Homeवैशिष्ट्येबहुजनांच्या शिक्षणाचा वटवृक्ष - कर्मवीर भाऊराव पाटील

बहुजनांच्या शिक्षणाचा वटवृक्ष – कर्मवीर भाऊराव पाटील

बहुजनांच्या शिक्षणाचा वटवृक्ष – कर्मवीर भाऊराव पाटील

आपल्या विचाराने मोठ्या व्यक्ती या जगात येतात,

खूप काबाड कष्ट करतात , येणाऱ्या संकटातून पार दूर निघून जातात,

आणि असं काही घडतात की इतिहास घडवून दाखवतात.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ..

कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील असे होते. हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते , त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्यात हातकणंगले या तालुक्यात डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव या ठिकाणी झाला. २२ सप्टेंबर 1887 रोजी कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी.

गावचे कर्मवीर यांचे पुर्वज महाराष्ट्रात आले होते , त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले, आईचे नाव गंगाबाई होते. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, इतके हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. न्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांत झाले.पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. कर्मवीरांच्या गावी कुंभोज मध्ये ‘सत्त्यापाचे बंड’हे प्रकरण खूप गाजले होते.

ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज ओळखणारा शिक्षणमहर्षी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील , ग्रामीण भागातील प्रश्न जर सोडवायचे असतील, तर तेथे शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत जरुरीचे आहे असे त्यांना वाटले, म्हणून त्यांनी ऑक्टोबर १९१९ मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.

सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू करून मोठे काम केले. जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे हे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. भाऊराव पाटील हे जन्माने जैन होते. मात्र जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहूजन समाजाला ते आपले वाटले.

त्यांचे व्यक्तिमत्त्व जातीभेदाच्या पलीकडे होते. महात्मा फूले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव भाऊराव पाटलांवर होता. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी जाणले होते. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. भाऊरावांनी सातारा येथे महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले मोफत निवासी हायस्कूल सुरू केले.

कोल्हापूरला असताना कोल्हापूर संस्थानचे राजे राजर्षी महाराज होते त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रात समतेचा झेंडा लावला होता सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले.समाज प्रबोधनाच्या चळवळीमध्ये एक सुधारक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ‘महात्मा फुले अध्यापक विद्यालय’ त्यांनी सुरू केले या मागे त्यांचा उद्देश शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे त्यासाठी योग्य शिक्षक घडवणे हे होते.

पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. अस्पृश्यतेविरुद्ध बंड, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, अंधश्रद्धा, कामगारांचा छळ आणि आर्थिक विषमता या विषयांवर ते अत्यंत आक्रमकपणे बोलायचे. वसतीगृहात विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करता येतात, या विचाराने भाऊराव पाटील यांनी पुण्यात 1932 मध्ये युनियन बोर्डिंग हाऊस सुरू केलं. दलित आणि उपेक्षितांच्या शिक्षणासाठी त्यांनी अशी अनेक वसतीगृहे उघडली. सध्या रयत शिक्षण संस्थेमार्फत शंभरच्या आसपास अशी वसतीगृहे चालवली जात आहेत.

त्यांनी शैक्षणिक शिक्षक देणारे अनेक अध्यापक विद्यालय सुरू केले. पुढे प्राथमिक, माध्यमिक, उच्च-माध्यमिक शिक्षण देणारी अनेक महाविद्यालये रयत शिक्षण संस्थेमार्फत त्यांनी सुरू केली. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची पर्वा न करता आपल्याला समाजकार्यात झोकून दिलं.

शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे. मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे. वेगवेगळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे. योग्य रूढींना फाटा देऊन खऱ्या विकासाचे वळण लावणे. संघशक्तीचे महत्त्व कृतीने पटवून देणे. सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे. बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.

ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.

साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे.

कर्मवीर भाऊराव पाटलांच्या या योगदानामुळे त्यांना वेळोवेळी विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

1959 साली राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. तर पुणे विद्यापीठानेही डी. लिट पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. आपल्या कार्यामुळे जनतेकडून त्यांना कर्मवीर ही उपाधी आधीच मिळालेली होती. अश्याप्रकारे त्यांचे कार्य काळ, कामकाज, विचारशैली अत्यंत अमूल्य होते . लिहावं तितके थोडेच आणि बोलावे तितके कमीच अशीच त्यांची कामगिरी होती.

कोणीतरी छान लिहिलं होत माझ्या वाचनात आले होते. ते मी इथे मांडत आहे.

“पंखफुट्या पाखरांसाठी , पवित्रसा वटवृक्ष रोविला ,

जो वस्तीला आला , त्याला ताटामधला घास दिला …. “

शालेय जीवनात आम्ही रयत गीत गात होतो. आज इथे मी सादर करत आहे.

रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.

वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ ||

कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे.

शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे.

धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे.

रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ ||

गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई.

कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई.

स्वावलंबी वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे.

रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २||

दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया

अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया.

शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे.

रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||३||

जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी,

इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी

प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे.

रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.

धन्यवाद

रुपाली शिंदे

(भादवन) आजरा

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular