Homeघडामोडीलढेंगे-जितेंगे, प्रश्नचिन्ह को आगे बढाएंगे - मेधाताई पाटकर

लढेंगे-जितेंगे, प्रश्नचिन्ह को आगे बढाएंगे – मेधाताई पाटकर


मंगरूळ चवाळा: ( मनोज गावनेर )-:

तालुक्यातील मंगरूळ चवाळा येथे प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या १०व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमात जगद्विख्यात नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या व संपूर्ण देशात विख्यात असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका माई मेधाताई पाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या व्यक्त होताना म्हणाल्या कि, मतीन भोसले यांच्याबद्दल त्यांनी विविध समाजमाध्यमांद्वारे वाचले आणि मतिनजी ज्यावेळी मुंबई ला यायचे त्यावेळी भेटही झाली. फासेपारधी समाजातील एक तरूण आपल्या समाजाच्या विकासासाठी नोकरीचा त्याग करून विकास, आचार, संस्कृती, आरोग्य या सर्वांपासून वंचित असलेल्या फासेपारधी समाजाला मार्गदर्शन करून व त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन उच्चशिक्षणापर्यंत पोहचविण्याचे महत्कार्य केले. संपूर्ण देशात जवळपास १३ कोटी फासेपारधी बांधव वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने राहतात पण त्यांचा विकास करण्यासाठी शासनाने त्यांची तशी नोंदच ठेवली नाही आणि त्यांच्या पर्यंत कोणताही विकास पोहचला नाही. परंतु मतिनभाऊंनी त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ज्ञानदानाचे कार्य हाती घेतले आणि या कार्याला वाढविण्यासाठी राज्यभरातील अनाथ, भिक मागणाऱ्या मुला मुलींना गोळा करून करून शाळा उभारली. परंतु एक-एक रूपया गोळा करून उभ्या केलेल्या वर्गखोल्या एका समृद्धी महामार्ग प्रकल्पाने उद्ध्वस्त केल्या. केवळ २० किलोमीटर चा फेरा वाचविण्यासाठी तयार केलेल्या महामार्गासाठी आश्रमशाळा उद्ध्वस्त करताना सरकारला लाज कशी वाटली नाही असे परखड मत त्यांनी मांडले. जे मागितल्या जात नाही असे लाखो करोडो रूपयांचे प्रकल्प उभारल्या जातात पण ज्ञानदानासाठी प्रश्नचिन्हचे अनेक प्रस्ताव शासनदरबारी धुळखात पडले असतात. आधीपासूनच जल, जंगल, जमिन येथेच वास्तव्य असलेल्या आदिवासींना त्यांच्याच जागेच्या जमिनिचे पट्टे वाटले नाही परंतु ज्ञानदानाच्या कार्यात सतत अडथळे निर्माण केल्या जाते. पण मतिनभाऊंसारखे व्यक्तिमत्त्वामुळे सुर्याची पहाट उगविल्याशिवाय राहणार नाही. अशाप्रकारचे होतकरू सामाजिक कार्यकर्ते या भूमित जन्माला येऊन भूमी पावण करतात. रेणके कमीशन च्या शिफारसी लागू केल्या असत्या तर अनेक आदिवासींचे प्रश्न निकाली निघाले असते. रोड, रस्ते, धरण निर्माण करून सुपिक उपजाऊ जमिनी शेतकऱ्यांपासून हस्तगत करून शेतीप्रधान व्यवस्थेला खिळ बसविण्याचे काम सरकार करत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला धोक्यात आनणाऱ्या शेतकरी विरोधी ३ कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या १० महिन्यांपासून दिल्लीच्या तख्तावरून शेतकरी आंदोलन करत आहे. २७ सप्टेंबर ला संयुक्त किसान मोर्चाच्या वतिने कृषी कायद्याच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात व शेतकरी सन्मानार्थ देशव्यापी भारत बंद होणार असून यामध्ये सर्वांनीच सहभागी होण्याचे आवाहन मेधाताईंनी केले. ‘लढेंगे-जितेंगे, प्रश्नचिन्ह को आगे बढाएंगे’ असे म्हणत प्रश्नचिन्ह शाळेच्या अनेक प्रश्नांसंदर्भात मतिन भोसलेंना मदत करून प्रश्न निकाली काढण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे सांगितले. मतिन भोसले व त्यांच्या परिवाराचे भरभरून अभिनंदन करून विद्यार्थ्यांमध्ये महापुरूषांचे विचार बाणविले जाण्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांनी आपल्या भाषणाला विराम दिला.


समाजातील अंधश्रद्धा, कालबाह्य परंपरा नष्ट करण्यासाठी तुकडोजी महाराजांचे डोळस व विज्ञानवादी विचारसरणी सांगून समाजप्रबोधन करणारे सप्तखंजेरीवादक राष्ट्रीय किर्तनकार सत्यपाल महाराज यांनी विनोदाच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकले. तुकडोजी महाराजांनी ‘माणूस द्या मज माणूस द्या’ असे म्हटले होते. तुकडोजी महाराजांना अपेक्षित माणूस म्हणजे मतिन भोसले सारखा माणूस होय. मतिनभाऊ अनेक प्रश्नांचे उत्तर शोधताना आपल्या समाजाला ज्ञान देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करत आहे. आम्ही समाजाचे प्रबोधन करतो करतो पण मतिन भोसले यांनी अनेक प्रश्नांचा सामना करत प्रत्यक्ष समाजकार्य करून दाखविले. आपल्या घरी पाहुणा आला तर परत कधी जातो असा आपल्याला प्रश्न पडतो पण मतिनभाऊ मुलं जोडत गेले आणि प्रश्नांची उत्तरे सोडवत गेले. हे सर्व कार्य मतिनभाऊंनी कसे केले हा प्रश्न आहे. अशा शब्दात सत्यपाल महाराज व्यक्त झाले.


प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या १०व्या वर्धापन दिनाचे आयोजक तसेच आदिवासी फासेपारधी सुधार समितीचे अध्यक्ष, श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष मतिनभाऊ भोसले प्रास्ताविकपर भाषनामध्ये व्यक्त झाले. वस्तीशाळेचा शिक्षक म्हणून नोकरी करतानाच समाजकार्याची आवड असल्याने नोकरीचा राजीनामा देऊन उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘आदिवासी फासेपारधी सुधार समिती’ स्थापन केली आणि त्यामाध्यमातून विकासापासून कोसो दूर व शिक्षणापासून वंचित असलेल्या अनाथ, अपंग, भीक मागून जगणाऱ्या मुलांकरिता ज्ञानमंदिर उभे करण्याचे निश्चित केले. परिस्थिती हलाखीची असल्याने हे कसे करावे हा प्रश्न होता पण तांड्यातील समाजबांधवांनी अन्नधान्यासहित आर्थिक मदत केली व कुडा काट्याची शाळा उभारून सुरूवात केली. परंतु हे ध्येय फक्त मंगरूळ चवाळा तांड्यापुरतेच मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, व इतर ठिकाणी भिक मागून जगत असलेले मुलं मुली यांना गोळा करून त्यांना सुध्दा ज्ञानदानाचे कार्य करण्याचे ध्येय मतिभाऊंनी निश्चित केले. असे करताना शाळेत मुलं वाढत गेले तसतसा अन्नाचा व पैशांचा तुटवडा भासू लागला. विद्यार्थ्यांना कपडे व निवारा कसा निर्माण करावा हा प्रश्न निर्माण झाला. अशावेळी विद्यार्थ्यांना घेऊन २०१३ मध्ये ‘भिकमांगो आंदोलन’ सुरू केले. रस्त्यावर भिक मागून जुने पुराणे कपडे जमा करून टिन पत्र्याच्या खोल्या तयार करून त्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह चालविला. अशातच १५ अॉगस्ट दिनी भिक मागण्याचा प्रयत्न केला असता मला मुलांसह जवळपास शंभर समाजबांधवांना व काही समाजसेवकांना तुरूंगात टाकले. एखाद्या आतंकवाद्याप्रमाणे मतिभाऊंना अंडासेल मध्ये सुद्धा टाकले असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये काही राजकीय लोकांचाही हस्तक्षेप होता. परंतु जेव्हा ८ ते १० दिवसांनी सोडले त्यावेळी बाहेर येताच तिथेच जेल शिपायालाच भिक मागून आंदोलन सुरू ठेवून पैसे गोळा केले व हाती घेतलेले कार्य सुरू ठेवले. अनेक लोक हसत होते – काय करतील? कसे करतील? असा उघडा तमाशा बघत होते. परंतु ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे, मैत्रेय मांदियाळी चे अजय किंगरे तसेच अनेक संस्था व अनेकांनी वैयक्तिकरित्या मदत व मार्गदर्शन करून प्रश्नचिन्हला जिवंत ठेवले. धान्य व किराण्याची मदत करणारा गावातील पहिला व्यक्ति कॉम्रेड गणेशराव अवझाडे असल्याचे मतिनभाऊ नेहमी सांगतात. समाजदेणगीतून व समाजसेवेसाठी ज्ञानदानाचे हे सर्व वैभव उभे केल्यानंतर समृद्धी महामार्गाने हे सर्व हिरावले. फासेपारधी समाजासाठी उभारलेले ज्ञानदानाचे वैभव ज्ञानमंदिरासहित, पिण्याच्या पाण्याची विहिर, वाचनालय, समृद्धी महामार्ग प्रकल्पामुळे जमिनदोस्त झाले. परंतु प्रत्येक परिस्थितीत आजही अन्नपुरवठा, कपडे, आर्थिक मदत व मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ति व संस्थांचा अभिमान वाटतो असे मतिनभाऊ म्हणाले. पण शासनाने कधीही मदत पुरविली नाही. जेव्हा समाजबांधवांसह नागपूर ला आंदोलन करण्यासाठी ते जायचे तेव्हा प्रत्येकवेळी राष्ट्रीय सेवा दलाचे सचिव अतुलभाऊ देशमुख यांनी सर्वांची जेवनासह सर्व मदत पुरविली. ब्ल्यू टायगर फोर्स चे अॅड. तायडे यांनी कोर्ट कचेरी संबंधी प्रत्येक मदत विनामूल्य दिली. एवढ्यातच कोण होणार करोडपती या प्रसिद्ध अभिनेता सचिन खेडकर यांच्या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये माई मेधाताई पाटकर यांच्यासोबत जाण्याची संधी मिळाली व त्यामाध्यमातून प्रश्नचिन्ह आश्रमशाळेला देणगी मिळाली. जेव्हा मार्गदर्शनाची गरज पडली तेव्हा आमच्या माई मेधाताई पाटकर यांनी भरभरून सहकार्य व मार्गदर्शन केले. समाजकार्य काय असते याचे दर्शन माई मेधाताई पाटकर, डॉ. प्रकाश आमटे यांच्याकडून घडले व शिकलो. आज या ठिकाणी अनेकांच्या सहकार्याने प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा तयार झाली. आश्रमशाळेचे अनेकविध प्रश्न राहणार पण त्याचे उत्तर शोधण्यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य अपेक्षित राहणार असल्याचे व तुम्हा सर्वांचे पाय आमच्या आश्रमशाळेला लागल्याने आम्ही धन्य झालो असे मतिन भोसले म्हणाले.


