वारसदार

सगुणाबाई नेहमीच्या वेळेवर फॅक्टरीत निघाल्या. या वयातही त्या उत्तम गाडी चालवत. गाडी फॅक्टरीच्या आवारात शिरली. नेहमीच्या जागी गाडी उभी करून त्यांनी नेहमीच्या सवयीने आजूबाजूला आपली नजर फिरवली. त्यांची नजर सायलीच्या वेलीवर आणि शेजारच्या चाफ्याच्या झाडावर स्थिरावली. त्यांचा करडा आवाज फॅक्टरीच्या आवारात दणाणला. “इथल्या झाडांच्या कळ्या कोणी तोडल्या? आणि कशासाठी तोडल्या? मला उत्तर हवय..” जवळच रहाणाऱ्या व फॅक्टरीत काम करणाऱ्या साऱ्या जणी आणि वॉचमन धावतच तिथे आले.
“किती वेळा सांगूनही माझे ऐकत नाही म्हणजे काय?”
“ते आज संकष्टी आहे ना! म्हणून जरा फुले तोडली वाटतं कोणीतरी.” अशावेळी फक्त रघुनाथराव त्यांच्यासमोर काही बोलायची हिंमत करत.
” फुले तोडली ती तोडली वर पानेसुद्धा ओरबाडलीत. पुन्हा सांगते कोणीही फुले तोडायची नाहीत. देवाचा देव्हारा, आणि ती पूजा, उत्सव यात वेळ वाया कशाला घालवायचा? त्यापेक्षा काहीतरी नवीन शिका, वाचा आणि इतरांना मदत करा. ते ही नसेल जमत तर झाडे आहेतच की. त्यांची मशागत करा. झाडावर डवरलेल्या फुलाफळांपेक्षा देव काय वेगळा असणार आहे का? “
सगळीकडे करारी आणि कडक अशी सगुणाबाईंची प्रतिमा होती. त्या बोलण्यात रोखठोक होत्या. आत एक बाहेर एक असं त्यांचं काहीच नसायचं.
” आणि हो रघुनाथराव आपल्या माडावरचे नारळ उतरवून घ्या आज. संध्याकाळी मोदक करायचे असतील.”
सगुणाबाईंच्या पाठोपाठ आरती, त्यांची सूनही फॅक्टरीत पोहोचली.
सगुणाबाईंचा क्षणात बदललेला मूड ती देखील पहात होती.
हसत हसत ती त्यांच्या जवळ आली.
“चला चला कामाला लागा. फॅक्टरीची बेल वाजेल आत्ता. आणि संध्याकाळी मोदक करायचे आहेत ना. “
आरतीने सगळ्या बायकांना आपापल्या घरी पाठवून दिले.
बाई तशा डेंजरच आहेत. असा विचार करत त्या बायका आपापल्या कामाला लागल्या आणि सगुणाबाई आपल्या झाडांकडे वळल्या.
आपल्या छोट्याश्या फॅक्टरीच्या आवारात फेरफटका मारताना सगुणाबाई एकेक रोपावरून हात फिरवत होत्या. त्यांना फुलांचे भारी वेड. सगळ्या प्रकारच्या फुलझाडांनी त्यांच्या फॅक्टरीचे आवार डवरलेले असायचे. इतकी फुलझाडे होती तरीही आणखी झाडे लावायची त्यांची हौस काही फिटायची नाही. त्याच्यासारखीच त्यांची सून होती. तिलाही फुलझाडांचा भारी सोस होता. फक्त सगुणाबाईंना झाडावरची फुले तोडलेली आवडायची नाहीत.आरती मात्र कोणी फुले तोडली तरी ओरडायची नाही फॅक्टरीत तसाही देव, देव्हारा नव्हताच. “आपले काम हाच आपला देव” सगुणाबाई म्हणायच्या.पण इतर कोणाला वाटले की घरच्या देवाला फुले घालावी तर त्यात काय चूक आहे! असे आरतीला वाटायचे.
पण सगुणाबाईंचे विचार वेगळेच होते. आरतीला आतापर्यंत सगळे पाठ झाले होते.
झाडाजवळ बसून सगुणाबाई भूतकाळ आठवत होत्या.
