थांब गं !! किती बोलशील, कालपासून नुसता वैताग आलाय तुझ्या या प्रवचनाचा….
काहीही खुळ तुझ्या डोक्यात घुसतं…
कुठून काहीतरी बघते, वाचते आणि नुसती बडबड करत असते…
मम्मी मी बडबड करत नाही आहे, आजची सत्य परिस्थिती सांगत आहे तुला.
अगं मम्मी आज जी काही परिस्थिती जगावर ओढवलेली आहे ती कशामुळे गं ?
तुला काय वाटते याला फक्त हा “कोरोना विषाणूच” जबाबदार आहे का ?
नाही मम्मी, आज आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासतेय ती याच मूळे….
गुंजन आपल्या आईला झाडाबदद्दलच्या प्रेमापोटी थोडीशी भावुक होऊन बोलत होती….
विद्या, आज सकाळी सकाळी मस्त हिरवीगार साडी नेसून, खूप छान दिसत होती, आणि सुरेख अशी नाकातली नथ अगदी खुलून दिसत होती, कानातले रंगीत झुमके साडीवर मॅच होऊन अगदी हसतच होते, आणि तिचा चेहरा आज वटपौर्णिमा असल्यामुळे सकाळपासूनच खुलून होता.
पण गुंजनच्या सततच्या बोलण्याने काहीशी तिची चिडचिड होत होती आणि मधेच तिला दम देत होती.
मम्मी बघ काल जशी तू कोणत्यातरी वडाच्या झाडाची फांदी तोडलीस, तसेच अनेक स्रियांनीही तोडल्या असतील की नाही, मग त्या झाडाच्या कितीतरी फांद्या वाढत असतानाच तुम्ही लोकांनी त्या खुंटल्या आणि घरी आणल्या, कशासाठी तर वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी….
अगं मम्मी ज्या झाडाच्या फांद्या तुम्ही तोडल्या, म्हणजे त्या झाडाला दुःख तर झालंच असणार ना !!
मग कोणालातरी दुःख देऊन आपण आपला आनंद साजरा करण्यात कसला आलाय आनंद…..?!
तू आता गप्प बसते की….
पूर्ण देशात फांद्या तोडल्या जातात तेव्हा नाही कोणी बोलत, मग तुलाच काय एवढा पुळका आलाय आज झाडांचा…
मम्मी बघ, मला कोणी मारलं तर तू काय करशील गं…??
मुडदाच पाडीन त्याचा, मग कोण पण असुदे.!!
अगं, आता कसं, मला कोणी मारलं तर तू गप्प बसणार नाही हे मलाही माहितेय, मग तुम्ही त्या फांद्या तोडल्या तेव्हा त्या झाडालाही वाईट वाटलंच असेल ना गं,
ते झाड तर मुकं आहे ते कोणाला सांगणार, सांग बघू ?
विद्या विचार करू लागली, ह्या पोरीला आज कुठून एवढं सुचतंय देव जाणो, पण खरं तेच ती बोलतेय….इतकं मात्र नक्की !!
हो गं तू बरोबर बोलतेयस, मला पटतंय तुझं म्हणणं, माझं चुकलंच गं बाई…
असे म्हणून विद्याने गुंजन समोर कोपरापासून हसत हसत हात जोडले…
अगं पण आता ही फांदी तर मी आणली, मग आता याच काय करू ??
मम्मी एक काम कर, आपल्याकडे झाडांच्या कुंड्या आहेत ना, त्यातल्याच एक कुंडीत ती फांदी लाव म्हणजे झाड लावल्यासारखेही होईल, आणि तुझी वट पौर्णिमाही होईल…
नाही पोरी, ही फांदी मी लावतेच पण पूजा करायला मी वडाच्या झाडाजवळच जाईन….
ये मम्मी ऐक ना…
आता काय आहे, ऐकलं ना तुझं मी, अजून काय आहे…..?
विद्या जरा रागातच बोलली….
बघ मम्मी, त्या वडाच्या झाडाला दोरा बांधून तरी कशाला ठेवायचं ना !!
ये पोरी, तू आता जास्तीच करायला लागलेयस, एकदा म्हणते झाड तोडायचं नाही, आता म्हणते दोऱ्याने बांधायचं नाही !
काय चाललंय काय तुझं ?
तुला काय काम नसेल तर पुस्तकं आहेत शाळेची ती वाच आधी.
मम्मी शाळेचा अभ्यास होतोच आहे गं !!
बघ, झाडाला बांधून काय साध्य होणार आहे सांग, किती जणी त्या झाडाला दोऱ्याने बांधून ठेवतात, काय तर म्हणे ती प्रथा आहे.
हो, आजपर्यंत प्राचीन काळापासून तशी प्रथा चालत आली आहे, मग आताच का बदलायची ?
हेच मला तुला पटवून सांगायचं आहे मम्मी …!!
प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्रथा किती जण पाळतायत गं अजून,
समाज बदलतो तसं त्या प्रथाही बदलत जातात ही माणसे, आणि वरून म्हणतात सुद्धा, काळ बदलत चाललाय आपणही बदलले पाहिजे, मग काळानुसार ह्या प्रथाही बदलायला नको का ?
सोनू, असं कसं म्हणतेस तू, जरी तसं असेल तरीही त्या झाडात देवता आहे, त्या श्रद्धेने लोकं जातात तिथे त्या झाडाजवळ पूजा करायला…
मम्मीच बोलणं मधेच तोडत गुंजन पुन्हा बोलू लागली….
हो मला माहित आहे की, वडाचं झाड म्हणजे देवतांचे आहे, पण मग त्याच देवतेला आपण बांधून का ठेवायचं ?
का त्याच्याशी असे खेळायचं !
आपल्याला कोणी असं खूप वेळ बांधून ठेवलं तर कसं वाटेल…?
हो म्हणणे बरोबर आहे तुझं…!!
पण ….
पण काय….
म्हणे वडाची पूजा केली की, सात जन्म तोच नवरा भेटतो, मग या जन्मात मिळालाय त्यालाच का नाही बांधून त्याचीच पूजा करत तुम्ही लोकं…
का त्या निष्पाप झाडाशी खेळता….!
त्या झाडाला बांधून आपला नवरा सात जन्मासाठी मागायचा…!
पुन्हा तेच म्हणेन मी, दुसऱ्याला त्रास देऊन स्वतः आनंद साजरा करायचा, का ?
सोनू आता बस्स झालं, नाही ऐकवत आता, आणि मी नाही जात, मग तर झालं..!!
नकोच जाऊ तू …आता जी फांदी लावलीयस ना, त्याचीच पूजा कर ….पण माफि मागून त्या झाडाची, आणि या फांदीचीही…
बरं बाबा, हरले मी…पण खरंच तू बोललीस ते खरं आहे, आपण या आपल्या आजूबाजूच्या मुक्या प्राण्यांना, झाडांना खूप त्रास देत असतो.
तुझ्या या बोलण्याने मी तर नाही जाणार आता, पण काय गं एवढं सगळं तुला सांगितलं कोणी….
मम्मी, पप्पानी सांगितलं मला झाडांविषयी माहिती म्हणून कळले मला….!!
आणि ते बघ पप्पा, तुझं नि माझं चाललेलं बोलणं कसं लिहून काढतायत, म्हणजे त्यांचा एक लेख तयार होईल ना म्हणून…!!
दोघीही विजयकडे धावत जाऊन बघतात तर काय, खरोखरच विजयने त्यांचे दोघींचेही बोलणे, जशास तसे लिहून काढले होते…
दोघींनीही आता ऐका, बाबा ( मी गुंजन ला “बाबा” म्हणूनच हाक मारतो ) तू मम्मीला झाडांचे महत्व सांगितले, आता मी काय म्हणतो ऐका.
बये ( मी विद्याला “बये” म्हणूनच हाक मारतो ) बघ आता ही स्थिती बाहेर जाण्यासारखी नाहीय, कोरोनाचं संकट कमी झालेले असले तरी पूर्णतः टळलेले नाहीय, म्हणून तू तुझी पूजा आता घरातच कर….
आणि त्या लावलेल्या फांदीला रोज पाणी घालून जगव आणि पुण्य कमव…
आणि गुंजन हसतच म्हणाली – मम्मी तू आता पप्पांनाच दोऱ्याने बांधून ठेव आणि पूजा कर….झाली वटपौर्णिमा….म्हणजे सात जन्म पप्पा कुठेच जाणार नाहीत….
हे तिचे बोलणे ऐकून घरात जोरात हशा पिकला….
झाली वटपौर्णिमा ……
बघा शक्य झाले तर तुम्ही ही हे कार्य करा किंवा किमान हा संदेश इतरांना पोहचवून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तुमच्या संबंधित लोकांना पाठवून लिंक मराठी ला सहकार्य करावे.
लेखक –
– विजय वैशाली दत्ताराम पराडकर
( आण्णा )
मुख्यसंपादक
अप्रतिम आहे 👍👍💐💐
Super
Super
Really great thoughts
छान लेखन केला आहात आपण मॅडम
* सर
Based on true situation Nice
छान लेख लिहिला आहे आपण👍👍👌👌💐💐💐