Homeमुक्त- व्यासपीठपुन्हा तालिबान ?

पुन्हा तालिबान ?

मुळाक्षरांतून शब्द, शब्दांतून वाक्ये, वाक्यांतून परिच्छेद, परिच्छेदांतून निबंध लिहायला किंवा भाषण बोलायला शिकायचे आणि अचानक दहशतवादी गटाने शस्त्राच्या धाकावर हे जे काही तुम्ही शिकला आहात ते विसरा व दुसरी मुळाक्षरे शिका असे सांगितले तर सुशिक्षित मनांना काय वाटेल? मूलतत्त्ववाद्यांचे खूळ हे असे आहे. त्यांना पुन्हा मुळाकडेच जायला म्हणजे नागडे, जंगली व्हायला फार आवडते. सुसंस्कृत समाजातही नग्नतेचे आकर्षण वाटून घरातून बाहेर सार्वजनिक जीवनातही नागडे फिरावे असे वाटणारे असेच काही मूलतत्त्ववादी आहेतच की! जंगली आहार व विहार हेच माणसाचे मूळ आहे म्हणून का मग पुन्हा त्या मुळाकडे परत जावे? शस्त्रांच्या धाकावर जर मूलतत्त्ववादी आधुनिक जगाला पुन्हा नागडे व्हा, जंगली व्हा असे सांगू लागले तर मग आधुनिक जगाने काय करावे?

मुळे असलेले झाडाचे खोड हे झाडाचे मूळ. पण फुला, फळांनी बहरलेले झाड तोडून पुन्हा चला त्या झाडाच्या खोडाकडे असे म्हटले तर कसे वाटेल? माणसे मोठी झाली तरी त्यांना लहानपणाचे आकर्षण मरेपर्यंत वाटत राहते. लहानपण देगा देवा असे ती मृत्यूशय्येवर सुद्धा म्हणत राहतात. पण हे शक्य आहे काय? बाळ कायम लहानच राहणे अशी निसर्गाची रचना नाही. लहान बाळ हे तरूण होणार व म्हातारे होऊन मरणार अशीच रचना आहे निसर्गाची! मग पुन्हा ते लहानपण देगा देवा हे खूळ का? असे मूलतत्त्ववादी खूळ काय कामाचे?

निसर्गाच्या मूलभूत विज्ञानाला मनुष्याने त्याच्या बुद्धीने तांत्रिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय असे अनेक सोयीस्कर फाटे फोडले आहेत. हे फाटे मानवी जीवन स्थिर, निश्चित, सुखी व शांत करण्यासाठीच ना! राजकीय पाठिंबा म्हणजे तरी काय हो! खरं तर हा शस्त्रबळाचा पाठिंबा! हा राजकीय पाठिंबा मानव समाजाला पुन्हा मागे नेणाऱ्या मूलतत्त्ववादी धार्मिकतेला द्यायचा की आधुनिक तांत्रिकता व आर्थिकता यांच्या प्रगतीला द्यायचा हे मानवी बुद्धीला ठरविण्याची वेळ आता आली आहे. अफगाणिस्तान मधील तालिबानी सत्तासंघर्षातून जगाला हा संदेश मिळालेला आहे.

  • ॲड.बी.एस.मोरे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular