‘मृत्युंजय’कार शिवाजीराव
सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हा परिषद ,कोल्हापूर (महाराष्ट्र शासनाच्या) वतीने बांधण्यात आलेल्या समिती दालनाचे आज उद्घाटन होत आहे परंतु एकीकडे यापूर्वी आजरा ग्रामीण रुग्णालयाला ‘मृत्युंजय’कारांचे नाव देण्याचा झालेला प्रयत्न हा यशस्वी झाला की नाही ? असा प्रश्न जाणकारांकडून उपस्थित केला जात असताना दुसरीकडे सुमारे ७० लाख रुपये खर्चून पार्किंग करता पुरेशी जागा नसतानाही बांधण्यात आलेल्या या दालनाची देखभाल कोण करणार ? की एखाद्या संस्थेच्या घशात हे दालन घालून शासन रिकामे होणार? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जर या दालनाची देखभाल होणार नसेल व पहिल्या पावसातच या दालनाला गळत्या लागण्याची शक्यता असेल तर मग दालनाच्या उभारणीचा अट्टाहास कशासाठी? असा साधा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मागील पंचवार्षिक काळात महसूल मंत्री असताना चंद्रकांतदादा पाटील, तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक व आजऱ्याचे दुसरे सुपुत्र जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे तुषार बुरूड यांच्या प्रयत्नातून ‘मृत्युंजय’कारांच्या जन्म गावी त्यांच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने हे दालन उभे झाले आहे. तब्बल पाच वर्षे बांधकाम रेंगाळल्यानंतर कसेबसे काम आटोपून सभागृहाच्या उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण केली जात आहे.
रंगरंगोटी पूर्वी या दालनाची अवस्था पाहिली असती तर निश्चितच उद्घाटनानंतर पहिल्याच पावसात या दालनाच्या स्लॅबला गळत्या लागणार हे स्पष्ट आहे.
वीस-बावीस वर्षांपूर्वी ‘मृत्युंजय’कारांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने अनेकांनी विविध संकल्प जाहीर केले. आजरा ग्रामीण रुग्णालयाला त्यांचे नाव देणे हा त्याचाच एक भाग होता. समारंभ पूर्वक कोनशीला बसवून हा सोहळा उत्साहात पार पाडला गेला प्रत्यक्षात वीस -बावीस वर्षानंतर कागदोपत्री आज ही ‘मृत्युंजय’कारांचे नाव रुग्णालयाच्या लिखापडीत कुठेही दिसत नाही. त्याकरीता कोणी प्रयत्नही केलेले दिसत नाहीत.
शासन दरबारी सेवेत असणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपैकी बहुतांशी अधिकाऱ्यांना मृत्युंजय ही कादंबरी भावली आहे. तसे अनेकांकडून वेळोवेळी सांगण्यात येते. संपूर्ण देशभरात या कादंबरीने खपाचे विक्रम गाठले आहेत. सर्वसामान्य वाचक मात्र कादंबरीची किंमत पाहून इच्छा असूनही कादंबरी वाचू शकत नाही. शासनाला खरोखरच जर ‘मृत्युंजय’कारांच्या साहित्यिक योगदानाची जाण असेल तर त्यांनी अत्यल्प दरात सदर कादंबरी सर्वसामान्य वाचकांकरीता उपलब्ध करून द्यावी. ती प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये शासनामार्फत कशी उपलब्ध होईल याकडे लक्ष द्यावे. मराठी भाषा समृद्धीचे प्रतिक असणारी ही कादंबरी निश्चितच यामुळे सर्वसामान्य वाचकांपर्यंत सहजपणे पोहचेल. यासाठी आज कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या मंडळींकडून प्रयत्नांची अपेक्षा करण्यास कांहीच हरकत नाही.
‘मृत्युंजय’कारांचे श्रद्धास्थान असा परिचय असणाऱ्या शिवाजीनगर घाट परिसरातील ह.भ.प.पू.संत लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज यांच्या समाधी स्थळी अनेक ‘मृत्युंजय’ कार प्रेमी व भक्तगण हजेरी लावत असतात परंतु हा परिसर अद्यापही उपेक्षित आहे.
या परिसरामध्येही सुशोभीकरण करून घेण्याची गरज प्रकर्षाने पुढे येत आहे. याकरिता स्थानिक आमदार प्रकाश आबिटकर हे प्रयत्नशील आहेत.परंतु इतर उपस्थित राहणाऱ्या राजकीय मंडळींनीही योग्य तो निधी लावून या परिसराचे सुशोभीकरण करण्यास हातभार लावण्याची गरज आहे.
या साध्या बाबी जर होत नसतील तर मग अशा कार्यक्रमांचा कशासाठी अट्टाहास…?
अनेकांना कार्यक्रमाचे निमंत्रण नाही
तालुक्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शिक्षण, संस्कृती, सामाजिक, राजकीय,सहकार व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना या कार्यक्रमाचे निमंत्रणच मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे .
स्मृती दालन आहे कुठे?
शहरातील अनेकांना हे स्मृती दालन कोठे आहे याची माहिती नाही. उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोठेही शासकीय यंत्रणेने बॅनर्स लावलेले नाहीत. उद्घाटन झाल्यानंतर दालन पाहण्यासाठी शहरवासीय भेट देणार आहेत. किमान हे दालन उघडे राहील व दालनाची किल्ली शोधावयास लागणार नाही याची खबरदारी आता संबंधितांनी घेण्याची गरज आहे.
ज्येष्ठ पत्रकार ज्योतीप्रसाद सावंत यांच्या फेसबुक वॉल वरून
मुख्यसंपादक