माझा भाऊ अमर, अगदी 2 वर्षानी मोठा.. पण दादाच. पप्पा नसायचे अठवडाभर घरी मग खुप वेळ खेळायचो. तो चिडवायचा, रडवायचा पण काळजी ही खूप घ्यायचा माझी.
तेव्हा सिगरेट ची मोकळी पाकीटे, गोट्या, विटीदांडू असे खेळ. मी कायम दादाबरोबर त्याच्या मित्रांच्यात, मी एकच मुलगी सर्वात लहान. हे सगळे खेळ मातीतले, जमिनीवरचे. मग मळलेलो असायचो दोघेही.
सगळ्यात भारी पडायचे पाकीटं जमवणे. मला खेळता येत न्हवते. पण साठा असायचा माझ्या कडे. घरी स्मोकिंग कुणी करत नसे मग पान दुकानाच्या आसपास घिरट्या घालून पाकिटं जमवाजमव. सगळ्यात कमी मिळणारे सगळ्यात भारी हा नियम. काका ते पाकीट द्या ना मला अशी केविलवाणी विनवणी..
मग सगळे पान दुकानवाले काका माझ्यासाठी मोकळी पाकिटं ठेवायला लागले. अगदी क्वचित एखादी सिगरेट राहिली असेल तर ती दुसर्या पाकीटात ठेवून तो अनमोल कोरा हिरा माझ्या कडे सुपूर्द व्हायचा. मग दादाच्या मित्रांच्यात माझा रुबाब असायचा.
असे चालू असताना एकदा पप्पांनी पाहिलेच आम्हाला . धडकी भरली असेल त्यांना, आम्हाला भरली तशीच. कारण मार चुकणारच न्हवता आता… . का ते नंतर कळू लागले, जेव्हा समज आली. आईविना मुलं, आम्ही 1ली 3 री ला, ताई दिदी 9, 7 वी ला. शाळेत जात दुपारी त्या . मग राज्य आमचंच असायचे.
तर काय… मी पुढे दादा मागे मारत, रडत, अशी साग्रसंगीत वरात घरात आली. घरी झाडू होताच ओवाळणी करायला. मग दादाला “भ” वरुन किती संबोधनं…कधीच ऐकली नव्हती अशी. तिला मुलांच्यात घेउन जाउ नको म्हणून सांगीतले ना तुला..हाजार वेळा… बिचारा… मार पण खाल्ला.. उपाशी पण ठेवले. दाराबाहेर ऊभे केले. मला मात्र जेवण मीळाले पण दादा… हिंमत न्हवती पप्पांना बोलायची. मी पप्पा झोपायची वाट पहात होते. पप्पा नेहमीच फळे, खाऊ आणत. जसा घोरलेला आवाज आला हळूच एक सफरचंद आणी 4,5 बिस्किटे खिशात कोंबली.
दादा खा ना रे विनवणी करु लागले. त्याच्या गालावरचे ओघळ सुकले होते . नकोय मला… खा ना रे!! उलट्या हाताने डोळे पुसत.. नकोय मला!! चे पालुपद चालूच होते. पण माझ्याकडेही जादूची छडी होती. खिशात दोन श्रीमंत पाकीटे आणी साधी पण बरीच होती. आत डोकावले.. तारस्वरात सुर ऐकू येत होता.. मग हळूच पाकीटांची झलक दाखवली. लाडीगोडी लावत… खा मग देते.. मग काय… नकोय मला चा रुसवा गळून पडला…डोळ्यात चमक आली भावाच्या… मग ती भुकेला खायला मिळालं, ची होती का मित्रांच्यात मिरवता येणार होतं ह्याची होती कोण जाणे…कारण पप्पा परत जाणार माहिती असायचं. संध्याकाळी शिक्षा होतीच दोघांना नेहमीप्रमाणे. गहू तांदूळ मिसळून समोर ठेवायचे पप्पा आणी आम्ही ते वेगळे करायचे . 2 दिवस मान मोडायची.पण मग लाड ही तेवढेच व्हायचे माझे.
आजही आम्हा चौघात तितकच प्रेम आहे. किंबहुना वाढतच गेले. एकदम पक्की जन्मजात मैत्री. कोणा भावंडांमध्ये वितुष्ट आले आहे असे समजले तर असं कसं वागु शकतात हि भावंड हे कोडंच सुटत नाही.
लेखिका – रश्मी हुले
बोरिवली-मुंबई
समन्वयक – पालघर जिल्हा