(जागतिक महिला दिना निमित्त )
मुक्त मी होईन म्हणता कैक झाले वार का?
मोकळा स्त्री श्वास घेता मोडतो संसार का?
ही कृपा आरक्षणाची जाहले सरपंच मी
फक्त मी नावास, बघतो दादला व्यवहार का?
“मातृदेवोभव” खरे तर वंचनांचा पिंजरा
जे दिले ते खावुनी मी आत फडफडणार का?
सोडले मी माय,बाबा, नाव जाण्या सासरी
गोत्र अन् कुलदैवताला पण जुन्या मुकणार का?
पाळतो ना माय बापा, धाडतो वृध्दाश्रमी
तोच वंशाचा दिवा अन् तोच वारसदार का?
गप्प तो वाचाळ नेता प्रश्न करता का असा?
“बोल स्त्री आरक्षणाचा कायदा करणार का?”
बंड करण्या सज्ज झाली स्त्री अता “निशिकांत”पण
बंद कर तू टोकणे तिज “घेतली तलवार का?”
- निशिकांत देशपांडे, पुणे.
मुख्यसंपादक