बाबासाहेब, सगुणाबाईंचे पती, सामानाचा टेंपो घेऊन जात असताना अचानक त्यांच्या टेंपोला ट्रक ने धडक दिली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. सगुणाबाई तेव्हा पंचवीस वर्षाच्या होत्या. त्यांचा मोठा चार वर्षाचा आणि धाकटी लेक दीड वर्षाची होती.
त्यांचा कागदी पिशव्या आणि कागदी ग्लास बनवण्याचा लघुउद्योग नुकताच सुरु झाला होता. दहाबारा अशिक्षित आणि एकाकी बायका, सगुणाबाई, रघुनाथ आणि एक लांबच्या नात्यातल्या मावशी इतकीच जणं त्या युनीट मध्ये काम करत होती पण सारी जीवाभावाची माणसे होती. बाबासाहेबांच्या अचानक जाण्याने सगुणाबाईंचे सारे आयुष्य उलटेपालटे झाले होते. त्या जरी व्यवसायात मदत करत असत तरी महत्त्वाचे निर्णय आणि टेंपो चालवत सामान गिर्‍हाईकांपर्यंत पोचवण्याचे काम बाबासाहेब करत. बाबासाहेबांच्या जाण्यानंतर सगुणाबाई युनीट बंद करतील असेच साऱ्यांना वाटले होते पण सगुणाबाई तशा धीराच्या होत्या. आपल्यावर या बायकांची जबाबदारी आहे हे त्या जाणून होत्या. त्यांनी साऱ्यांना विश्वासात घेतले आणि युनीट सुरूच ठेवले. आलेल्या प्रत्येक अडचणीला तोंड दिले. रघुनाथला त्यांनी टेंपो चालवायला शिकवला आणि स्वतःदेखील शिकल्या. गरज पडली तर स्वतः टेंपो घेऊन सामान पोचवत असत. प्रसंगी पाना हातात घेऊन मशीन दुरुस्त करायला त्या मागेपुढे पहात नसत.सर्व गिऱ्हाईकांशी त्यांनी योग्य ते व्यावसायिक संबंध जपले होते.तशी त्यांच्या मुलांची काळजी मावशी घेत असत तरीही यांचेही मुलांकडे व्यवस्थित लक्ष होते. सुरुवातीला कर्ज होते ते फेडून सगुणाबाईंनी दोनाची चार युनीट केली. कंपनीत काम करणाऱ्या परित्यक्ता, पिडीत बायकांना फॅक्टरीजवळ घरे बांधून देऊन त्यांचे पुनर्वसन केले , त्यांच्या मुलांसाठी फॅक्टरीच्या आवारातच पाळणाघर बांधले, गावच्या शाळेचे नुतनीकरण त्यांना जे जमेल ते त्या करत होत्या. इतके व्याप सांभाळणारी व्यक्ती कर्तव्यकठोर असतेच. तशाच त्या होत्या. चोरी, खोटेपणा, लांडीलबाडी याचा त्यांना तिटकारा होता. असे कोणी केलेले त्यांच्या लक्षात आले तर त्या व्यक्तीची खैर नसायची.
सगुणाबाईंना साऱ्या उद्योगातून जो नफा होत असे त्यातला साठ टक्के भाग त्या कंपनीत काम करणाऱ्या बायका त्यांची मुले यांच्यावर खर्च करत असत. छानछौकी नव्हती पण कसलीच ददातही नव्हती. त्यांच्या लेकीला ज्योतीला मात्र त्यांचे हे सारे उद्योग अजिबात पसंत नव्हते. तिला वाटायचे की काम करणाऱ्या बायकांचे आई अवास्तव लाड करते. त्यांच्यावर जरा जास्तच पैसे खर्च करते. त्यांना नोकरासारखे वागवायला हवे. तिचे आणि सगुणाबाईंचे या बाबतीत अजिबातच पटत नसे. ज्योतीने शिकत असतानाच आपला नवरा स्वतःच शोधला आणि लग्न करून अमेरिकेत सेटल झाली. सगुणाबाईंनी रितीप्रमाणे तिचे सारे काही केले. अगदी अमेरिकेत जाऊन बाळंतपणही केले. पण ज्योती त्यांना दुरावलीच.
आई मुलीचे जिव्हाळ्याचे नाते त्या दोघीत फारसे नव्हतेच.

सगुणाबाईंचा मुलगा म्हणजे जयंत. तो अगदी नाकासमोर चालणारा नेमस्त मुलगा होता. खूप गुणी आणि सालस होता. त्याला वाचनाचे, अभ्यासाचे खूप वेड होते. अगदी पीएच.डी झाला. त्याने संशोधनात स्वतःला बुडवून घेतले होते. कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कामही करत होता. सगुणाबाईंना त्याचा खूप अभिमानही वाटायचा. पण त्यांच्या कामाच्या दृष्टीने जयंतचा उपयोग शून्य होता.
आपले हातपाय थकले की आपल्यामागे हे सारे कोण चालवणार याची त्यांना थोडी काळजीच वाटायची. जयंताही वयाच्या पस्तीशीपर्यंत लग्नाचे नावच काढत नव्हता. खूप खनपटीला बसल्यावर त्याने आपले आपल्याच कॉलेजमध्ये शिकविणाऱ्या एका मुलीवर प्रेम असल्याचे कबूल केले. सगुणाबाईंना हायसे वाटले. इतके दिवस याने हे लपवून ठेवायची गरजच काय होती? सगुणाबाईंना कळेना. “ती मुलगी आपल्या जातीची नाहीच पण धर्माचीही नाही. ती धर्माने ख्रिश्चन आहे” जयंत म्हणाला.
“इतकेच ना? त्यात काय आहे? तुम्ही एकमेकांना आवडता हे माझ्यासाठी खूप आहे.माझ्यासाठी एकच धर्म मनुष्य धर्म. तो धर्म महत्त्वाचा. तो पाळत असणारी कोणीही मुलगी माझी सून होऊ शकते.तू उगाच इतकी वर्षे ही गोष्ट मनात ठेवलीस. “
तिच्या आईबाबांना सगुणाबाई स्वतः जाऊन भेटल्या. त्यांची परवानगी सगुणाबाईंनीच मिळवली.
अशाप्रकारे लग्नाआधीची जेनी लग्नानंतर आरती झाली. हे नवीन नावही जेनीच्या आग्रहाने ठेवण्यात आले.तरीही अनेकदा सगुणाबाई तिला जेनीच म्हणायच्या.
जयंताला नसला तरी जेनीला मात्र सासूच्या कामात खूपच रस होता. तिने लग्नानंतर कॉलेजमधल्या नोकरीला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ सगुणाबाईंबरोबर काम करू लागली. सगळे काम, त्यातले बारकावे तिने अगदी टीपकागदासारखे टिपून घेतले. त्यात या बायकांसाठी छंदवर्गही तिने सुरू केला. कागदी ग्लासेस आणि कागदी पिशव्या बनवताना तयार होणाऱ्या कागदांच्या कपट्यांवर व वाया जाणाऱ्या फॉल्टी मालावर काही प्रक्रिया करून शोभेच्या वस्तू बनवायला सुरुवात केली. कागदी डिशेस्, द्रोण अगदी चमचे बनवायची युनिट तिने सुरू केली.
जेनी सगुणाबाईंचा जणू उजवा हातच बनली. आताशा त्या जेनीवर प्रत्येक बाबतीत विसंबायला लागल्या होत्या.
जेनीवर त्यांची आणि जेनीची त्यांच्यावर निस्सीम माया होती.
जयंत जेनीचा मुलगा अथर्व जन्माला आल्यावर काहीच वर्षात आता आपण व्यवसायातून अंग काढून घ्यायचे असे त्यांनी ठरवले.त्यात मावशींचाही वार्धक्याने मृत्यू झाला. इतकी वर्षे पाठच्या भावासारखा आधार देणाऱ्या रघुनाथरावांनाही काम झेपेनासे झाले. सगुणाबाई अधिकाधिक अंतर्मुख होऊ लागल्या.
एक दिवस राणे वकिलांना त्यांनी घरी बोलावले आणि आपले इच्छापत्र तयार केले. आपल्या बाजूने त्यांनी निरवानिरव सुरू केली. आरती म्हणजेच जेनी आणि जयंत दोघेही या गोष्टीवरून त्यांना खूप रागावले.
आताशा सगुणाबाई शांतशांत असायच्या. त्या फॅक्टरीभोवतालच्या झाडांमध्ये आणि अथर्व मध्ये काय तो इंट्रेस्ट दाखवायच्या. इतर कोणीही त्यांच्याकडे काही समस्या घेऊन आले तर जेनीकडे बोट दाखवून मोकळ्या व्हायच्या.
आताही त्या थोडावेळ बागेत , फॅक्टरीत आणि भूतकाळातल्या आठवणीत फेरफटका मारून आल्या.संध्याकाळी अथर्वला गोष्ट सांगितली आणि निवांतपणे त्यांच्या पुस्तकात रमल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजले तरी सगुणाबाई उठत का नाहीत हे बघण्यासाठी जेनी गेली तेव्हा सगुणा बाई शांत झोपलेल्या दिसत होत्या पण त्यांची प्राणज्योत पहाटेच कधीतरी मालवली होती.
जेनीच्या घाबरलेल्या आवाजातील हाकांनी सारे घर खडबडून जागे झाले.बाजूच्या घरातून रघुनाथरावही आले. डॉक्टर घरी आले पण सारे काही केव्हाच संपले होते.

बाईंच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांच्या अंत्यदर्शनासाठी शेकडोंनी माणसे येऊ लागली. रघुनाथराव पहिल्यांदा सावरले. त्यांनी ज्योतीला फोन लावला. पुढची तयारी सुरू केली.
ज्योती येईपर्यंत अंत्यसंस्कार थांबवायचे नाही असे ठरले. रघुनाथरावांनी वकिलांना फोन केला.
वकीलही बाईंचे इच्छापत्र घेऊन आले.
ते आल्यावर रघुनाथ रावांनी जयंत आणि जेनीला सांगितले की इच्छापत्राचे वाचन लगेचच करायचे आहे.
“काका, आईला जाऊन काही तासही झाले नाहीत तर आत्ता कसे इच्छापत्राचे वाचन करायचे म्हणताय. आम्ही त्या मनस्थितीत तरी आहोत का? आईचे अंत्यसंस्कार होऊ देत. ज्योतीला येऊ देत मग इच्छापत्र कधी वाचायचे ते ठरवू” कधी नव्हे तो जयंत रघुनाथरावांवर रागावला.
“त्यांच्या जाण्याचे दुःख तुमच्याएवढेच मलाही आहे रे. पण वहिनींनी मला वारंवार बजावले होते की त्यांच्या अंत्यसंस्काराआधीच इच्छापत्र वाचायचे. “रघुनाथरावांचा कंठ दाटून आला.
वकिलांनी सर्वांसमोर इच्छा पत्राचे सील उघडले.

प्रिय जयंता आणि आरती,
मला पूर्ण कल्पना आहे की हे पत्र तुम्ही वाचताय म्हणजे मी या जगात नाही. आजवर तुम्ही दोघांनी आणि आपल्या फॅक्टरीतल्या सगळ्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलेत. रघुनाथ, मावशी, सगळ्या बायका सगळ्यांनी माझ्या बरोबरीने काम करून आपली कंपनी नावारूपाला आणली.
मला वाटले होते की माझ्या दोन मुलांपैकी कोणीतरी माझ्या कामात रस घेऊन आपल्या कंपनीचा व इतर कामांचा कारभार सांभाळेल. पण ज्योतीला आणि जयंता तुलाही माझ्या बरोबर काम करायची अजिबात इच्छा नव्हती. माझ्या सुनेने जेनी उर्फ आरतीने मात्र ती कसर पूर्णपणे भरून काढली. माझ्यामागे मी फार बॅंकबॅलन्स दागदागिने ठेवलेले नाहीत. तरीही जे काही आहे त्याचे ज्योती आणि तू समसमान वाटेकरी आहात. रहाता राहिला प्रश्न आपल्या फॅक्टरचा . ती मात्र मी आरतीच्या आणि कंपनीतल्या बायकांच्या नावे करत आहे.
माझी रक्ताची नसली तरी कर्माची वारसदार तीच सारी आहेत.
तुम्हाला वाटत असेल की हे सारे माझा अंत्यसंस्कार होण्याच्या आधीच का कळायला हवे? नंतरही वाचता आले असते.
बाळांनो, तुम्हाला माहिती आहे माझा कर्मकांडावर अजिबात विश्वास नाही पण तरीही माझा देह दान न करता त्याच्यावर अग्निसंस्कार व्हावे अशी माझी इच्छा आहे.
माझा मुलगा म्हणून खरेतर जयंता तू मला अग्नी द्यायला हवा पण माझी अशी इच्छा आहे की माझ्या सुनेने जी माझी खऱ्या अर्थाने वारसदार आहे, जिने माझ्या विचारांचा, कामाचा वारसा पुढे न्यायचे काम सतत केले आहे त्या जेनीने म्हणजेच आरतीने मला अग्नी द्यावा. केवळ म्हणूनच मला देहदान केलेले नको आहे.

जेनी, तुम्ही मुली आपल्या आईवडिलांचे घर सोडून नवीन घरी येता. घरातील प्रत्येकाला आपले मानता. घराला घरपण तुमच्यामुळे येते. मुलगा जरी रक्ताने जोडलेला असला तरी तुम्ही सुना मायेने जोडलेल्या असता. आमची आमच्या मुलापेक्षा जास्त काळजी तुम्ही सुना घेत असता. तुम्हाला मानाचे स्थान असतेच पण श्रेय मात्र अनेकदा मुलाला दिले जाते. मला हे बदलायचे आहे. मला तू माझ्याबरोबर अखेरपर्यंत यायला हवी आहेस.
जयंता, मी तुझा हक्क डावलला असे समजू नकोस पण जो हक्क जेनीने कमावला आहे तो तिचा तिला द्यायलाच हवा. हो ना?
ज्योतीसाठी मी वेगळे पत्र लिहून ठेवले आहे. ती आली की ते तिला द्या.
अधिक काय सांगू?

मी सगुणा बाबासाहेब देशमुख पूर्णपणे शुद्धीत व मानसिकरीत्या निरोगी अवस्थेत असताना मनापासून आणि पूर्णपणे विचारपूर्वक हे इच्छापत्र लिहीत आहे.
कळावे, आपली
सगुणा

आज दुपारी सगुणाबाईंची अंत्ययात्रा निघाली. त्यांच्या फॅक्टरीतल्या आयाबायांनी जयंताच्या बरोबरीने सगुणाबाईंच्या प्रेताला खांदा दिला.
आणि
अग्नी असलेले मडके हातात घेऊन सर्वांच्या पुढे जेनी चालत होती.

  • डॉ. समिधा गांधी ( सामाजिक कार्यकर्त्या )
    लेखिका व्यवसायाने दंतवैद्य असून

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular