Homeवैशिष्ट्येमहिला दिन की महिला दीन

महिला दिन की महिला दीन

१) आज काय तुमची मज्जा आहे. कपडे खरेदीवर सुट काय, स्पेशल इव्हेंट काय तुमचा वुमन्स डे होतो आम्ही अगदी गरीब बिच्चारे होऊन जातो.
बर, मी काय म्हणतोय, उद्या काय दिवसभर सेलिब्रेशन करायचय ते कर पण जाताना आमच्या जेवणाचं काय ते बघून जा. आणि हो अगदीच साधं काहीतरी नको. तुम्ही उद्या मजा मारणार आम्ही वरणभात खाणार असं नको हं.

२)”विमलताई उद्या तुला अर्धा दिवसाची रजा घे. जरा पोराबाळांबरोबर बस निवांत! नाहीतर कर काय तुला हवे ते.”

“का हो ताई, उद्या कोणता सण आहे काय? “

“अग, उद्या महिला दिन आहे ना, मग आपणच एकमेकींची सोय बघून तो साजरा करायला हवा. हो ना?
उद्या माझ्या अॉफिसमध्येही आम्हा बायकांना कामाला सुट्टी आहे. आम्ही अॉफिसमध्येच एकत्र साजरा करणार महिला दिवस. मग तू ही कर महिला दिन साजरा “

३)आमच्या वेळी नव्हती हो असली महिला दिनाची थेरं. आम्ही शिकलो, घरचं सांभाळून नोकऱ्या केल्या, मुलांना मोठं केल. आम्हाला नाही हो कधी गरज वाटली मोकळा श्वास घेण्याची आणि काय ते स्पेस जपण्याची. काय एकेक नवीन फॅडं निघतील नेम नाही.

४) आज या ठिकाणी आपण महिला दिनानिमित्ताने एकत्र जमलो आहोत. महिला आज पुरुषांच्या बरोबरीने वावरत आहेत आज आपण अशाच एका महिलेचा सत्कार करणार आहोत. त्यांचे नाव आहे सौभाग्यवती अमुकतमुक.”
” अग कार्यक्रमाचा नारळ वाढवायला कोणी पुरुष माणूस आहे का बघ न आजूबाजूला!!”

५)” आल्या का मॅडम महिला दिन साजरा करून… साऽऽले आम्ही इकडे एकटेच बसायचे तडफडत आणि या करतायत महिला दिन साजरे… घरातला चखणा संपलाय, सोडा संपलाय त्याची सोय काय तुझा ** करणार आहे काय!!!”
” आज पण बसलायस बाटली उघडून. अरे चिनू घरात असताना पिऊ नकोस किती वेळा सांगितलय.. “
” ए तुला काय शाणपणा शिकवायचाय तो त्या बायकांना शिकव. माझ्यापुढे जास्त पिटपिट करायची नाही. इकडचा गाल तिकडे करून टाकीन”

६)” मला ना महिला दिन बैलपोळ्यासारखा वाटतो ग!! बायका नववारी नेसून गॉगल घालून बाईकवर बसून रॅली काढतात ना तेव्हा तर जास्तच वाटतं!!बैलांची मिरवणूक आणि आपली रॅली इतकाच काय तो फरक!!
अगदी आपल्या मनःस्थितीचे द्योतक आहे बघ ती बाईक वरची बाई म्हणजे!!!
आपल्याला आधुनिकतेची बाईक पण हवी आणि परंपरांची नथ, नऊवारी पण!!

  • समिधा गांधी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular