Homeसंपादकीयराजसाहेबच का ?

राजसाहेबच का ?

मी कोणी राजकारणी नाही की मोठा राजकीय विश्लेषक नाही. पण मी राजकारणाचा अभ्यासक जरूर आहे. माझे वडील सोपान मारूती मोरे हे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे पुढारी होते. त्यामुळे त्यांचा त्या काळात काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांशी संबंध आला. रा.मि.म. संघाचे जुने अध्यक्ष श्री. वसंतराव होशिंग, सरचिटणीस श्री. भाई भोसले, नंतर झालेले रा.मि.म. संघाचे अध्यक्ष श्री. मनोहरमामा फाळके व ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे मेहुणे असल्याने मग दादांशी निर्माण झालेली माझ्या वडिलांची जवळीक, रा.मि.म. संघाच्या माध्यमातून मिल कामगारांच्या भारतभर सहली, मग त्यातून दिल्लीला इंटक अध्यक्षांच्या ओळखीने पंतप्रधान इंदिरा गांधी व केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या भेटी या सर्वच गोष्टी मी खूप जवळून पाहिल्या आहेत.

नंतर १९८२ चा डॉ. दत्ता सामंतांचा गिरणी कामगार संप, त्या संपाची दहशत व झळ, मग डॉ. दत्ता सामंत सर्वच राजकीय पक्षांना भारी पडू लागले म्हणून त्यांना एकटे पाडून त्यांचा तो संप चिरडून टाकण्यासाठी सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाशी इतर पक्षांची झालेली छुपी युती किंवा हात मिळवणी या सगळ्या गोष्टी मी अगदी जवळून पाहिल्या आहेत. कारण मी वरळी बी.डी.डी. चाळीत म्हणजे गिरणगावातच रहात होतो. माझे शालेय, महाविद्यालयीन शिक्षण त्याच गिरणगावात झाले.

डॉ. दत्ता सामंत व श्री. राजसाहेब ठाकरे यांची मी तुलना करीत नाही. पण मला दोघांच्या परिस्थितीत खूप साम्य जाणवते. ते असे की डॉ. दत्ता सामंत तत्कालीन राजकारणातील बड्या धेंडांना घाबरत नव्हते, त्यांची पर्वा करीत नव्हते. त्यामुळे हा नेता कामगारांच्या गळ्यातील ताईत बनून आपल्याला भारी पडेल असे त्या बड्या धेंडांना वाटत होते. पण तरीही डॉ. दत्ता सामंत यांचा एजंडा व काम करण्याची पद्धत आणि राजसाहेब ठाकरे यांचा एजंडा व कार्यशैली यात खूप फरक आहे. वक्तृत्व शैली सुद्धा वेगळी आहे. मग साम्य कुठे आहे तर एकटा असूनही सर्वांना भारी पडणारा नेता म्हणून सर्वांनी घेरणे व चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यू सारखी स्थिती करणे. इथे सुद्धा अभिमन्यूची तुलना डॉ. सामंत व राजसाहेब यांच्याशी करण्याचा माझा हेतू नाही. परिस्थितीला योग्य उदाहरण म्हणून अभिमन्यूचे नाव घेतले आहे. राजसाहेब यांचा दरारा इतका मोठा आहे की हा नेता भारी पडू शकतो याची भीती इतर सर्वच पक्षांना नक्की असणार व म्हणून राजसाहेबांना घेरून त्यांना कसे खच्ची करता येईल याचा विचार इतर पक्ष नक्कीच करत असतील. पण राजसाहेब सर्वांना मागे टाकून पुढे जातील याची मला खात्री आहे.

मनसे पक्ष स्थापनेपासून या पक्षाची वाटचाल मी बघत आलोय. मनसे पक्षाची पहिली सभा शिवाजी पार्क मैदानावर झाली तेंव्हा त्या सभेला मी प्रत्यक्षात हजर होतो. कारण राजसाहेबांनी शिवसेना सोडण्याची कारणे मला पटली होती. शिवसेना सोडून ते दुसऱ्या पक्षात गेले नाहीत. त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. मनसे पक्षाचा सुरूवातीचा झेंडा व आता असलेला झेंडा यात फरक असला तरी भूमिकेत फरक नाही. पूर्वीच्या झेंड्यातही मधला भाग भगवा होता व तो आकाराने खूप मोठा होता. त्या आकाराने मोठ्या असलेल्या भगव्या भागातून राजसाहेबांचा हिंदुत्वाचा एजंडा ठळकपणे स्पष्ट दिसत होता. आताचा झेंडा तर पूर्ण भगवाच पण त्यावर काय तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमुद्रा. त्यातून संकेत काय तर देशपातळीवर हिंदुत्व पण राज्य पातळीवर महाराष्ट्राचा राज्य कारभार शिवरायांच्या धोरणांनुसार ज्यात असेल मराठी बाणा. पक्षाच्या नावातच महाराष्ट्र आहे. त्यातून महाराष्ट्राची मराठी अस्मिता व जगावेगळा महाराष्ट्र घडविण्याचा म्हणजे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा उद्देश सरळस्पष्ट दिसतो.

या दिशेने पुढे जाताना राजसाहेब यांनी जे जे मुद्दे उपस्थित केले व उचलून धरले त्यावर त्यांच्यावर जहरीली टीका झाली तरी ते त्या मुद्यांवर ठाम राहिले व ठाम आहेत. त्यांचा मुंबईतील परप्रांतीयांच्या लोंढ्यांचा मुद्दा खरंच किती जणांना कळलाय? पण कळायला हवाय मराठी माणसांनाही व परप्रांतीयांना सुद्धा. त्या लोअर परळ रेल्वे स्टेशन (आताचे प्रभादेवी) पुलावर गर्दीत किती माणसे चेंगरून मेली? इतर पक्ष व नेते गप्प बसले त्या मुद्यावर. पण राजसाहेबांनी संताप मोर्चा काढला ज्या मोर्चात मी उस्फृतपणे सामील झालो कारण मला इतर पक्षांचा व त्यांच्या नेत्यांचा आणि षंढ लोकांचा मनापासून संताप आला होता. राजसाहेबांनी संताप मोर्च्याचा दणका दिला आणि मग सरकारला जाग आली आणि तिथे प्रशस्त रेल्वे पूल बांधण्यात आला. त्यांचे टोल आंदोलन यशस्वी झाले नाही काय? छातीवर हात ठेऊन सदसदविवेकबुद्धीला स्मरून खरे सांगा. उगाच टीका करायची म्हणून करू नका.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरच्या ३७० कलमावर घेतलेल्या चांगल्या निर्णयाचे स्वागत करणाऱ्या याच राजसाहेबांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणून नरेंद्र मोदींवर टीकाही केली. चांगले ते चांगले व वाईट ते वाईट असे म्हणण्याची, त्यावर रोखठोक बोलण्याची हिंमत ठेवणारा डॕशिंग राजकीय नेता म्हणजे राजसाहेब ठाकरे. हल्ली तर काय राजसाहेब भाजपवासी झाले म्हणून विरोधी पक्षांकडून किती संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. हा जावईशोध कशावरून तर त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर केलेली टीका व हल्ली शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर या नेत्यांशी झालेल्या भेटीगाठी. पण कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी मुंबई महापालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली व मनसे- भाजप किंवा मनसे-बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांशी होणाऱ्या युती अफवेची हवाच काढून घेतली.

आता मनसे स्वबळावर लढणार हे राजसाहेबांनी जाहीर केल्यावर काही राजशत्रू काय बोंबलू लागलेत तर म्हणे मराठी मतांचे विभाजन करून भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा व्हावा म्हणून राजसाहेब स्वबळावर लढणार? डोकी आहेत की खोकी आहेत या लोकांची? स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याइतके राजसाहेब दुधखुळे वाटले की काय या लोकांना? कोण स्वतःचाच पक्ष संपविण्यासाठी ही असली व्यूहरचना करील आणि कशासाठी?

या लेखाचा शेवट करताना मला महाराष्ट्रातील सर्वच मतदारांना एवढेच नम्र आवाहन करायचे आहे की तुम्ही भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,भाजप वगैरे इतर पक्षांना अनेक वेळा सत्तेवर येण्याची संधी दिलीत. आता फक्त एक संधी नुसती मुंबई महापालिका व इतर ग्रामपंचायत, नगर परिषदा, पालिका निवडणूकीपुरतीच नाही तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत राजसाहेब ठाकरे व त्यांच्या मनसे पक्षाला द्या व राजसाहेबांना फक्त एकदा मुख्यमंत्री करून बघा व पुढचे तुम्ही ठरवा. या महाराष्ट्राचे नवनिर्माण राजसाहेब करतील याची मला पूर्ण खात्री आहे.

जय महाराष्ट्र! जय मनसे!

  • ॲड. बळीराम मोरे
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular