कोवळ्या वयात
ओठावर
टोचल्या होत्या मिशा
त्याच्या …
तेव्हा. . .
ओठातून आलेल्या रक्ताला
त्याने खाल्लेल्या पानाचा
वास सुद्धा येत होता
तो ओघळ हनुवटी पर्यंत …
तेवढाच पुसण्याची
ताकद होती मनगटात …
त्याच्या दैत्यमिठीतून
सुटता सुटता
वय निघून गेलं
ओठ सुकून गेले
आता उंबऱ्याच्या आत
पडणार प्रत्येक पाऊल
सोडून देत असतं
त्याला चिकटलेल
सोज्वळपणाच पादत्राण
दाराबाहेर
आत येवून मला
वापरण्यासाठी . . .
नशा व्यसन नशीली दुनिया
अभंग अभागीपण
भोगीपण
रोज खुंटीवर
अडकणाऱ्या
माळा
कित्येक नकळत फुटणाऱ्या
दोन घराच्या
बांगड्या
हे सार काही पहात मी
काळजात उतरणारे
डोळ्यातले रक्त
पुसू शकत नाही
फक्त एकच विचार
ओठांना दातात दाबत
करते
पहिली मिठी . . .फसवी मिठी . . .मिठी
तेव्हाच हात छाटले असते तर?
- सागर काकडे

मुख्यसंपादक