ऋतुरंगच्या दिवाळी अंकासाठी डॉ.आरेकर यांनी लेख लिहिला. हे पुस्तक या लेखांचे संकलन आहे
माझं क्षितिज
‘माझं क्षितिज’ हे डॉ. नितीन दत्तात्रय आरेकर यांचं पुस्तक म्हणजे झाकीर हुसेन, शंकर महादेवन, बेगम परवीन सुलताना, तौफिक कुरेशी, जॉनी लिव्हर, मनोज जोशी, नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्ती आणि प्रसंगांबाबत केलेल्या शब्दांकनांचं संकलन आहे. स्वत:ची आई आणि आजी यांच्याबद्दल स्वत: डॉ. आरेकर यांनी लिहिलेल्या दोन लेखांचा समावेशही या पुस्तकात आहे. ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकासाठी डॉ. आरेकर यांनी लेख लिहिले होते. या लेखांचं संकलन म्हणजे हे पुस्तक होय.
या पुस्तकाची सुरुवात होते ती झाकीर हुसेन यांच्या लेखापासून. हुसेन यांच्या तबल्याच्या तालामध्ये जसा माणूस गुंतून जातो तसंच काहीसं या लेखाबाबत होतं. हुसेन यांचं बालपण, तबल्याचं शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांच्या आयुष्यातलं अब्बाजींचं महत्त्व, समकालीन कलाकारांशी असलेला दोस्ताना.. अशा अनेक गोष्टी या लेखातून उकलत जातात. या तालाच्या धुंदीतून आपण बाहेर पडतो तोच शंकर महादेवन यांच्या सुरांत गुंगून जातो. ‘सारं सारं आठवतंय मला..’ या लेखात शंकर महादेवन या गायकाचं अनोखं भावविश्व कळून येतं. पुढे ‘मी आई असते तेव्हा’ या लेखात बेगम परवीन सुलताना यांच्यातील आईपण सहजपणे उलगडत जातं. त्यांच्यातल्या आईपणाचे तरल भाव या लेखातून समोर येतात. ‘अब्बू’ या लेखात त्यांनी वडील इकरामूल माजिद यांच्याविषयीची सय जागवली आहे. वडील अल्लारखाँसाहेब यांच्याविषयी तौकिफ कुरेशी यांनी लिहिलेला लेख म्हणजे एका बापमाणसाचं व्यक्तिमत्त्व हळुवार आकलत जातं. याचबरोबर अभिनेते मनोज जोशी, जॉनी लिव्हर यांच्याही लेखांचा समावेश आहे.
या पुस्तकात एकूण 10 लेख आहेत. त्यापैकी आठ शब्दशः आणि उर्वरित दोन लेख स्वरूपात आहेत. हे लेख वाचण्यासारखे आहेत.
‘माझं क्षितिज’, – डॉ. नितीन दत्तात्रेय आरेकर, डिंपल पब्लिकेशन, पाने-१४९, किंमत- २०० रुपये.
कथा कांद्याच्या प्रवासाची..
कांद्याचे भाव वाढले की सरकार ते तातडीने कमी करण्यासाठी उपाययोजना करते. कारण मध्यमवर्गीयांची नाराजी ओढवून घेणे कोणत्याही पक्षाला परवडत नाही. दिल्लीत कांद्यामुळे भाजपला निवडणुकीत फटका बसल्याचा इतिहास आहे, इतके महत्त्व या विषयाला आहे. ज्येष्ठ पत्रकार योगेश बिडवई यांनी कांद्याची रडकथा या पुस्तकात त्याच्या उत्पत्तीपासून ते व्यापारातील संधी, उत्पादन खर्च त्याचे तंत्र तसेच बाजार समितीमधील व्यवस्था व त्रुटी यांचा वेध घेतला आहे. कांद्याचे भाव वाढले की ग्राहकांना फटका बसू नये म्हणून तातडीने उपाययोजना कराव्यात असा सरकारवर दबाव येतो. मात्र या धरसोड वृत्तीचा शेतकऱ्यांना कसा फटका बसतो, याचे नेमके विवेचन बिडवई यांनी केले आहे. कांदा उत्पादनात चीनचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक आहे. देशामध्ये महाराष्ट्रात ३० टक्के तर मध्य प्रदेशात १७ टक्के कांदा उत्पादन होते. आता २७ राज्यांमध्ये कांदा येतो. नाशिक जिल्ह्यात राज्याच्या ३० टक्क्यांपेक्षा अधिक तर देशातील एकूण उत्पादनापैकी १० टक्के होते. यावरून नाशिकचे कांदा उत्पादनातील महत्त्व लक्षात येते. या पुस्तकात राज्यातील कांदा उत्पादनाचा जिल्हावार आढावा तसेच बाजार समित्यांची माहिती अभ्यासपूर्ण आहे. कांदा उत्पादक, व्यापारी, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे नेते या साऱ्यांशी संवाद साधून कांद्याची ही कथा बिडवई यांनी साकारली आहे. बाजारपेठेत सतत अनिश्चितता का निर्माण होते? शेतकऱ्यांचे प्रश्न, शासनाच्या भूमिकेतील बदल त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या यांची मांडणी या पुस्तकात आहे. अर्थात केवळ त्रुटीच नाहीत तर, कांदा उत्पादकांनी पुढे जाण्यासाठी काय करावे याचेही मार्गदर्शन आहे. कांद्याच्या विपणनात शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात उतरण्याची गरज आहे. त्यासाठी कांदा क्लस्टर, शेतकरी गट स्थापन कराव्यात अशा काही सूचना आहेत.
‘कांद्याची रडकथा- शिवार ते बाजार’, – योगेश प्रकाश बिडवई, द युनिक अॅकॅडमी पब्लिकेशन प्रा.लि., पाने- १९८, किंमत- २५० रुपये.
महेश कोठारेंच्या आठवणींचा खजिना
‘डॅम इट आणि बरंच काही’ हे महेश कोठारे यांचं आत्मचरित्र म्हणजे त्यांच्या लहानपणापासूनच्या आठवणींचा रंगीबेरंगी खजिना आहे. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी, थोडय़ा प्रमाणात मराठी रंगभूमी आणि गेल्या काही वर्षांपासून मराठी छोटा पडदा या क्षेत्रांमध्ये तब्बल ६ दशकं त्यांनी दिग्दर्शन, निर्मिती, अभिनय, लेखन अशी भरपूर मुशाफिरी केली आहे. त्यातही मराठी चित्रपटांचं स्वरूप बदलण्यात महेश कोठारे यांचं बरंच योगदान आहे. विशेषत: ८०च्या दशकात तमाशापटातून मराठी चित्रपटांना बाहेर काढण्याचं श्रेय रास्तपणे सचिन-महेश जोडगोळीला दिलं जातं.
महेश कोठारेंनी बालकलाकार म्हणून आलेले अनुभव अगदी रंगवून सांगितले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीमुळे अनेक दिग्गजांचा सहवास लाभला आणि त्यातून भरपूर शिकायलाही मिळालं. या प्रवासाबद्दल वाचताना मराठी चित्रपट कसा बदलत गेला हेही काही प्रमाणात कळतं. लक्ष्मीकांत बेर्डे, सूर्यकांत लवंदे यांच्यासारख्या कलाकार-तंत्रज्ञ सहकाऱ्यांबरोबर जमलेली जोडी, कामाच्या प्रवासात अशोक सराफ, अण्णासाहेब देऊळगावकर, कमलाकर तोरणे यांच्याबरोबर दुरावलेले आणि पुन्हा जुळलेले संबंध, नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी केलेली धडपड, त्यातून मिळालेलं यश, रौप्य महोत्सव साजरे करणारे चित्रपट, अहंकाराच्या नादात केलेल्या चुका, त्यामुळे घडलेली अद्दल, ढासळलेली आर्थिक परिस्थिती, त्यातून सावरताना केलेली धडपड, कुटुंबीयांची साथ, त्याच्या साहाय्याने अपयशावर केलेली मात या सर्वाचा धांडोळा यामध्ये घेण्यात आला आहे.
बालकलाकाराचं वय उलटल्यानंतर आणि हिरो म्हणून स्वत:ला स्थापित करेपर्यंत त्यांनी वकिली केली. सुशिक्षित आणि सुस्थितीतील कुटुंबात जन्म झाल्यानंतर आई-वडिलांकडून मिळालेली शिकवण, इंग्रजी माध्यमातून शालेय आणि उच्चशिक्षण याचाही त्यांच्या जडणघडणीत प्रभाव दिसतो.
पुस्तकाचं शब्दांकन आणि संपादन मंदार जोशी यांनी केलं आहे. पुस्तक प्रकरणांनुसार लिहिलंय. सलग असतं तर अधिक ओघवतं झालं असतं. पुस्तकाची निर्मितीमूल्यंही महेश कोठारे यांच्या शैलीला साजेशी आहेत- चकचकीत आणि स्टायलिश.
‘डॅम इट आणि बरंच काही’ – महेश कोठारे, संपादन आणि शब्दांकन- मंदार जोशी, पाने-२८६, किंमत- ८९९ रुपये.
विशुद्ध विनोदाचे चांदणे
दु:खे चिरंतन असतात. त्यांनी कुणालाच सोडलेलं नाही. ती उगाळत बसली तर गुणाकाराची पुटं तयार होत जातात आणि वजाबाकी केली तर विरळ होऊ शकतात; पण त्यासाठी हसरी मानसिकता मात्र हवी. हेच सूत्र आहे विनोदी कथालेखक अशोक मानकर यांच्या नव्याने प्रकाशित झालेल्या ‘चंद्राबुडीचा ब्लॉग’ या कथासंग्रहातील कथांचे. नाराजीचा सूर न आळवता, दु:खांवर मात करणं शिकवणाऱ्या या कथा म्हणजे जणू विशुद्ध विनोदाचे चांदणेच! या कथासंग्रहात एकूण ११ कथा आहेत. विषयांचे वैविध्य हे मानकर यांच्या कथेचे एक वैशिष्टय़.
या कथा पूर्णत: हास्यकथा नाहीत. विनोदी कथात्मक साहित्यापेक्षा प्रकृतीने त्या काहीशा वेगळय़ा आहेत. त्यांचे वाङ्मयीन व्यक्तित्व बहुिपडी आणि बहुपेडी असले तरी मानकर हे मुळात कथालेखक आहेत; पण कथेचा उपयोग त्यांनी केवळ विनोदनिर्मितीचे एक साधन म्हणून केलेला नाही. त्यांच्या कथालेखनामागील प्रेरणा ही विनोदनिर्मितीची नाही. कथेचे एक स्वयंभू मूल्य लाभलेल्या या कथा आहेत. टवटवीत विनोद आणि भावपूर्ण करुणा हा त्यांच्या कथांमधून ओघाने येणारा भाग आहे. त्यांच्या कथानिवेदनात विनोदापेक्षा जीवनमूल्यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचे लक्षात येते. एका डोळय़ात आसू आणि दुसऱ्या डोळय़ांत हसू असा ठसा या कथांमुळे मनावर उमटतो.
यातील काही कथा नागरी वाचकांना मात्र कृत्रिम, पोकळ आणि भपकेबाज वाटण्याचा संभव आहे; पण बलस्थाने आणि दुर्बलस्थाने या दोघांचा विचार करता या संग्रहातील दुर्बलस्थाने ही नगण्य असल्याचेच आपल्याला दिसून येते. त्यांच्या कथांमधून भेटणारी माणसं सुगंधासारखी आपल्या मनात दरवळत राहतात. त्यांच्या कथांमधील ताजे टवटवीत अनुभव माणसांमध्ये नव्या प्रेरणा आवाहित करतात. जीवन कसं असावं, हे समर्थपणे सांगणारी मंडळी मानकर यांच्या कथांमधून आपल्याला भेटते, हे या कथांचं वैशिष्टय़ आणि मोठेपण होय. निर्मळ आचार-विचार अशी साधी जीवनसरणी असलेली अनेक माणसे केवढय़ा तरी ताकदीनिशी या कथांमधून आपल्या भेटीला येतात. ही साधी माणसे आपले मन विलक्षण वेधून घेतात.
मानकरांच्या कथासृष्टीचा विश्लेषणात्मक विचार करायचा झाल्यास त्यांच्या कथा या जीवनाभिमुख आहेत, असे आपल्याला म्हणता येईल. मानवी जीवनाची गहनता, ग्रामीण जनांच्या मनोव्यापारांची व्यामिश्रता त्यांच्या कथांत आहे. मानकर यांच्या विनोदी कथेत नवता आहे. त्यांनी आपल्या कथांना दिलेला आशय अनेक दृष्टींनी लक्षणीय वाटतो. हा आशय समाजसापेक्ष आहे. या कथांमध्ये सामाजिकता आहे. सामाजिक मनोविज्ञान आहे. विनोदी साहित्याचा जो प्रमुख प्रवाह आहे, त्यात विलीन होताना या कथांचे वेगळेपण आणि ठळकपण म्हणूनच प्रकर्षांने जाणवते.
‘चंद्राबुडीचा ब्लॉग’, – अशोक मानकर,मेनका प्रकाशन, पाने-१७६, किंमत-२७५ रुपये.