आजरा ( प्रतिनिधी ) -:
डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा (MAA) यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असून, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त केली आहे. अशा घटनांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून त्याचा आरोग्यसेवेवरही विपरीत परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ ९ जुलै २०२६ रोजी राज्यभर डॉक्टर काळी फीत लावून काम करतील, अशी माहिती मेडिकल असोसिएशन ऑफ आजराने दिली आहे. तसेच, दोषींवर कारवाई न झाल्यास पुढील काळात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मेडिकल असोसिएशन ऑफ आजराने पीडित डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेत, डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.


मुख्यसंपादक