विधानपरिषदेचे आमदार कपिल पाटील यांनी या दोन वर्षात प्रश्नचिन्ह चे व फासेपारधी समाजाचे सर्व प्रश्न निकाली काढणार असल्याचे आश्वासन दिले. शेतजमिनीचे पट्टे, घराचे पट्टे, PR कार्ड, राशन कार्ड हे सर्व प्रश्न निकाली काढून शासन प्रशासनातील अडचणींना दूर करणार असल्याचे आमदार कपिल पाटिल यांनी सांगितले.


राष्ट्रीय सेवा दलाचे माजी राज्य अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले. प्रश्न तर निर्माण झालेच परंतु त्यातून आपली वाट काढून जो त्याचे उत्तर शोधतो त्याचे नाव मतिन भोसले आहे. कारण प्रश्न निर्माण होतातच परंतु सामाजिक क्षेत्रात काम करताना आपल्या संसारावर तुळशिपत्र ठेवून अनेक समाजसेवक कार्यरत आहेत त्यामधील एक मतिन भोसले होय. जे अनेक प्रश्नांची उकल करण्यामागे लागले आहे. आपल्या तळागाळातील उपेक्षित समाजबांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षणाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्या करिता मतिन भोसले यांनी जे ध्येय उराशी बाळगले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहिलच पण आपण सुद्धा थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे हातभार लावून आर्थिक मदत करण्याचे आवाहन पन्नालाल सुराणा यांनी केले.


यावेळी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या १०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या मंचकावर राज्य कर आयुक्त पाचारने साहेब, डॉ. वनकर, साधना मराठी संपादक विनोद शिरसाठ, दैनिक सकाळ वृत्तपत्र नागपूर शहर संपादक प्रमोद काळबांडे, मैत्रेय मांदियाळी प्रतिष्ठाण चे अजय किंगरे, मिशन आय.ए.एस. अॅकॅडमी चे नरेशचंद्र काठोडे, ब्ल्यू टायगर फोर्स चे राज्य अध्यक्ष अॅड. सुधिर तायडे, माजी पं.स. सदस्य कॉम्रेड गणेशराव अवझाडे, डॉ. मंगेश पचगाडे, आदिवासी पारधी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक बबनजी गोरामन, डिगांबर काळे, बाबुसिंग पवार, धर्मराज भोसले, सरपंच निलेश निंबर्ते व श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटना आणि प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेची शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.

पत्रकार – मनोज गवानेर
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular