Homeआरोग्यपितृपक्ष किंवा पितृपंधरवडा

पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा

पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात.

वेदांच्या पितृयज्ञाला पुराणांमध्ये विस्तार मिळाला आणि त्याला श्राद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. पण जेव्हापासून या पक्षात पितरांच्या श्राद्धाची परंपरा सुरू झाली तेव्हा पासून आजतायगत या परंपरेत फारसे बदल झाले नाही. ही परंपरा देखील प्राचीन काळापासून सुरूच आहे.

श्राद्धाचा अर्थ श्रद्धेने आपल्या पितरांना प्रसन्न करणे आहे. सनातन मान्यतेनुसार जे नातलग किंवा नातेवाईक आपले देह सोडून गेले आहेत, त्यांचा आत्मेस सद्गती मिळण्यासाठी खऱ्या भक्तिभावाने केले जाणारे तर्पण श्राद्ध म्हणवले जाते. अशी आख्यायिका आहे की मृत्यूचे देव यमराज या पितृ पक्षात किंवा श्राद्ध पक्षात या जीवांना मुक्त करतात, जेणे करून ते आपल्या नातेवाईकांकडे जाऊन तर्पण ग्राह्य करू शकतील.

श्राद्धाचे उपदेश दिल्यानंतरच श्राद्ध कर्माची प्रथा सुरू करण्यात आली आणि हळू हळू करत हे समाजातील प्रत्येक वर्णात प्रचलित झाली.

पितृ पक्ष योग कधी येतो –

हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्व आहे. पितृपक्ष हे तब्बल 16 दिवस पितरांसाठी समर्पित असतो. शास्त्रानुसार श्राद्ध पक्ष हे भाद्रपदाच्या पौर्णिमे पासून सुरु होऊन भाद्रपद महिन्यातील अमावस्या पर्यंत चालतात. भाद्रपदाच्या पौर्णिमेस त्या लोकांचेच श्राद्ध केले जाते ज्यांची मृत्यू वर्षातील कोणत्याही पौर्णिमेला झाली असेल. शास्त्रात म्हटले आहे की वर्षातील पक्षाच्या कोणत्याही तिथीला कुटुंबीयांची मृत्यू झाली असल्यास त्यांचे पक्ष किंवा श्राद्धकर्म त्याच तिथीला करावं.

महाभारताच्या शिस्त पर्वात सर्वांत प्रथम झालेल्या श्राद्ध विधीबाबत काही वर्णने आढळतात. यानुसार, महातपस्वी अत्री ऋषींनी सर्वप्रथम श्राद्ध विधी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. अत्री ऋषींनी महर्षी निमि यांना श्राद्ध विधीबाबत उपदेश केला. यांनतर गुरुने दिलेल्या उपदेशानुसार, महर्षी निमि यांनी श्राद्ध विधी केला. महर्षी निमि यांनी केलेला श्राद्ध विधी पाहून अन्य ऋषी आणि मुनींनी आपापल्या पूर्वजांना अन्न आणि पाणी अर्पण केले. नियमितपणे केल्या गेलेल्या या विधीचे अन्न आणि पाणी ग्रहण करून देवता आणि पूर्वज तृप्त झाले, असे सांगितले जाते.

महाभारताच्या युद्धानंतर युधिष्ठिराने कौरव आणि पांडवाच्या पक्षामधील ठार झालेल्या सर्व वीरांचे केवळ अंत्यसंस्काराच केले नाही तर श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून की आपल्याला कर्णाचे देखील श्राद्ध करावयास हवे. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले की कर्ण तर आपल्या कुळाचे नाही तर त्यांचे श्राद्ध मी कसे करू? त्याचे श्राद्ध तर त्यांचा कुळातील लोकांनी केले पाहिजे. या वर प्रथमच भगवान श्रीकृष्ण उलगडला करतात की कर्ण पांडवांचे थोरले बंधू असे.

हे लक्षात घेण्या सारखे आहे की भगवान श्रीरामाने त्यांचा वडिलांचे श्राद्ध केले होते, याचा अर्थ असा की याचा उल्लेख रामायणात देखील आढळतो. म्हणजे की महाभारत काळापूर्वी पासून श्राद्ध करण्याची परंपरा वैदिक काळापासून सुरू आहे. वेदांमध्ये देवांसह पितरांच्या स्तुतीचा उल्लेख करण्यात आले आहे.

कोण असतात पितरं –

ज्या कोणाच्या कुटुंबात मग ते विवाहित असो किंवा अविवाहित, लहान मुलं असो किंवा वृद्ध, स्त्री असो किंवा पुरुष मरण पावले असल्यास त्यांना पितरं असे म्हणतात. पितृपक्षात मृत्यू लोकांतून पितरं पृथ्वी वर येतात आणि आपल्या कुटुंबियांना आशीर्वाद देतात. पितृपक्षात पितरांच्या आत्मेस शांती लाभावी म्हणून तर्पण केले जाते. पितरं प्रसन्न झाल्यास घराला सौख्य आणि शांतता लाभते.

श्राद्ध पक्षाची तिथी आठवत नसल्यास –

पितृपक्षात पितरांची आठवण आणि त्यांची उपासना केल्याने त्यांच्या आत्मेस शांती लाभते. ज्या तिथीला कुटुंबीयांची मृत्यू होते त्याला श्राद्ध तिथी म्हणतात. बऱ्याचश्या लोकांना त्यांचा कुटुंबीयांची मृत्यू तिथी देखील आठवत नसते. अश्या परिस्थितीत शास्त्रात त्याचे निरसन देखील सांगितले आहेत.

शास्त्रानुसार एखाद्याला आपल्या पितरांच्या मृत्यूची तारीख किंवा तिथी माहित नसल्यास अश्या परिस्थितीत भाद्रपद अमावास्येला देखील तर्पण करू शकतात. या अमावस्येला सर्वपितृ मोक्ष अमावस्या देखील म्हणतात. या व्यतिरिक्त एखाद्याची अकाल मृत्यू झाली असल्यास त्यांचे श्राद्ध चतुर्दशी तिथीला करतात. अशी आख्यायिका आहे की वडिलांचे श्राद्ध अष्टमीला आणि आईचे श्राद्ध नवमी तिथीला करण्याची मान्यता आहे.

विधीचे स्वरूप –

महालय श्राद्धात कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे पिंडरूपाने स्मरण –पूजन करण्याची परंपरा आहे. यामध्ये दिवंगत आई, वडील, आजी, आजोबा, पणजी, पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ-बहीण, काका-काकू, मामा-मामी, मावशी, आत्या, सासू-सासरे, व्याही, विहीण व अन्य नातेवाईक या सर्वाना उद्देशून पिंडदान करतात. आपण विविध गुरूंकडून आयुष्यभर काही ना काही शिकत असतो, आणि काही लोकांना आपण शिकवत असतो. त्यामुळे या निमित्ताने निधन पावलेले आपले गुरू आणि शिष्य त्यांचेही आपण स्मरण करतो. आपले हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त, आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते. याखेरीज जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या आपल्या ओळखीच्या एवढेच नव्हे तर, अनोळखी असलेल्या दिवंगत व्यक्तीना उद्देशूनही हे श्राद्ध करतात. जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात.

पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार दिशांना चार धर्मपिंडे देण्याची पद्धत या [[श्राद्ध|श्राद्धात}} विशेषकरून आहे. चार दिशांना मृत झालेल्या ज्ञात-अज्ञात जीवांसाठी यजमान हे पिंडदान करतात.

महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन वगैरे विधी करावयाचे असतात. योग्य तिथीवर महालय करणे अशक्य झाल्यास पुढे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथीला महालय केला तरी चालतो.

सर्वपित्री अमावास्या –
भाद्रपद अमावास्येला मातामह श्राद्ध (आईच्या वडिलांचे श्राद्ध) असतेच, पण या शिवाय, या दिवशी ज्यांचा मृत्युदिन नक्की माहीत नाही त्या सर्वच पितरांचे श्राद्ध करण्याचाही प्रघात आहे.तसेच महालयातील विशिष्ट तिथींना करण्यात येणारे श्राद्ध कोणत्याही कारणाने किंवा अडचणीमुळे राहिले असेल तर ते या दिवशी करता येते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular