असलं कसलं रे वरूणराजा नाट्य ढगफुटीचं घडलं,
आधीच खचलेल्या लेकरांना तू जलाने असं वेढलं, कोरोनाची हजरी असताना इथं तुझं नी काय नडलं,
दुष्ट कालचक्रात तुझ्या सुखाचं घोडं रे का अडलं,
आपटावं का शीर पाषाणी इतकं अघटित मढलं,
पण कळेल का सांग बाबा तू हे जादाचं का धाडलं….।1।
एक आहे तोवर दुसरं संकट तू पंगतीला का वाढलं,
कोप तुझा की खेळ दैवाचा छताला रे पाणी लागलं,
ढिगाऱ्याखाली मातीच्या चालते बोलते जीवं तू गाडलं,
जगावं का द्यावं लोटून लाटेत विचारांचं काहूर माजलं, पडत झडत सावरत स्वतःला वार संकटाचं झेललं
पण कळेल का सांग बाबा तू हे जादाचं का धाडलं…..।2।
होत नव्हतं गाठीचं महापूरात वाहात्यालं मी पाहिलं, थरकाप डोळ्यांनी बघताना बदाबदा अश्रू वाहिलं,
याचने करीता टाहो फोडून तुझ्याकडे साकडं गायिलं,
थांबवं म्हणून भांडलो मी पण तू नको ते साधलं,
सुख समाधान,स्वातंत्र्य सांग कुठं रे कोंबून ठेवलं,
पण कळेल का सांग बाबा तू हे जादाचं का धाडलं …।3।
मुस्कटदाबी कोरोनाने केली तू तर पुरतं कंबरडं मोडलं,
आशेचा किरण शोधताना गाठोडं व्यापाचं सोडलं,
नाय रे वरुणराजा संसाराचं मूळ तू तोडलं,
दाद मागू कोणाकडं वाऱ्यावर तू आम्हा सोडलं,
करून टाक एकदाचं काय जे तुझ्या मनात भरलं
पण कळेल का सांग बाबा तू हे जादाचं का धाडलं…।4।
काय खाऊ अन काय लेवू पदरी नाय उरलं, जीवन म्हणून संबोधतात त्याने हे काय दावलं,
अकरीत होतं सारं झेलताना ढसाढसा हृदय रडलं,
बाप्पा तू माझा नाही रे राहिला हे मी अचूक हेरलं,
कोणाचं ऐकून रे वाद्या या वळणावर तू आणलं,
पण कळेल का सांग बाबा तू हे जादाचं का धाडलं…।5।
- श्री.कृष्णा शिलवंत
मुख्यसंपादक