"माझिया प्रियाला प्रीत कळेना,
अनुराग त्याचा माझा, हाय रे जुळेना."
उमाकांत काणेकर या प्रतिभावंत कवीनी लिहिलेलं हे सुंदर गाणं ऐकताना माझ्या विचारांच्या जलप्रवाहत खूप प्रश्नरुपी तरंग उठू लागले.खरे पाहिल्यास प्रेमाच्या अनेक स्वरूपांपैकी प्रियकर प्रेयसीचे हुळुवार, तरल व उत्कट प्रेमरूप म्हणजे प्रेमाच्या रुपाची सर्वोत्तम पर्वणीच म्हणावी लागेल कारण ह्या प्रेमाच्या रूपाला अनादी काळापासून ते आजमितीस, खेड्यापाड्यातील गल्लीबोळा पासून ते मोठ्या शहरातील नामांकित एरियापर्यंत तसेच विकसनशील देश ते अगदी विकसित देशात सुद्धा आणि सर्व जाती धर्मात देखील प्रेमाचा हा कुंभमेळा रोजच्या रोज भरतो आहे. मग तरीही का बरे असे म्हटले जाते की माझिया प्रियाला प्रीत कळेना? खरोखर प्रियकराला किंवा प्रेयसीला सुरुवातीच्या एकमेकांविषयीच्या प्रेम भावना कशा प्रकारे कळत असतील ?मग पाहुयात तर अशी कोणती माध्यम आहेत जी ह्या नात्यातील भावना फुलवतात, तिला बहर आणतात आणि प्रेमाची उत्कट भावना यशाच्या शिखरावर कशी नेऊन ठेवतात? कसा होतो हा सारा ये ह्रदयीचे ते ह्रदयीचा प्रवास.
प्रेम भावना हृदयातून निघते तिथे अनेक तारा झेडल्या जाऊन प्रेमाचे मधुर झंकार उठू लागतात.म्हणूनच शांताराम नांदगावकरानी हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे असे म्हटले असेल बहुदा आणि ही भावना पहिल्यांदा प्रेमिकांच्याही नकळत व्यक्त केली जाते ती डोळ्यातून म्हणजेच प्रेमाचे पाहिले माध्यम ठरतात ते डोळे एका हिंदी शायरीत म्हणाल्यानुसार,
इश्क पहली नजर का मसला है..
इसमे पहले से कोई तैयारी नही होती !
त्यानुसार भावनांची अदान प्रदान करण्याची अतिशय उत्तम कामगिरी डोळे पार पाडतात एकमेकांना वाटणारे आकर्षण त्यातून प्रकट होऊ लागते आणि इथूनच ह्या प्रेम कहाणीची सुरुवात होते.बोलणं होत नसत पण नजरेची मुक भाषा दोघांना समजायला लागते. कवी संजय निकुंभ म्हणूनच म्हणतात.
” जाणिवा साऱ्या मनीच्या
डोळ्यात दिसायला लागतात
भावना त्या प्रितीच्या
काळजाला कळायला लागतात.
सुरुवात तर झालेली असते पण बोलून व्यक्त झाल्याशिवाय होकार नकार कळणार कसा? अंतरीची हुरहूर एकमेकांना पोहचवणे अत्यंत गरजेचे होऊन बसते.प्रेम प्रकरण अगदी पुराणकाळापासूनच चालू आहेत त्यावेळी कबुतर पक्षी हा संदेश वाहक म्हणून काम करीत असे त्याच्या पायाना प्रेमपत्र बांधून प्रियकर प्रेयसीला मनीचे गूज लिहून पाठवित असतं.त्यामुळे त्याकाळी कबुतर पक्षी हा प्रेमाचं माध्यम ठरत होता.अहो सुरेश भटानी तर सुराना देखील प्रेमाचे माध्यम व्हायला सांगितले आहे.ते म्हणतात.
हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोचवा.
आहे की नाही प्रेमात ताकद आणि गम्मत.
नंतरच्या काळात शाळा,महाविद्यालयातून प्रेम प्रकरण सुरू झाली आणि त्यासाठी प्रेमाचे माध्यम होऊ लागले आपले मित्र मैत्रिणी कारण ती किंवा तो, तिचा किंवा त्याचा मित्र किंवा मैत्रिण असते मग मित्राच्या मैत्रिणीच्या मदती शिवाय प्रेमाचं घोड गंगेत न्हाणे शक्यच नसतं.आपल्या कामाच्या ठिकाणी देखील प्रेम फुलते ते याच मित्र किंवा मैत्रीणीमुळेच म्हणूनच मित्र मैत्रिणी असतातच म्हणे या कामासाठीच अतिशय प्रामाणिकपणे प्रेम प्रकरण जुळविण्याचे कार्य त्यांची जबाबदारी म्हणून उत्तमरित्या पार पाडतात आणि त्या गोष्टीचे आयुष्यभराचे साक्षीदार सुद्धा होत असतात.त्यामुळेच की काय मित्र मैत्रिणी प्रेमाचे अत्यंत प्रभावी माध्यम म्हणून गौरविले गेले आहे.
सध्या कॉलेजमधून साजरे होणारे डे देखील काही अंशी प्रेमाचे माध्यम ठरत आहेत कारण फेब्रुवारी महिन्यात चोकलेट डे, प्रॉमिस डे, टेडी डे, रोझ डे, ट्रॅडिशनल डे करता करता प्रेमविरांची गाडी कधी प्रपोज डे वरून व्हॅलेंटाईन डे साजरा करतात ते समजत देखील नाही.हे डे एकमेकांना जवळ आणण्यास मदत करतात.
असेच प्रेमाचे आणखीन सुंदरआणि हक्काचे माध्यम म्हणजे आपले कुटुंबीय देखील असतात. आपले बहीण भाऊ देखील त्यांच्या मित्र मैत्रिणी सोबत आपले प्रेम संबंध प्रस्थपित करून देण्यात खूप मोठा पुढाकार घेतात.तसेच काका ,काकी,मामा,मामी त्यांची मुले सुद्धा अशा कामी आपल्याला मदत करत असतात त्यामुळेच आपले प्रेमाचे वारू चौफेर उधळू लागते.आपण हक्काने त्यांना या कामात ओढतो.त्यांच्याकडून आपले प्रेम प्रकरण यशस्वी करून घेतो.
सध्या प्रेमाचे स्वरूप देखील काळानुरूप बदलत चालले आहे त्यामुळे प्रेमाची माध्यम देखील बदलत गेली आहेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जग अक्षरशः एकमेकांच्या खूप जवळ आलंय असे म्हणतात ते काही चुकीचे नाही कारण स्मार्ट फोनचा शोध लागला त्यामुळे संवादाची आणि संपर्काची सुरक्षित तसेच सोयीची साधने फोनच्या रुपात आपल्या हातात मिळाली. त्यात मुख्यत्वे करुन व्हॉट्स ॲप, फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अशी नानाविध प्रकार उपलब्ध झाले आहेत त्यामुळे त्यातून एकमेकांशी परिचय होऊन विचारांची देवाण घेवाण होऊन मन जुळली जातात आणि प्रेमप्रकरण बहरू लागतात. ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या खूप प्रेमप्रकरण जुळून येऊ लागली आहेत.अगदी वयाची,जाती धर्माची बंधन झुगारून देशांच्या सीमा ओलांडून हा माध्यम यशस्वीपणें प्रेमाला फुलवण्याचे कार्य सध्या करत आहे.म्हणूनच हल्ली प्रेमिकाना सर्वात जवळचा माध्यम सोशल मीडिया ठरतो आहे.
त्यामुळेच प्रेयसी प्रियकराच्या प्रेमाचा नजरेपासून सुरू होणारा प्रवास पूर्वी कबुतर पक्षी नंतर मित्र मैत्रिणरुपी सायकल तर कधी कुटुंबीय रुपी गाडी वापरत सध्या सोशल मीडियाच्या विमानातून वेगवान प्रवास करत सुखरूपरित्या प्रेमाच्या यशस्वी गावाला जाऊन पोहचते आणि सहजच ओठावर ओळी येतात.
” पावसात भिजतो श्रावण, सुखाचा महिना
आवरू मनाला कैसे मला ते जमेना.
नितीन गजानन सुर्वे (श्रीवर्धन)

समन्वयक – पालघर जिल्हा