अख्ख्य जगाला आपल्या सुरेल सुरांची भुरळ घालून आत्मिक आनंद देणाऱ्या या गानकोकीळेच्या जाण्याने एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. “कोरोना मी तुझा धिक्कार करतो कारण तू आमचे सूर हरपले” अशा शब्दांत आनंद महिंद्रांनी केलेले वक्तव्य सार्थक आहे. आज भारतात एकही असे घर नसेल जे या दिवशी हळहळले नसेल. निर्जीव संगीतामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती जीव ओतते तेव्हा ते जिवंत होते आणि लता दीदींसारखी तुरळक कलाकार ती जिवंत कलाकृती अजरामर करतात. फार वर्षांपूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने लता मंगेशकर ऊर्फ लतादिदी यांना भेटण्याचा सुवर्णयोग आला होता. मी कार्यक्रमाला केवळ प्रेक्षक म्हणून गेले होते. माझे वय अवघे सोळा सतरा वर्षांची असेन.मराठी ध्वनिफितीचे अनावरण सोहळा होता आणि त्यातील संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिले होते. त्यांचे आणि माझे आजोबा आरती प्रभू ऊर्फ चिं त्र्यं खानोलकर यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांना मी स्टेज मागे भेटताच अतिशय आनंद झाला. माझि आणि माझ्या बहिणीची त्यांनी मोठय़ा आपुलकीने विचारपूस केली. स्टेजवर सर्व प्रेक्षकांना त्यांनी सांगितले की “आरती प्रभूंची नात मला भेटून गेली जेव्हा मी आणि ते भेटलो तेव्हा आमचंही वय साधारण तेवढंच असेल”. खचाखच भरलेल्या प्रेक्षकगृहात एका कोपऱ्यात असलेले मी मात्र लतादीदींना बघण्यास खूपच कावरीबावरी झाले होते.”नाच रे मोरा आंब्याच्या वनात” हे माझे आवडते गाणे कानात सतत मत होते. अखेरीस कार्यक्रम संपला आणि मी पुन्हा बॅकस्टेजला पोहोचले.तिथे आलेला प्रत्येक क्षण लतादीदींना पहावयास मोठ्या संख्येने गर्दी करून होता.पण आधीच्या सुरक्षा रक्षकाने मला ओळखले आणि आतमध्ये सोडले. समोर पंडित हृदयनाथ मंगेशकर दिसले. “सर्व गाणी खूप छान झाली आहेत” शेवटी त्यांना आवर्जून सांगितले व त्यांचा आशीर्वाद घेतला.आपल्या चाहत्यांच्या गराडयात पेटलेले ते असताना मी हलकेच त्यांना विचारलं. “लतादीदींचे दर्शन करायची एकदा इच्छा आहे”
त्यांनी माझा आवाज बरोबर हेरला. नंतर पुढची काही मिनिटांतच काय झाल्याचे माहीत नाही. पण मला ग्रीन रूम च्या आतमध्ये बोलावले गेले. मी बहिणीसोबत आतमध्ये शिरताच लाल रंगाच्या जरीकाठची पांढरीशुभ्र साडी, कानात हिऱ्याच्या कुडय़ा,डाव्या मनगटावर घड्याळ आणि आजवर कधीही न पाहिलेले तेजस्वी डोळे काही क्षण मी अवघे भांबावून पाहतच राहिले. तेथील एका व्यक्तीने आमची ओळख करून दिल्यावर त्यांनी आम्हाला नमस्कार करून स्वागत केले.माझी पुरतीच वाचा गेली. एवढ्य़ा मोठ्य़ा व्यक्तिमत्त्वाने इतकी अदब शालीनता दाखवावी याचे मला आजवर अप्रूप वाटून राहिले आहे.माझे वेडे मन इथेच थांबले नाही तर त्यांचा आवाज प्रत्यक्षात ऐकावा अशी खूप इच्छा झाली. “मी कविता करते तुम्हाला दाखवावि अशी इच्छा आहे” असे मी त्यांना म्हटले. यावर त्या ,” घरात सध्या लग्नाची धावपळ आहे ते झाले की तू प्रभुकुंजवर कविता घेऊन ये” असे त्यांनी म्हटले आणि मला स्वर्ग दोन बोटे उरले. “धन्यवाद लतादीदी” असे म्हणून आम्ही त्यांच्या पाया पडलो.आणि तिथून निघालो मात्र तो प्रसंग आज दशकाच्या वर काळ उलटला तरीही तसाच ताजा आहे.
- सानवी ओक
मुख्यसंपादक