एकदा आमच्या टॅक्सीत काही प्रवासी बसले होते. त्यांना नाटकाच्या प्रयोगाला जायला उशीर होत होता म्हणुन ते प्रवासा दरम्यान वडिलांशी हुज्जत घालत होते. अक्षरशः आई बहिणी वरून त्यांनी शिव्या दिल्या पण वडिल त्यांना एक अवाक्षरही न बोलता त्यांना नाट्यगृहावर सोडलं आणि शांतपणे निघून आले.
रात्री घरी आल्या नंतर त्यांनी हा प्रसंग सांगितला..
ते प्रवासी ‘ऑल द बेस्ट’ च्या प्रयोगाला चालले होते..!
आपल्या मुलाच्या नाटकासाठी लोकं गर्दी करतायत. या एकाच गोष्टी साठी त्यांनी तो अपमान मुकाट सहन केला. खुप रडलो होतो त्या दिवशी.
सुदैवाने तेंव्हा मला १०० रुपये नाईट मिळत होती..
त्या दिवसापासून त्यांना टॅक्सी चालवणं आता बंद करा म्हणून सांगितलं. टॅक्सी चालवणं त्यांनी बंद केलं तरी ती टॅक्सी त्यांनी विकली नाही कारण त्यांना चिंता होती उद्या जर ह्याच एखाद नाटक नाही चाललं तर काय करणार.
ज्या वेळेस मी पहिली लक्झरी कार ऑटोमॅटिक Honda Accord घेतली आणि त्यांना स्टीअरिंग वर बसवलं त्यावेळेस आम्हा दोघांनाही खुप भरून आलं होतं. त्यानंतर मी अनेक लक्झरी गाड्या घेतल्या.. BMW, Mercedes S Class.
मला आनंद या गोष्टीचा आहे की त्यांच्या हयातीतच मी मला जेवढं शक्य होत ते सगळं सुखं मी त्यांना देऊ शकलो.अर्थात त्यांच्या आशीर्वादाच्या पाठबळावरच मी हा प्रवास केलाय.
आजही माझ्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये आमच्या त्याच टॅक्सीचा फोटो मी लावलेला आहे.
-अभिनेते भरत जाधव (फेसबुकवरून साभार)

मुख्यसंपादक