काही वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या बाहुबली या चित्रपटातील राजमाता शिवगामी सर्वांच्याच मनात घर करुन गेली. तिचे तडफदार व्यक्तिमत्त्व, शत्रूची राखरांगोळी करणारी एक नजर, पुत्रास दिलेले अमूल्य संस्कार आणि वात्सल्याने भरलेले हृदय या साऱ्या गोष्टी वास्तविक इतिहासात घडून गेलेल्या एका थोर व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देते, ती व्यक्ती म्हणजे दुसरी कोणीही नसून मराठ्यांची राजमाता, राणी जिजाबाई होय.आजच्या जगात आपण महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाचा गोष्टी करतो पण शेकडो वर्षांपुर्वी या गोष्टी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणार्या हया महान स्त्रीच्या कर्तृत्वाचे दाखले आणि त्यापासून बोध घेणे ही प्रत्येक काळाची गरज आहे.स्त्री म्हणजे ममतेचे आणि पावित्र्याचे प्रतीक असे संबोधले जाते पण या स्त्रीने त्याहीपलीकडे जाऊन मराठा स्वराज्याचे स्थापना करणार्या एका महान आणि लोकप्रिय महाराजांचं व्यक्तिमत्त्व घडवले. छत्रपतींची आपल्या माते प्रती असणारी निस्सीम भक्ती प्रचलित आहेच.आजपासून ४२४ वर्षांपुर्वी सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंचा जन्म झाला आणि एका सुवर्ण पर्वाची सुरुवात झाली .कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचे सावट आपल्या पुत्रावर पडू न देता त्याच्या डोळ्यात हिंदवी सुराज्याची स्वप्नं पेरून ती सत्यात उतरविण्यासाठी आपल्या पुत्रास या मातेने पावलोपावली समर्थ बनविले.आज काळ बदलला आहे आणि त्यानुसार प्रत्येक आईचे तिच्या मुलांकडून अपेक्षा,स्वप्न हेही बदलली आहेत.यात काही एक गैर नाही पण राजमाता जिजाऊंची संगोपनाची मूल्य आपण जर बारकाईने अभ्यासली आणि अंगीकारली तर एक परिपूर्ण व्यक्ती घडविण्यास नक्कीच मदत होऊ शकते.या थोर माऊलीला जयंतीनिमित्त हृदयापासून अभिवादन .
जयहिंद
- सानवी ओक
मुख्यसंपादक