Homeवैशिष्ट्येसर्वपित्री अमावास्येने आज मला सांगितला मोठा अर्थ!

सर्वपित्री अमावास्येने आज मला सांगितला मोठा अर्थ!

सर्वपित्री अमावास्येने आज मला सांगितला मोठा अर्थ!

आज रविवार, दिनांक २५ सप्टेंबर, २०२२ सर्वपित्री अमावास्या म्हणजे पितृपक्षाचा शेवटचा दिवस. हे जग सोडून गेलेल्या प्रिय जनांच्या गोड स्मृतींचा सर्वात मोठा दिवस. या पितरांनो या, तुमचे माझ्या घरी स्वागत आहे म्हणून दाराला सुंदर फुलांचा हार लावण्याचा, आपल्या पितरांना आपल्या घरी गोडधोड खाऊ घालण्याचा दिवस.

गेलेली माणसे परत येत नाहीत. पण आपल्या भावनेने, श्रद्धेने त्यांना घरी आणायचे व मग त्यांच्या आभासी सान्निध्यात रहात हा दिवस गोड करायचा. कल्पनाच पण किती सुंदर व तितकीच आदरयुक्त कल्पना. हिंदू धर्मातील ही प्रथा, परंपरा कोणी व कधीपासून सुरू केली हे कळायला मार्ग नाही पण तरीही ती छान आहे. पितरांसाठी केलेले गोडधोड जेवण आभासी पितरे खात नाहीत म्हणून मग त्यांच्या नावाने ते नैवेद्य मुक्या प्राण्यांना भरवायचे. मग ते प्राणी, पक्षी कोणीही असोत. मी तर म्हणेन की एखाद्या भुकेल्या माणसाला या दिवशी जेवायला घातले तरी वार्षिक श्राद्ध पूर्ण होईल. पितरांचा नैवेद्य कावळ्यांनी खाल्ला म्हणजेच तो पितरांनी खाल्ला असे मानणे साफ चुकीचे. चांगल्या प्रथेत घुसवलेली ही अंधश्रद्धा होय असे माझे सरळ स्पष्ट मत आहे. आपण आपल्या पितरांना कावळ्यांच्या रूपात बघणे बरोबर नाही. असल्या अंधश्रद्धांमुळे तर हिंदू धर्मातील चांगल्या प्रथा, परंपरांची टिंगल टवाळी करण्याची काही लोकांची हिंमत होते.

विस्मरणात गेलेल्या आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मृती जागवण्याचा पितृ पक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावास्या.थोडक्यात या दिवशी आपला भूतकाळ संपतो ही कल्पना. आणि मग दुसऱ्या दिवशी (उद्या सोमवार दिनांक २६.९.२०२२ रोजी) घटस्थापना म्हणजे नवरात्र उत्सव सुरू. नऊ दिवस देवीचे राक्षसाबरोबर युद्ध आताही सुरू आहे ही कल्पना म्हणजे आपल्या संघर्षमय वर्तमान काळाचे भान!

नवरात्रीचा वर्तमानकाळ भोगत असताना वेध लागतात दिवाळीचे म्हणजे सुंदर भविष्यकाळाचे. किती सुंदर रचना आहे या प्रथा परंपरा व सण उत्सवांची. पितृपक्ष व सर्वपित्री अमावास्या म्हणजे भूतकाळ, नवरात्र म्हणजे वर्तमान काळ व पुढे येणारा दसरा, दिवाळी म्हणजे भविष्यकाळ हा अर्थ मला सर्वपित्री अमावास्येने समजावून सांगितला.

  • ॲड.बी.एस.मोरे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular