एक छोटीशी जांभई देऊन आपल्या करकरणाऱ्या खुर्चीवरुन रखवालदार काका उठले. गेला अख्खा आठवडा त्यांची नाईट ड्यूटी चालू होती. दिवसा कितीही प्रयत्न केला तरी त्यांना व्यवस्थित झोप यायची नाही त्यामुळे आता तर त्यांना अगदी गळून गेल्यासारखे झाले होते. पण आपले काम चोख बजावण्याची सवय इतकी मुरलेली होती की आजारी असले तरीही ते रात्रभर आपली ड्यूटी व्यवस्थित करत. आता वयाप्रमाणे त्यांच्या हालचाली मात्र थोड्या मंदावल्या होत्या. आपली झोप उडवण्यासाठी अधूनमधून जवळच्या टपरीवर जाऊन त्यांनी चहा प्यायला सुरुवात केली होती.आत्ताही त्यांना चहाचीच तल्लफ आली होती. बारासाडेबाराच्या सुमारास चहावालाही आपली टपरी बंद करून घरी जायचा. जेव्हा जेव्हा काकांची ड्यूटी असायची तेव्हा तो चहावाला त्याच्याकडचा उरलेला चहा एका थर्मासमध्ये भरून काकांना द्यायचा. त्याची आणि काकांची मैत्रीच झाली होती म्हणाना.
काकांनी आश्रमाच्या चहूबाजूंनी एक फेरी मारली. जवळच्या बाटलीतून पाण्याचे दोन घोट प्यायले. थर्मासमधला थोडा चहा कपात ओतून घेतला. आजूबाजूला नीरव शांतता होती. त्यांना स्वतःच्या चहा पिण्याचा आवाज पण मोठा वाटत होता. काका स्वतःशीच विचार करत चहा पित होते.
त्यांना खरेतर दिवसाची ड्यूटी खूप आवडायची. अनाथाश्रमातल्या मुलामुलींचा दिवसभर किलबिलाट चालू असायचा. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात, वेळप्रसंगी त्यांची भांडणे सोडवण्यात कधीकधी त्यांची समजूत घालण्यात त्यांचा वेळ मजेत जायचा. या मुलांबरोबर रहायला मिळते म्हणून त्यांनी त्यांच्या एजन्सीला विनंती करून आश्रमावरची ड्यूटी मागून घेतली होती. तसेही ज्या ठिकाणी वरकमाई नाही अशा ठिकाणी एजन्सीतले इतर रखवालदार जायला नाखूष असत त्यामुळे एजन्सीवालेही काहीही खळखळ न करता त्यांना ती ड्यूटी द्यायचे.
या लहानलहान मुलांच्या सहवासात काकाही आपले अपत्यहीन असल्याचे दुःख विसरायचे.
त्यांची बायको बायजा होती तेव्हा ती माऊलीही या मुलांसाठी काहीबाही बनवीत असे. तिला नवनवीन पदार्थ करून खाऊ घालायची भारी हौस होती. ती दोन घरी स्वैपाकाचं काम करायची. त्या घरात शिकलेले अनेक पदार्थ ती आपल्या घरी बनवून बघे आणि मुलांनाही खाऊ घाले. त्या दोघांच्या संसारात काटकसरीने राहून जे पैसे उरायचे ते सगळे पैसे या लहान मुलांना खाऊ घालण्यात नाहीतर त्यांच्या आवडीच्या वस्तू विकत घेण्यासाठी ती वापरत असे. त्या दोघांच्या आयुष्यात ही मुले म्हणजे आनंदाचा झरा होती.
आश्रम चालवणाऱ्या ताईंना देखील या दोघांचे खूप कौतुक वाटायचे. त्या नेहमी म्हणत” अरे या मुलांसाठी किती करता तुम्ही?”त्यावर ती दोघही म्हणायची, “कुठं काय जास्त नाही हो ताई. पोटचं पोर असतं तर केलच असतं ना त्याच्यासाठी. आता आम्हाला पोटचे पोर नाही दिले देवाने मग ही सगळी आमचीच पोरं मानतो आम्ही.”
साध्या तापाचं निमित्त होऊन बायजा गेली आणि रखवालदार काका आणखीच एकाकी पडले. त्यांना सारखे वाटायचे देवानं एखाद तरी पोर पदरात घालायला हवं होतं. मुलगा मुलगी काही पण असतं तरी चाललं असतं. त्यांना नेहमी आश्चर्य वाटायचे, कसे काय आईबाप पोटच्या पोरांना इथे या आश्रमात ठेवून जातात कोण जाणे. त्यांनी पेपरात पण वाचले होते की लोक मुलीचा गर्भ असेल तर आधीच पाडतात किंवा मुलगी जन्माला आली तर तिला अशा आश्रमाच्या पायरीवर सोडून जातात. त्यांनी अनेकवेळा तर स्वतःच्या हाताने अशा अनेक मुली आश्रमाच्या पायरी वरुन उचलून आत नेऊन सोडल्या आहेत. इतक्या बारकाईने रखवालदारी केली तरी कसे, केव्हा, कुठून कोणीतरी असे बाळ आणून ठेवते कळायचेच नाही.
अशा मुलांचे आईबाप भेटले तर त्यांना आपल्यासारख्यांची परिस्थिती दाखवली पाहिजे. मूल व्हावे म्हणून दवाखान्याच्या पायऱ्या झिजवणाऱ्या, जगातल्या सगळ्या देवांना साकडे घालणाऱ्या, व्रतवैकल्ये करणाऱ्या जोडप्यांची भेट घ्यायला सांगायला हवे. त्यांना सांगायला हवे “अरे देव तुमच्या पदरात विनासायास पोर घालतो त्याची तुम्हाला किंमत नाही. कसली निवड करता मुलगाच पाहिजे म्हणून? मुलीच्या गळ्याला नख लावता?काहीच कसं वाटत नाही? या देवाला पण ना जिथे नको तिथे भरपूर द्यायची आणि गरज असेल तिथे मात्र धरती कोरडी ठेवायची, असे करण्यात काय गंमत वाटते त्याचे त्यालाच ठाऊक.
आज चहा पिताना त्यांच्या मनात या सगळ्या आठवणी एका मागोमाग येत होत्या. तितक्यात त्यांच्या कानावर लहान मुलाच्या रडण्याचा बारीक क्षीण आवाज आला. सरावाने त्यांनी आजूबाजूला पाहिले. कोणीतरी भर्रकन तिथून दूर गेल्याचा त्यांना भास झाला. करकरणाऱ्या खुर्चीवरुन उठून सावकाश ते आश्रमाच्या पायरी जवळ गेले. एक सुस्कारा सोडून ते स्वतःशीच पुटपुटले, “या महिन्यातली ही चौथी!”
समोरच्या भिंतीवर “बेटी बचाव, बेटी पढाओ” ची जाहिरात त्यांना आणि जगाला वाकुल्या दाखवत होती.
- डॉ. समिधा गांधी
मुख्यसंपादक