आजच्या शिवराजाभिषेक दिनी
तुमच्याच हार घातलेल्या प्रतिमेला
आणि सजावट केलेल्या रायगडाला पाहायला,
गडावर तुडूंब गर्दीने आलेल्या मावळ्यांना भेटायला
महाराज, आज तुम्ही हवे होतात !!
गडावर उधळलेल्या भंडाऱ्यात
एक एक मावळा न्हाऊन निघालाय
तुमच्या चरणांवर मस्तक ठेवल्यावर
शिवभक्तांच्या अंगावर इंच इंच चढलेलं मांस पाहायला महाराज, आज तुम्ही हवे होतात !!
एक दिवसाची शिवभक्ती,
शरीरावर चढवलेले तुमच्या नावाचे कपडे,
खुलून दिसताना, मनातून बेधुंद होऊन
तुमच्या नावाच्या घोषणांची अस्मानी ललकारी ऐकायला
महाराज, आज तुम्ही हवे होतात !!
ज्यासाठी तुम्ही स्वराज्य निर्माण केलं
गडकोट बांधले, भक्कम केले
शत्रूंच्या तावडीतून गडकिल्ले सोडवून आणून
स्वराज्य नावाचं ऐश्वर्य उभं केलं
त्याची आपल्याच माणसांकडून होत असलेली पडझड
पाहायला,
महाराज, आज तुम्ही हवे होतात !!
आज तुम्ही असता तर, म्हणाला असता
अरे माझ्या मावळ्यांनो
यासाठीच का मी मावळे गोळा केले होते
माझे मावळे शरीराने राकट होतेच, पण त्यांच्यात एकनिष्ठता होती, मनाचा तोल गेला तरी सावरण्याची ताकद होती, मग तुम्ही का असे गंज लागलेल्या विचारांनी पछाडले आहात.
उठा आणि सज्ज व्हा, राखा हे ऐश्वर्य, हे वैभव.
सांगा ओरडून जगाला याच मातीत आम्ही जन्मास आलो, याच मातीने आम्हांस जगणे शिकविले, मग आम्ही याच मातीला पुजनार, इथे कोण आडवा येईल त्याला त्याची जागा आम्हीच दाखवणार…
हेच__ हेच बोलायला, आम्हां दुर्ग सेवकांचे मनोबल, धैर्य वाढवायला
महाराज, आज तुम्ही हवे होतात !!
✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर- आण्णा
सह्याद्रीचा दुर्गसेवक १७१८४
🚩जय शिवराय🚩
समन्वयक – पालघर जिल्हा