Homeवैशिष्ट्येरोजा का ठेवावा?

रोजा का ठेवावा?

‘इस्लाम’ हा अरबी शब्द असून ‘सलाम’ म्हणजे ‘शांती’ हे त्याचे मूळ रूप आहे. इस्लाम या शब्दाचा आणखी एक अर्थ असून ‘Submission to the Will of Allah’ अर्थात अल्लाहच्या मर्जीपुढे, आदेशापुढे स्वत:स समर्पित करणे असे होते. इस्लाम धर्मीयांना मुस्लिम किंवा मुसलमान असे संबोधले जाते. पवित्र कुरआन करीममध्ये मात्र ‘मुस्लिम’ हाच शब्द आला आहे. जगातील सारेच इस्लामधर्मीय ‘ला ईलाहा इल्लल्लाह, मुहंमदुर्रसूलुल्लाह’ म्हणजेच ‘अल्लाहशिवाय इतर कुणीही ईश (पूजनीय, भक्तीस पात्र) कुणीच नाही आणि मुहंमद (स.अ.स) हे अल्लाहचे प्रेषित आहेत’ या वचनावर पूर्ण विश्वास ठेवतात. या वचनालाच ‘कलमा’ असेही म्हणतात. या कलमावर ज्याचा विश्वास नाही आणि जो अल्लाहशिवाय इतर कोणाची उपासना करतो, त्याला ईश मानतो, त्याची पूजा करतो तो मुस्लिम असूच शकत नाही. या कलमावर जो ठाम विश्वास ठेवतो आणि त्यानुसार आचरण करतो त्याने अल्लाहने दिलेल्या आदेशांचे पालन करायलाच हवे आणि प्रेषितांच्याच मार्गाने चालायला हवे. इस्लामच्या पाच मूळ स्तंभांपैकी ‘तौहीद’ म्हणजेच वर दिलेल्या कलमावर ठाम विश्वास ही पहिली अट. त्यानंतर दिवस आणि रात्रीत पाच वेळ अनिवार्य असलेल्या नमाज पढणे, पवित्र रमजान महिन्यातील सारे दिवस रोजे ठेवणेही प्रत्येक वयात आलेल्या मुस्लिम स्त्री-पुरुषावर अनिवार्य आहे. आपल्या कमाईतील, संपत्तीतील ठरावीक टक्के रक्कम अनिवार्य असलेले दान म्हणजे ‘जकात’ देणे आणि जर आरोग्य आणि ऐपत असेल तर आयुष्यात एकदा तरी मक्का आणि मदिनाची वारी म्हणजेच ‘हज’ यात्रा करणे प्रत्येक मुस्लिमासाठी अनिवार्य ठरते.

रोजा कोणी करावा?
अल्लाहनेच दिलेल्या आज्ञेनुसार वयात आलेल्या प्रत्येक मुस्लिम स्त्री-पुरुषाने रमजान महिन्याचे रोजे ठेवणे अनिवार्य आहे. पवित्र कुरआन करीमध्ये अल्लाहने तसा आदेशच दिला आहे. ‘हे ईमानधारकांनो ! तुम्हाला रोजे ठेवण्याचा आदेश आहे. ज्याप्रमाणे तुमच्या आधीच्यांना (ज्यू आणि ख्रिश्चन) हा आदेश दिला होता जेणेकरून तुम्ही स्वत:वर आवर (प्रतिबंध) घालायला शिकाल’.(सूरह अल-बकर २:१८३). याला अपवाद फक्त खालील लोक असतात जसे- बारा वर्षाखालील मुले-मुली, रुग्ण असलेले स्त्री-पुरुष, प्रवासी, मासिक धर्मात असलेल्या स्त्रिया, स्तनपान करणाऱ्या माता, या वर्गातील स्त्री-पुरुषांना रोजातून सूट असते. त्याचप्रमाणे वृद्धांनाही सूट मिळते. मात्र आजारी असलेल्या व्यक्तीने आजारातून बरे झाल्यानंतर सुटलेल्या रोजांची रोजा ठेवून भरपाई करावी लागते. तसेच प्रवासी व्यक्तीने प्रवास संपल्यानंतर सुटलेले रोजे ठेवावे लागतात. तसेच वृद्ध लोक जे शारीरिक असमर्थतेमुळे रोजा ठेवू शकत नाहीत, त्यांनी एका रोजाच्या बदल्यात एका गरीब व्यक्तीस पोटभर अन्न खाऊ घातले पाहिजे.

रोजा ठेवण्याची कारणे
अल्लाहच्या या आज्ञेमुळे जगभरातील मुस्लिम संपूर्ण रमजान महिन्यात दिवसभर रोजा ठेवतात. अल्लाहच्या आदेशाचे पालन आणि प्रेषितांच्या मार्गावर मार्गक्रमण हा साऱ्यांचा उद्देश असतो. आपण असा विचार करतो की, मन, आत्मा आणि शरीर वेगवेगळे आहेत. परंतु या साऱ्याच गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. रमजानमधील रोजे ठेवल्याने मन, आत्म्याची शुद्धी तर होतेच पण शारीरिकदृष्ट्याही रोजदाराला आरोग्य प्राप्त होते.
वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे की, आपले आरोग्य सुधारण्यासाठी आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. रमजानमधील रोजांमुळे पचन संस्थेला विश्राम तर मिळतोच पण त्याचबरोबर शरीरातील टॉक्सिनची विल्हेवाट आणि शरीराची झीज भरून निघते. पर्यायाने शारीरिक आरोग्य आणि उत्साहात वृद्धी होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रमजान महिन्यात माणसाच्या सामाजिक आणि कौटुंबिक जाणिवा अधिक प्रगल्भ होतात. रोजे इफ्तार करताना सर्व कुटुंबीयांसोबत किंवा आप्त, नातेवाईक, आवडत्या मित्रमंडळीसोबत आलेली अनुभूती शब्दात न मांडण्यासारखी असते. सारेच दिवसभराचे उपाशी आणि तहानलेले असताना इतरांना खाऊ घालण्यात जो आनंद असतो तो आगळाच असतो. अशाने कौटुंबिक आणि सामाजिक नाती अधिक दृढ होतात.
आपल्याला अल्लाहने त्याच्याकडून ज्या दैवी गोष्टी दिलेल्या आहेत, त्या जोपर्यंत आपल्यापासून हिरावून घेतल्या जात नाहीत किंवा आपल्याला उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत त्याची किंमत आपणास कळत नाही. रोजा ठेवल्यानंतर भूक आणि तहान काय असते हे आपणास कळते. त्यामुळे गोर-गरिबांच्या परिस्थितीची जाणीवही आपल्याला होऊ लागते. तसेच या सृष्टीचा कर्ता-करविता केवळ अल्लाह आहे आणि त्याची या विश्वातील जीवित असलेल्या सृष्टीवर असीम कृपा आहे, हेही समजू लागते. भारतात आजही २३ कोटी लोक रोज उपाशी अन्नाविना झोपतात. या उपाशी बांधवांच्या भुकेची तीव्रता रमजान करून देतो. इतकेच नव्हे, तर अलीकडच्या काळात बोकाळलेल्या चंगळवादाला, भौतिकवादाला, जडवादाला, अतिसेवनाला आणि आपल्या इच्छांची त्वरित, झटपट आणि जलद पूर्तता करून अघोरी आनंद मिळवण्याच्या व्रत्तीलाही रमजानचे रोजे लगाम घालतात. त्यामुळे एक आगळीच शिस्त शरीराला, मनाला आणि आत्म्यालाही लागते. रमजानच्या रोजांमुळे वैयक्तिक जीवनात संयम, साधेपण, शिस्त आणि शरीराचे, जिभेचे चोचले पुरवण्याच्या हव्यासापासून विलगता प्राप्त करण्याचे सामर्थ्य रोजे ठेवणाऱ्या व्यक्तीत निर्माण होते. यामुळे अशा व्यक्तीत आत्मिक समाधान, व्रत्तीमध्ये संयम आणि व्यवहारात शिस्तही आपोआप निर्माण होते. इस्लामधील रमजानच्या रोजांचे हेच तर फलित आहे. हे सारे साध्य करण्यासाठी रोजा ठेवणे आवश्यक आहे.

  • संकलन

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular