(१) निसर्गाला जीवसृष्टी निर्माण करायला ही पृथ्वीच का आवडली असावी हे तो निसर्गच जाणो. पण ग्रहताऱ्यांचे विशाल आकाश फिरते ठेऊन त्यातला एकच सूर्य काय निवडायचा, मग त्या सूर्याचे तेज, त्याचा सूर्यप्रकाश बरोबर घेऊन पृथ्वीवर हवा, पाणी व जमीन या निर्जीव गोष्टी काय निर्माण करायच्या, मग सूर्यप्रकाश, हवा, पाणी, जमीन यांच्यातून विविध गुणधर्माचे नानाविध निर्जीव पदार्थ काय बनवायचे, पुढे मग याच निर्जीव पदार्थांतून विविध गुणधर्मांचे नानाविध सजीव पदार्थ काय बनवत पुढे जायचे म्हणजे उत्क्रांती काय करायची, ही उत्क्रांती करीत पुढे जात असताना निर्माण झालेल्या विविध सजीव, निर्जीव पदार्थांना एकमेकांवर अवलंबून ठेवीत त्यांना एकमेकांशी गुंतवून काय ठेवायचे, मग त्या गुंतवणूकीतून त्यांना हालचाल काय करायला लावायची व मग या हालचालीला नियंत्रित करणारा कायदा काय बनवायचा, निसर्गाचे हे असे वागणे खरंच फार आश्चर्यकारक आहे.
(२) पृथ्वीवर उत्क्रांती करताना निसर्गाची पण गोची झालेली दिसतेय. पदार्थांना घट्ट करावे तर त्यांचे मठ्ठ दगड होतात आणि त्यांच्यात चेतना घालून थोडे सैल करावे तर हे पदार्थ सैरभैर होतात. मग त्यांना आवरून शिस्तीत हालचाल करायला लावण्यासाठी कायदा बनवा आणि मग त्या कायद्याची एक व्यवस्था बनवा, त्या व्यवस्थेला व्यवस्थित ठेवण्यासाठी व्यवस्थापक नेमा हे सर्व उपद्व्याप पुढे आलेच. हे भन्नाट उपद्व्याप निसर्गाने केले आहेत व अजूनही तो ते करीतच आहे याचा अनुभव पदोपदी येत आहे.
(३) उत्क्रांतीतून शाकाहारी प्राणी निर्माण केले व त्यांना जगण्यासाठी वनस्पतींचे मोकळे रान, कुरण निर्माण केले तर हे शाकाहारी प्राणी त्या वनस्पती खाऊन खाऊन फुगले, माजले व मग मस्तवाल झाले. त्यांची मस्ती जिरवण्यासाठी मग निसर्गाने उत्क्रांतीतून हिंसक मांसाहारी जनावरे निर्माण केली. आता ही हिंस्त्र जनावरे पण इतकी मस्तवाल झाली की शाकाहारी प्राण्यांचे जगणेच त्यांनी अवघड करून टाकले. मग निसर्गाने पुढील उत्क्रांतीतून संमिश्र प्रवृत्ती असलेला अर्ध शाकाहारी व अर्ध मांसाहारी माणूस बनवला व त्याच्या डोक्यात बुद्धीमान मेंदू यासाठी घातला की त्याने निसर्गाचे सर्व निर्जीव पदार्थ, सर्व शाकाहारी प्राणी व सर्व हिंस्त्र मांसाहारी प्राणी यांच्यात योग्य संतुलन साधत पृथ्वीवरील साधनसंपत्तीचे व्यवस्थापक व्हावे.
(४) पण कसले काय? निसर्गाची इथे पण गोची झाली. निसर्गानेच बनविलेल्या या बुद्धीमान माणसाला स्वतःच्या बुद्धीचा अती गर्व झाला. गर्वसे कहो हम मानव है, अशी आरोळी ठोकून तो निसर्गालाच आव्हान देऊ लागला. पृथ्वीचे व्यवस्थापन धड नीट करता येत नाही, अती शहाणपणा करून धर्म, वंश, वर्ण, जाती, मग पुढे भांडवलशाही काय, साम्यवाद काय, नद्या, नाले, हवा, पाणी, ध्वनी यांचे प्रदूषण काय या असल्या गोष्टी पृथ्वीवर वाढवून ठेवल्या आणि आता मंगळावर स्वारी करायला निघालाय हा माणूस! म्हणजे तिथेही ही असली घाण करून ठेवणार हा माणूस!
(५) या विज्ञानाचा अभ्यास करता करता मी जेंव्हा मानवाला मानवानेच नियंत्रित करणाऱ्या कायद्याच्या अभ्यासाकडे वळतो तेंव्हा तिथे दिवाणी कायदा व फौजदारी कायदा असे दोन प्रमुख कायदे मला दिसतात. मी या कायद्यांना माझीच नावे दिली आहेत. दिवाणी कायद्याला मी शाकाहारी कायदा म्हणतो व फौजदारी कायद्याला मी मांसाहारी कायदा म्हणतो. या फौजदारी कायद्याचे अस्तित्व मानव समाजात का आहे तर माणसातले हिंस्त्र जनावर मरता मरत नाही. काहीजण त्याला राक्षसी वृत्ती असे म्हणतात. माणसाला धड शाकाहारी राहता येत नाही व धड मांसाहारी राहता येत नाही. माणूस मधल्या मध्येच लटकतोय नव्हे त्या निसर्गानेच त्याला असा मधल्या मध्ये लटकवलाय. म्हणजे तो अती शहाणपणा करून निसर्गाला आव्हान देणार नाही असा काहीसा निसर्गाचा हिशोब असावा.
- ॲड.बी.एस.मोरे©
मुख्यसंपादक