह्यातील वन्यप्राणी व चित्ते.

नाशिक जिल्ह्यातील चित्ते ऐकून आश्चर्य वाटलं ना ? नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात चित्ते होते जे नागरिकांबरोबर सरकारी अधिकारीही विसरून गेलेले आहेत. सध्याच्या सरकारने भारतातून अस्तंगत झालेला चित्ता परत आणण्याचे काम सुरू केले आहे व उद्या दिनांक 17 सप्टेंबरला नामीबियातून भारतामध्ये आफ्रिकन चित्ते येणार आहेत.

भारतातही मोठ्या प्रमाणात चित्ते असल्याच्या नोंदी पुराणकाळापासून आहेत. अकबराच्या दरबारी हजारहून जास्ती चित्ते होते ज्यांचा उपयोग हरीण काळवीट यांची शिकार करण्यासाठी होत असे. त्याचप्रमाणे विविध राजे महाराजे हेही शिकारीसाठी चित्ते पाळत असत. कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांचेकडेही पाळलेले चित्ते होते. मात्र पाळीव चित्ते हे कधीही प्रजनन करीत नसत .त्यामुळे हजारोंनी चित्ते पाळूनही त्यांना कधीही पिल्ले झाल्याच्या नोंदी आढळत नाहीत. अकबराच्या दरबारात असलेल्या हजार दीड हजार चित्त्यांपैकी एकाच मादीला एकदाच पिल्लू झाल्याची नोंद आढळते. बंदीवासात प्रजनन न करण्याच्या सवयीमुळे भारतीय चित्ते वेगाने लोप पावत गेले. हे बंदिवासात प्रजनन का करत नाहीत याचा त्याकाळी कधीही अभ्यास झाला नाही हे दुर्दैवच म्हणायचे .कारण भारतीय चित्ता त्याच्या राहण्या खाण्याच्या सवयी तो कोणत्या वातावरणाशी जुळवून घ्यायचा याची आपण आता फक्त कल्पनाच करू शकतो.

वेगाने पळणारा मात्र लवकर दमणारा असा हा मांसाहारी प्राणी संस्थानिकांनी व इंग्रजांनी अक्षरशः कुत्र्यासारखा मारला. घोड्याचा वेग चित्त्यापेक्षा कमी असतो मात्र चित्ता काही मीटर पळल्यानंतर हळूहळू दमायला लागतो, याचा फायदा घेत इंग्रज अधिकाऱ्यांनी फक्त लांब सोट्याने डोक्यात घाव घालून एका दिवसात 20 20 चित्ते मारल्याच्या नोंदी आढळतात. भारतीय व आफ्रिकन चित्ते एकाच कुळातील असले तरी त्यांच्या शारीरिक ठेवणीमध्ये काही फरक आहेतच. आफ्रिकन व एशियन चित्ते जवळपास 67 हजार वर्षांपूर्वी वेगवेगळे झाले व त्यांच्या दक्षिण आफ्रिकन चित्ते, उत्तरे आफ्रिकेतील चित्ते, उत्तर पश्चिम आफ्रिकेतील चित्ते व अतिशय दुर्मिळ असे भारतीय चित्ते असे वर्गीकरण आढळते .भारतीय चित्ते हे आफ्रिकन चित्त्यांपेक्षा आकाराने लहान, बारीक व लांबट मान असलेले, बारीक फर असलेले व बारीक पाय असलेले होते. आफ्रिकन चित्त्यांपेक्षाही हे जास्ती जलद पळणारे असावेत .

त्यातल्या त्यात इराणमध्ये इराण व पाकिस्तान सरहद्दीवर शिल्लक असलेले शेवटचे काही एशियाई चित्ते हे भारतीय चित्त्याचे खरे नातलग होत. भारताने इराण सरकारकडून अशी चित्ते मागविले होते मात्र इराण सरकारने राजकीय घडामोडी व इतर बाबींना लक्षात घेत भारताला जिवंत चित्ते किंवा त्यांचे डीएनए अथवा रक्त देण्यास मनाई केल्याने सध्याच्या सरकारने आफ्रिकेतून चित्ते आणले आहेत.

इंग्रज कालीन नाशिकची जंगले

पेशवाई अठराशे अठरा मध्ये संपल्यानंतर इंग्रजांनी हळूहळू संपूर्ण भारत ताब्यात घेतला व आपल्या पद्धतीने प्रशासकीय कामे करण्यास सुरुवात केली. यामध्ये महसूल वाढवा म्हणून जास्तीत जास्त जमीन ही शेतीखाली आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले. तत्कालीन अधिकाऱ्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे पेशवाईनंतरच्या बराच काळापर्यंत त्र्यंबक इगतपुरी नाशिकच्या आजूबाजूचा परिसर पेठ येथे अतिशय गर्द झाडी होती तर सर्वच डोंगर रांगांचे पायथ्या म्हणजे त्रंबक इगतपुरी कळवण सटाणा चांदवड अंकई टंकाई विभागातही पायथ्याला विपुल झाडे होते असे उल्लेख आढळतात. हा भाग सोडता बहुतांश नाशिक जिल्हा हा कुरणांसाठी ही प्रसिद्ध होता कारण 1883 च्या अहवालानुसार मुंबईला कापूस घेऊन जाणाऱ्या बैलगाड्या ह्या जवळपास एक लाख ऐंशी हजार बैल वापरत असत व ही सर्व बैल नाशिक मधील कुरणांमधून चरून जात असत अशा नोंदी सापडतात.

महसूल वाढीसाठी शेतीला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केल्यानंतर मोठ्या प्रमाणात वनांची हानी व्हायला सुरुवात झाली त्यामुळे या दाट जंगलांमध्ये राहणारे वाघ सैर भैर झाले व इतःस्तः फिरु लागले. अमर्याद वृक्षतोड व शेतीमुळे हरीण काळवीट सारखी जनावरही मारले जाऊ लागली व वाघांना भक्ष न राहिल्याने ते भक्ष शोधण्यासाठी लांब लांब फिरू लागले असे उल्लेख 1879 मधे सापडतात. याच सुमारास शेतीसाठी कुरणे ही मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. हे सर्व थांबण्यासाठी ब्रिटिश सरकारने सर्वच भारतामधील स्थिती काबुत आणण्यासाठी 1878 -1879 साली वन विभागाच्या जागा नक्की केल्या व त्यांना सर्वे नंबर दिले. यानंतर मात्र वनांची अमर्याद तोड थांबण्यात येऊन वन्य प्राण्यांना स्थैर्य मिळाल्याचे दिसते. 1879 नंतर नाशिक जिल्ह्यातील वनांनी चांगला आकार घेतल्याचे दिसते.

नाशिक जिल्ह्यातील इतर प्राणी:-

1) वाघ आणि बिबळे:-

1879 च्या आधी पाच वर्षात या भागात 13 वाघ मारल्याचे आढळते , मात्र तेच 1926 च्या नोंदणी नुसार 1915 साली अकरा वाघ मारल्याचे दिसते. नाशिक जिल्ह्यामध्ये शेवटचा वाघ दुर्दैवाने 1968 साली त्रंबकेश्वर येथे मारला गेला. त्यानंतर फिरतीवर असणारे वाघ काही ठिकाणी दिसल्याच्या नोंदी आहेत. नाशिक जिल्ह्याचा स्वतःचा वाघ मात्र त्याच वर्षी संपला.

बिबळ्यांबद्दल बोलायचे झाले तर 1875 ते 1879 मध्ये 156 एवढ्या मोठ्या संख्येने तर 1912 मध्ये 32 ,1913 मध्ये 42, 1914 मध्ये 23 ,1915 मध्ये 21, 1916 मध्ये 20 , 1917 मध्ये 12 व 1918 मध्ये 17 बिबळे मारलेले दिसतात. एकंदरीतच नाशिक जिल्ह्याचे पर्यावरण हे बिबट्यांसाठी पोषक दिसते त्यामुळे संपूर्ण भारतात अजूनही बिबटे सापडायचे व अपघाताने मरायचे सर्वात जास्त प्रमाण नाशिक जिल्ह्यामध्येच दिसते.

इतर मांसभक्षी प्राणी :-

1926 सालच्या अहवालामधे 1913 साली दहा लांडगे मारल्याचे ही दिसते. तर 1916 साली प्रचंड संख्येने 226 साप व अजगर मारले गेल्याची नोंद आहे. याच अहवालामध्ये बागलाण व पेठ तालुक्यात भारतीय अस्वले असल्याची व त्यांनी माणसांना मारल्याची ही नोंद आहे.अस्वल या प्राण्याचा समावेश अत्यंत घातक प्राण्यात केलेला दिसतो. व याच्या हल्ल्यांबाबत विस्तृतपणे लिहून ठेवलेले दिसते .तसेच पेठ भागात जंगली कुत्रे म्हणजे कोळसूद असल्याचीही नोंद आहे. बागलाण व नांदगाव भागात लांडगे भरपूर प्रमाणात असल्याच्या नोंदी यावेळेस दिसतात. तरस हा प्राणी मात्र सर्वच आढळणारा दिसतो. कोल्हे खोकड मुंगूस रान मांजर असे छोटे मासभक्षी प्राणी सर्वच तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होते अशीही नोंद सापडते.

तृणभक्षी प्राणी

नांदगाव भागात सांबर जे 1849 सालापर्यंत सर्वत्र दिसायचे ते दुर्मिळ झाल्याच्या नोंदी 1879 मध्ये दिसतात. नंतर मात्र ते निजामाच्या भागातून म्हणजे औरंगाबाद मधून नांदगाव मध्ये येत असल्याच्या नोंदी आहेत. नाशिक जिल्ह्यातील सांबर त्यावेळेसच संपले. सुरगाणा संस्थानात मात्र भरपूर सांबर त्यावेळेसच असल्याचे नोंदी आहेत. मात्र ब्रिटिश काळात सुरगाणा हे स्वतंत्र संस्थान होते. त्याचा नाशिक मध्ये समावेश नव्हता.

नीलगाई त्यावेळेसच हळूहळू कमी घेत होत गेलेला दिसतात इगतपुरी बेळगाव ढगा भागामध्ये निलगाई दोन-चार दोन-चार प्रमाणात दिसतात असे या नोंदीत म्हणलेले आहे. तसेच चितळ हे फार कमी प्रमाणात उपलब्ध असून दिंडोरी मध्ये शेवटचा पन्नास चितळांचा कळप आहे असे नोंदी सांगतात. हरिण मात्र दिंडोरी सिन्नर निफाड येवला वगैरे सर्वच भागात भरपूर प्रमाणात दिसतात असे 1879 च्या नोंदी सांगतात. चिंकारा हे नांदगाव बागलाण भागात. चौशिंगी हरण भेकर हे डोंगराळ भागात व वणी , सप्तशृंगी विभागामध्ये, बार्किंग डियर म्हणजे कुत्र्याच्या आवाजात भुंकणारे छोटे हरीण धारडीया हे पेठ भागात थोड्या प्रमाणात सापडते याचेच अजून एक छोटी जात जी यापेक्षा लहान असते हे 1859 मधेच दुर्मिळ झालेले होते. माउस डिअर म्हणजे आहेडा हे फक्त पेठ मधील अतिशय दाट जंगलात आढळते.

रानडुक्कर,कोल्हे, वानरे ,माकडे, खोकड ,मुंगूस हेही या भागात मोठ्या प्रमाणात होते मोठ्या पक्षांमध्ये माळढोक पक्षी मालेगाव निफाड सोबतच इतर भागातही लहान मोठ्या प्रमाणात आढळतो अशाही नोंदी आहेत.

नासिकचा चित्ता

चित्ता हा प्राणी सहसा खुरटे जंगल व कुरणे या भागात आढळतो 1879 च्या नोंदीनुसार नाशिक मधील मालेगाव व नांदगाव भागामध्ये चित्ते असल्याच्या नोंदी आहेत तसेच यांची शिकारही होत असल्याच्या नोंदी आढळतात. मनुष्य वस्ती वाढत गेल्यानंतर शेतीसाठी सर्वप्रथम कुरणांचा बळी गेला.पूर्वी वन विभागामध्ये दाट, खुरट्या जंगलांसाठी व कुरणांसाठी विविध वर्किंग सर्कल असायचे. यामध्ये दाट वनांबरोबर कुरणांनाही महत्व दिले गेलेले होते. कारण कुरणांमध्ये राहणारे वन्यजीव हे वेगळ्या प्रकारचे तर दाट जंगलातील वन्यजीव वेगळे आढळतात. मात्र महसूल वाढवण्यासाठी शेतीला उत्तेजना देण्याचा थेट परिणाम कुरणांवर झाल्याने मोकळ्या मैदानात भक्ष पकडू शकणारे चित्ते हे झपाट्याने कमी होत गेले. त्यांचे भक्ष म्हणजे विविध जातीचे हरणेही त्याच काळात अतिप्रचंड शिकारीमुळे कमी कमी होत गेली. त्यातच चित्त्यांची पण प्रचंड प्रमाणात शिकार झाल्याने 1948 ते 1952 च्या दरम्यान नासिक जिल्ह्यातील शेवटचा चित्ता मारला गेल्याच्या नोंदी आहेत.

चार वर्षांपूर्वी सुरगाणा भागात फेरफटका मारत असताना जवळपास 90 वर्षाचा आदिवासी अत्यंत वृद्ध इसम भेटला होता ज्याने लहानपणी वाघ, बिबट ,रानमांजर याबरोबर चित्ता बघितल्याचेही सांगितले होते व चित्त्याच्या डोळ्याखाली दोन ठळक रेषाही त्याला पूर्णपणे आठवतं होत्या. म्हणजेच सुरगाणा संस्थानाच्या काही भागातही चित्ते होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

भारत सरकार पुन्हा एकदा चित्ता भारतामध्ये आणत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मात्र चित्त्याला पाहिजे तसे मोकळे खुरट्या झुडपांचे जंगल ज्यास ब्रिटिश बाभुळवने म्हणत असत व कुरणे आपल्याकडे किती शिल्लक आहेत? कारण वन अधिकारी ,महसूल अधिकारी यांनी कुरणांकडे कधीही गांभीर्याने पाहिले नाही ,जेवढे दाट झाडीच्या जंगलांना महत्त्व दिले गेले. उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये ही चित्ते आणायचेच म्हणले तर त्यांना पोषक असे वातावरण सध्यातरी आपल्याकडे नाही असे अत्यंत खेदाने म्हणावे लागेल. तरी भारतात चित्ते परत आल्याचा आनंद आपण सर्वांनीच साजरा केला पाहिजे.

धन्यवाद।
अंबरीश मोरे
नाशिक
दिनांक 16 सप्टेंबर 2022

कृपया लेख माझ्या नावाने पुढे पाठवू शकता …

हा लेख सोशल मीडिया वरून साभार

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular