Homeवैशिष्ट्येअर्नाळा किल्ला-भगवा ध्वजारोहन दिनांक- ०२ जून २०२२

अर्नाळा किल्ला-भगवा ध्वजारोहन दिनांक- ०२ जून २०२२

                  आज, दुर्गसेवक सूरज पाटील सर, यांच्या सहकार्याने अर्नाळा किल्ला मुख्य बुरुजावरील महाराजांचे चित्र असलेला, ध्वज अस्ताव्यस्त स्थितीत फाटलेला होता. हा  ध्वज आम्ही तिथे जाऊन बदलला.

काही दिवसांपूर्वी सूरज सरांना कोणीतरी अर्नाळा किल्ल्याच्या या फाटलेल्या ध्वजाचा फोटो व्हॉट्सॲप केला. तो फोटो त्यांनी “सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान – वसई विरार विभाग व्हॉट्सॲप समूहात” पाठविला आणि आवाहन केले की, हा ध्वज आपण जाऊन बदलला पाहिजे. या ध्वजावर महाराजांचे चित्र होते, त्यामुळे खूपच वाईट वाटले. मी लगेच सूरज सरांना तिथेच विचारले, सर आपल्याला वेळ असेल तर गुरुवारी जाऊन आपण तो बदलून येऊया. सूरज सरांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच उत्तर दिले. “हो मी तयार आहे.”
एव्हढे त्यांचे शब्द ऐकून खूप बरे वाटले. शिवकार्यासाठी जास्त उशीर नको म्हटल्यावर आम्ही गुरुवारची वाट पाहू लागलो.

आज गुरुवार उजाडला आणि सकाळी सरांनी मला फोन केला. सर नाईट ड्युटीवर होते त्यामुळे त्यांना सकाळी यायला उशीर होणार आहे असे मला कळविले. सकाळी नऊ वाजता विरार पश्चिमेस असलेल्या शिव-स्मारकाजवळ आमची भेटण्याची वेळ ठरली होती.
मी नऊ वाजता तिथे पोहचलो. शिवरायांच्या प्रतीमेसमोर मुजरा केला. स्मारकाजवळ जाताना मी पाहिले होते की, प्रतिमेवर धूळ होती. म्हणून मी इकडे तिकडे पाहिले पण पुसण्यासाठी कपडा सापडला नाही. मग काय खिशातला रुमाल काढून प्रतीमेसहीत संपूर्ण चौथरा पुसून साफ केला.
( माझ्या खिशात नेहमी दोन रुमाल असतात हे मला ओळखणाऱ्या बऱ्याच जणांना माहीत आहे. )

थोड्याच वेळात सूरज सर बाईकवरुन माझ्या पुढ्यात येऊन हजर झाले.इथेच एक विनोद निर्माण झाला. माझी नेहमी दाढी वाढलेली असते, सहसा मी कापत नाही, पण केशकर्तनालयातल्या माणसाने घोळ केला आणि मला दाढी कमी करावी लागली होती त्यात केसही कापले होते हे त्यांना माहीत नव्हते. कारण चार दिवसांपूर्वी अशेरी गडावर मोहिमेसाठी असताना त्यांनी मला पूर्ण दाढी आणि केस मध्ये पाहिले होते. त्यांनीच माझे उत्तम असे फोटो त्यावेळी काढले होते.
तर गम्मत अशी झाली की, सूरज सर माझ्या समोर येऊन मला फोन करत होते. मीही म्हटलं मला यांनी ओळखलं नाही तर थोडी मजा घेऊया. मी फोन उचलला नाही. मी टोपी घातली असल्याने त्यांना मला ओळखायला खूपच कष्ट घ्यावे लागले. अहो काय सांगू तुम्हाला माझ्या हातात रिंग वाजणारा फोन घेऊन त्यांच्या समोर उभा ठाकलो तरीही सरांनी मला ओळखले नाही. कमाल आहे ब्वा…!!😂
मग मी डोक्यातली टोपी काढून समोर तसाच उभा राहिलो. त्यांनी माझ्याकडे पाच सेकंद एकटक पाहिले आणि जणू ओरडलेच. अरे बापरे, आण्णा तुम्ही हायत होय. मी ओळखलंच नाही.😂हे त्यांचे शब्द होते.
असो…
इथून मग आमचा अर्नाळा किल्ला प्रवास सुरू झाला. समूहात आम्ही भेटलेल्याचा फोटो पाठवायचा होता म्हणून बाईकवरून जातानाच फोटो काढून समूहात लगेच पाठवला. विशेष म्हणजे फोटो काढताना सूरज सरांनी एक सेकंद कॅमेऱ्याकडे पाहिले आणि लगेच क्लिक करण्यात मी यश मिळविले. हे माझं कौशल्य म्हणा हवं तर.😂
स्टेशन रोड सोडून पुढे बोळींजच्या दिशेने रवाना झालो. पुढे ट्रॅफिक पोलीस चौकीच्या आधी एक डाव्या हाताला वळण आहे, तिथे आल्यावर सर म्हणाले इथून जाऊया का ? मी समोर दिसणाऱ्या साईन बोर्ड कडे बोट दाखवत म्हणालो, तो बोर्ड सरळ जायला सांगतोय आपण सरळच जाऊ. चौकीजवळ उजव्या हाताला वळलो ते थेट अर्नाळा समुद्र किनारा येथे जाऊन थांबलो.

थोडा वेळ तिथल्या छोट्याशा हॉटेल मध्ये नाष्टा करण्यासाठी थांबलो. पण त्या हॉटेल मध्ये प्यायचं पाणी नव्हतं. होतं पण एका मोठ्या बिस्लेरीच्या बॉटल मध्ये साधं पाणी भरून ठेवलं होतं पण त्यात कचरा दिसत होता म्हणून बाहेर जाऊन पाणी आणलं आणि तो दोन दोन वडापावचा नाष्टा अगदी हसत हसत दोघांनीही फस्त केला.
तिथून उठलो तर सरांनी नवीन गम्मत चालू केली. अहो आण्णा तुम्ही या किल्ल्यावर आमच्याबरोबर मोहीमेच्या वेळी आला होतात ना !
ज्या ज्या वेळी मला ते विचारात होते, त्या त्या वेळी मी त्यांना नाही म्हणूनच सांगत होतो. पण माणूस ऐकायलाच तयार नाही. मला हसायला आलं जेव्हा ते एकदम म्हणाले; अहो आण्णा मी बोटीतून उतरल्यावर तुम्हीच मला पाठीमागून हात दाखवत होतात ना !!
काय सांगू राव, इतकं हसलो ना या वाक्यावर विचारू नका.😂😂
कारण मी त्यावेळी मोहिमेला आलो नव्हतो आणि यांचं एकच सुरू होतं, आण्णा तुम्ही आलेलात. तुम्ही मोहीमेला आलेलात !!

या हसण्याच्या वेळात आम्हाला घेऊन जाणारी बोट येताना दिसली आणि आम्ही थोडं सुखावलो. बराच वेळ वाट बघून बघून अगदी कंटाळा आला होता, पण वेळेवर बोट आलेली पाहून दोघेही सुखावलो गेलो होतो.
सूरज सरांनी मला आधीच सांगून ठेवले होते, जाण्याचे आणि येण्याचे १०-१० प्रमाणे २० रुपये एकदाच बोटिमध्ये घेतात. त्याप्रमाणे मी सज्ज होतो.
आता ती बोट आम्ही उभे होतो तिथे न येता लांब कंबरभर पाण्यातच थांबली. आता बोटीतून उतरणाऱ्यांची आणि त्या बाजूला जाणाऱ्यांची एकच झुंबड उडाली. मी थोडा वेळ विचार करून म्हणालो, हे तर लोकल सारखंच झालं. सरांनी ऐकलं आणि माझ्याकडे पाहत हसून म्हणाले चला आता.😂😂
अक्षरशः दोघेही डायरेक्ट उडी मारून ढोपरावर पडून त्या बोटीत सुखरूप आपोआप पोहचलो होतो. अगदी काही मिनिटांतच एवढी गर्दी झाली की, कुणालाच एकाकी उभं राहता आलं नाही. प्रत्येकजण कुणाच्या ना कुणाच्या खांद्यावर हात ठेऊन उभा होता, तर कुणी एकमेकांच्या हाताला धरून उभं होतं, इतकी गर्दी झाली होती.
मी सरांच्या खांद्यावर हात ठेवून उभा होतो. तेव्हढ्यात कोणीतरी माझ्या हातालाही पकडून उभा राहिला. महिला तर एकमेकांच्या हाताला पकडूनच उभ्या होत्या.
तरीही तो पैसे घेऊन जाणारा माणूस अगदी सहज त्या इतक्या गर्दीतूनही वाट काढत वावरत होता. प्रत्येकाला सुट्टे पैसे देत होता. बहुधा त्याला याची नेहमीची सवय असल्याने त्याला हे काम काही अवघड नव्हते. तरीही ही एक कलाच असावी, नाहीतर तो माणूस सहजपणे एव्हढ्या गर्दीत फिरलाच नसता.

शेवटी एकदाची ती बोट पलीकडे जाऊन थांबली.
बरं थांबली ती पण किनारा सोडून काही अंतरावरच.
मी सरांना म्हणालो, चला आताही तीच कसरत करावी लागणार आहे आपल्याला… चला सर.
उतरताना सरांनी एका हातात चप्पल ( त्याच चप्पल ज्यांचा आवाज ऐकून रात्रीची भुतं पळून जातात. कुत्रे मागे लागतात ते वेगळे. ( करा करा वाजणाऱ्या कोल्हापुरी चप्पल.) म्हणून रात्रीच्या वेळी आजूबाजूला बघून चालावे लागते. ) घेऊन आणि मोबाईल सावरत सर बोटीतून उतरले. त्यांच्या मागोमाग मीही माझा मोबाईल सावरत उतरलो.

तिथून उजव्या हाताला एक मंदिर आहे. सरांनी तिथल्या स्थानिक लोकांच्या घरांच्या गल्ली गल्लीतून मला मंदिर जवळ नेले. बाहेरच हात पाय धुवून मंदिरात प्रवेश करण्यासाठी नळ बसविलेला आहे. तिथे हात पाय धुवून आम्ही मंदिरात गेलो. आत जाताना तिथल्या मच्छीमार लोकांनी विणलेले मोठमोठे जाळे सुकण्यासाठी मंदिराच्या अंगणात ठेवलेले दिसले. मंदिरात जाऊन थोडा विसावा घेतला. मंदिरात श्री गणेश, श्री कालिका माता आणि शीतला माता यांच्या मनमोहक अशा सुंदर, सुबक मूर्ती आहेत. या मंदिराचा घुमट विशेष वाटला. गोलाकारी आहेच शिवाय त्यावर छान अशी नक्षी काढून उत्तम रंगसंगतीने रंगविली आहे. मंदिरात गेल्यावर हा घुमट लक्ष वेधून घेतो. मंदिराच्या बाहेर एका चौथऱ्यावर दोन सिंह आहेत जे मंदिराच्या मुख्य दरवाज्याकडे पाहत आहेत. बाजूलाच एक त्रिशूळ अर्धवट स्थितीत पुरलेला किंवा सिमेंटने व्यापून ठेवलेला आहे.

थोडा वेळ विसावा घेऊन आम्ही गडावर निघालो.
गडावर जाऊन पहिला तो ध्वज दिसला, त्याकडे पाहून खूपच वाईट वाटले. फोटोत आणि प्रत्यक्ष पाहण्यात फरक असतो तो आता जाणवत होता. त्या ध्वजावर महाराजांचं चित्र होतं त्यामुळे खूपच अगदी विदारक वाटत होतं.

तरीही तो ध्वज, आपण आपल्या महाराजांना हवेच्या लहरीत मिरवतोय हेच माझे भाग्य समजून तो त्याही स्थितीत इतक्या उंचावर उभा राहून अभिमानाने डौलत उभा होता. असा विचार माझ्या मनात आला.
एक वेळ वाटले इथल्या स्थानिकांना का नाही वाटले हा ध्वज बदलला पाहिजे.
का नाही यांच्या उरात महाराजांविषयी थोडीतरी आत्मीयता जागली.
का नाही यांच्या मनात आले, आपली ओळख याच गडामुळे आहे, तर थोडी मेहनत घेऊन ध्वज बदलुन घेऊया. असे अनेक विचार माझ्या मनात थैमान घालत होते.

एक वेळ वाटले तिथेच वरून ओरडुन सांगावे या सगळ्या जनतेला, अरे महाराज कुणा एकट्याचे नाहीत रे, ते सगळ्यांचे आहेत.
तुमचे, आमचे इथे येणाऱ्या प्रत्येकाचे आहेत.
मग का हे दिसणारे जळजळीत वास्तव नजरेआड जाऊन देता आहात.
का दिसत नाहीय ही अवस्था.
पण नाही…नाही जमले मला असे करायला.
सरांना म्हटलं, “सर बहुतेक महाराजांच्या मनात आपल्या हातून हे कार्य व्हावे असे वाटत असणार म्हणून या इथल्या लोकांना ही सुबुद्धी सुचली नाही.”
सर म्हणाले, अगदी बरोबर आण्णा.
आपल्याच हातून हे कार्य घडणार, हीच महाराजांची इच्छा होती. तीच आपण पूर्ण करण्यास इथवर आलो, नव्हे महाराजांनीच आपल्याला इथपर्यंत आणले आहे.

सर्वप्रथम आम्ही तो ध्वज उतरण्याआधी त्याला मुजरा केला. नंतर ध्वज उतरवून नवीन भगवा ध्वज चढवू लागलो. आता पंचायत होती ती फोटो कोण काढणार ? म्हणून व्हिडिओ चालू करून काही दगडांच्या साहाय्याने मोबाईल समोर ठेवला. परंतु चेहरे व्यवस्थित दिसत नसल्याने सूरज सरांनी तिथून मोबाईल उचलून दुसऱ्या बाजूला नेला पण काही उपयोग नाही. तिथेही चेहरे ठीक दिसत नाही हे पाहून सर म्हणाले, आण्णा तुमचं ठीक आहे हो, पण त्या व्हिडीओत माझाही काही उपयोग नाही. एव्हढे ऐकले आणि दोघांचा तिथेच हशा पिकला.😂😂
सरांनी एक लय भारी टाईपचा विनोद केला होता. हसत हसतच ध्वज बांधून पूर्ण झाला. ध्वज चढवत असताना तिथे एक कुटुंब किल्ला पाहण्यासाठी आले होते. त्यांनी आमच्या कार्याची प्रशंसा केलीच शिवाय आमच्या बरोबर एक फोटो घेण्याचा आग्रह केला. थोडा वेळ सर्वांना थांबवून सूरज सरांनी आपल्या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान-वसई विरार विभागाची व आपल्या संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली.🚩

आता म्हटलेलं आलोच आहोत तर किल्ला फिरून घ्यावा, म्हणून एक एक बुरुज फिरत होतो. गडावर एकूण नऊ बुरुज आहेत. त्यातील मुख्य बुरुज भवानी, भैरव आणि बावा हे आहेत. त्यातल्याच एका बुरुजाच्या मध्यभागी भगवा मानाने आणि अभिमानाने फडकत आहे.
गडावर फक्त बुरुजांसहित तटबंदी बाकी राहिली आहे. तटबंदीची उंची २५ ते ३० फूट इतकी आहे. गड पाहायला गेलं तर खूप मोठा आणि आयताकृती आहे. विहीर आहे. या विहिरीवर सध्या स्थानिक महिला कपडे वैगेरे धुताना दिसतात. विहिरीच्या समोर एक मस्जिद आहे. आधी या जागेवर कबर होती याचेच रूपांतर काही काळाने मशिदीमध्ये झाले. गडावर एक अष्टकोनी तलाव आहे. गडाच्या मध्यभागी काही अवशेष नसल्याने कुठे काय होते याचा अंदाज बांधायला जमले नाही.एका ठिकाणी तुटलेल्या स्थितीत काही भाग आहे, परंतु कशाचा भाग आहे हेही समजले नाही. यासाठी तिथे जाऊन खूप अभ्यास करावा लागेल. एका भेटीत शक्य नाही.

गड फिरत असताना एका ठिकाणी तीन जन बसले होते. समोर प्लास्टिकचे ग्लास भरलेले होते. लांबूनच त्यांच्यावर सरांची नजर गेली. सरांनी तडक जाऊन त्यातलाच एक ग्लास उचलून नाकाजवळ नेला आणि लगेच तसाच भिरकावला. असे अचानक आम्ही त्यांच्यापुढे हजर राहिलेले पाहून ते तिघेही पार चक्रावून गेले. त्यांना आधी सरांनी सौम्य भाषेत समज दिली. तुम्ही जे काही इथे करताय ते योग्य नाही आणि ही ती जागा नव्हे. पण त्यातला एकजण खूपच अरेरावी करायला लागला. त्यावेळी मात्र आमचं शांत असलेलं डोकं फिरलं. त्यांना ज्या भाषेत कळत होतं त्याच भाषेत त्यांना समजावलं. खूप वेळ वादावादी झाल्यावर सूरज सरांनी आपले शाब्दिक अस्त्र चालू केले. सरांनी आपली ओळख जशी सांगितली तसे हे तिघेही पुढच्या दोन मिनिटांत कुठे नाहीसे झाले ते कळलेच नाही. असे आमचे सूरज सर, शांत तितकेच गंभीर आणि वेळ येते तेव्हा खंबीर असणारे आमचे राजे. मी त्यांना राजे म्हणूनच नेहमी संबोधतो.

आता निघण्याची तयारी करावी म्हणालो आणि खाली आलो. सर पुढे आणि मी मागे, असा प्रवास सुरू झाला खरा, पण हा प्रवास थांबता थांबत नव्हता. अहो का ? म्हणून काय विचारताय. आम्हाला येताना जिथे बोटीने सोडलं होतं तो रस्ताच सापडत नव्हता. त्यात तिथली घरे अशी आहेत की इकडून तिकडून गेलं तरी पुन्हा फिरून आम्ही तिथेच येत होतो नाहीतर दुसऱ्याच टोकाला पोहचत होतो. शेवटी सरांनी कुणालातरी विचारले तर ते गृहस्थ म्हणाले की आता समुद्राला भरती असल्यामुळे बोट बंद आहेत. झालं आपलं आता कल्याण, आता आपल्याला इथेच राहावं लागेल असं सरांनी एका दमात म्हटलं. थोडं पुढे चालल्यावर कोणीतरी म्हणाले की बोट चालूच असतात. यावेळी पुन्हा एकदा मनातून आमच्या सुखाचे कारंजे उडत होते. एकमेकांकडे पाहिले आणि तसेच हसलो. मागे पाहिलं तर आम्ही खूप पुढे चालत आलो होतो. म्हणून मग आम्ही हनुमंत बुरुज पाहायचा ठरवलं आणि तिथे गेलो.

गडाच्या काही अंतरावर उत्तरेस एक स्वतंत्र असा हनुमंत बुरुज आहे. या बुरुजावर खूप झाडं आणि वेली वाढल्या होत्या. त्यामुळे बराचसा भाग व्यापला गेला होता. हे सगळं एप्रिल महिन्यात वसई विरार विभाग अंतर्गत घेण्यात आलेल्या मोहीमे दरम्यान काढण्यात आलं होतं. म्हणून हा बुरूज आता लांबूनही सहज दिमाखात दिसतो आहे.
आम्ही तिथे गेलो. बोट यायला अवधी असल्याने थोडा विसावा घ्यायला तिथेच बसलो. तिथेही दोन छोटी मंदिरे आहेत. पण या मंदिरांचे दरवाजे बंद असल्याने कोणत्या देवतेचे मंदिर आहे हे कळले नाही.
काही वेळाने पुन्हा तिथून निघालो. पुन्हा तेच, सर पुढे मी मागे. आता मात्र सरांनी ठरवले होते समोर दिसणाऱ्या टॉवर कडे नजर ठेवत जायचे म्हणजे चुकायला होणार नाही आणि वेळेत बोटिजवळ पोहोचायला होईल.
होय…आम्ही एकदाचे पोहचलो परंतु बोट आली नव्हती. तिथे एक गृहस्थ उभे होते त्यांना विचारले तर ते म्हणाले मी पंधरा मिनिटांपासून इथे उभा आहे पण बोट अजून आलेली नाही. पुन्हा एकमेकांकडे पाहिले आणि आता थांबण्याशिवाय पर्याय नाही असे ठरवून तिथेच थांबलो. पाण्याला खूपच भरती होती. पाणी अगदी उसळ्या मारत आमच्यापर्यंत येत होतं. पण नाही, त्याला आम्ही आमच्या जवळ येऊ देऊ तर शपथ. अशी खेळी मेळी चालू असतानाच बोट येताना दिसली. असे वाटत होते की, ती बोट सरळ येऊन आमच्याजवळ येऊन थांबेल पण नाही, या पाण्यालाही आमच्या पर्यंत पोहचायचेच होते. जणू काही म्हणून ती बोट सुध्दा दुसऱ्या ठिकाणी जाऊन थाबली. आता कसरत करावी लागणार होती. किनाऱ्यावर जी सुकी रेती होती, ती उन्हाने इतकी तापली होती की, चप्पल मध्ये गेली तर पाय भाजत होते. त्यात सूरज सर अनवाणी कसे चालत होते ते त्यांनाच माहीत. पाय तापले की, आण्णा लय गरम आहे हो ही रेती. असे ओरडुन मला सांगत होते. जसे पुढे जात होतो तसं पाणीही जवळ येत होते. कसे तरी बोटिजवळ आलो आणि पुन्हा एकदा त्या कंबरभर पाण्यात कसरत चालू झाली. ध्वज उतरवलेला मी बरोबर घेऊन आलो होतो त्या पिशवीत मोबाईल गुंडाळून ठेवला आणि पटकन बोटीत चढलो. सरांनी आपली चप्पल आणि मोबाईल सावरत अत्यंत चपळाईने बोटीत प्रवेश केला. मागे फिरताना बोटीत माणसे कमी होती. त्यामुळे समोरचा नजारा डोळ्यांना सुखावत होता. बोटीच्या टोकाजवळ जाऊन मला फोटो काढायचा होता; तसं सरांना मी म्हणालो पण बोटीवरच्या काकांनी घोळ केला. ते काका त्या टोकावरून बाजूला होत नव्हते आणि त्यांना सांगायला माझी हिम्मत होत नव्हती. माणूस वयस्कर आणि बोटीचे मालक असल्यामुळे एका फोटोसाठी ते धाडस करणे मला जमले नाही. बोट किनाऱ्याला लागायच्या आधी दोन मिनिटे काकांनी तो कोपरा सोडला. तसा मी एका लहान पोरासारखा पटकन त्या टोकावर जाऊन उभा राहिलो आणि सरांना म्हटलं,
“सर आता काढा फोटो”. बोट किनाऱ्याला लागली आणि आम्ही उतरलो. पहिला मी खिशातून मोबाईल काढून बघितला तर माझा मोबाईल पाण्याने भिजलेला होता. त्याला तिथेच खोलून सुकवला तेव्हा कुठे तो थाऱ्यावर आला.
समोर एक लिंबू पाण्याची गाडी दिसली तिथे दोघांनी एक एक ग्लास लिंबू पाणी घशाखाली घातला आणि सरळ बाईकवर स्वार होऊन निघालो.

इथे एक गंमत झाली बरं का …!!
येताना आम्ही बोलण्यात दंग असताना रस्ता चुकलो आणि दोन किलोमीटरवर पुढे गेल्यावर सरांच्या लक्षात आले तेव्हा म्हणाले…आण्णा…आण्णा
अरेरे आपण रस्ता चुकलो पुन्हा माघारी जाऊया. आता…आता काय ! फिरलो मागे, कुणालातरी विचारले आणि तिथून पहिला राईट मारून आलो तो सरळ जाताना जिथे मी सरांना सांगितले होते. इथे लेफ्ट नको सरळ चला तिथे येऊन पोहचलो. आण्णा आपण लवकर आलो या रस्त्याने इथवर.
मला माझी जातानाची चूक लक्षात आली होती, पण मी काही बोललो नाही. सर म्हणाले असते, गेलो असतो लवकर तर तुमच्या साईन बोर्डच्या नादात थोडे उशिरा पोहचलो.
आता सरळ सरांनी मला विरार स्टेशनला सोडले. थोडा नाष्टा करूया म्हटलं पण सरांनी मला समोरच्या दुकानात दिसणाऱ्या घड्याळाकडे बोट दाखवत तीन वाजले आहेत आता नको असे म्हणाले. सरांना पुन्हा नाईटला जायचं होतं त्यामुळे ते थांबले नाहीत.

मी आपला माझी रोजची पटरी पकडून वीस मिनिटांत घरी पोहचलो. सरांना मेसेज करून पोहचलात का ? विचारले. सरांनी पोहचलो असा मेसेज केला.

आणि असा पार पडला आमचा अर्नाळा किल्ल्यावरील ध्वजारोहणाचा कार्यक्रम किंवा शिवकार्य.
आज जणु या शिवकार्यासाठी आमचीच निवड झाली होती असेच वाटत राहिले. स्वतःचाच अभिमान वाटावा असे कार्य केल्याने स्वतःचीच पाठ शाबासकीने थोपटली.

समूहात फोटो गेल्यापासून सर्वांनी मनापासून शाबासकी दिली होती.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे शिवकार्य आमच्या हातून घडले यासाठी समुहातल्या सर्व सदस्यांचे मनापासून धन्यवाद…!!🙏🚩

✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर- आण्णा
सह्याद्रीचा दुर्गसेवक १७१८४
🚩🙏जय शिवराय🙏🚩

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

6 COMMENTS

    • नमस्कार🙏
      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आपले मनस्वी धन्यवाद…!!💐

- Advertisment -spot_img

Most Popular