हरिपाठाचा आवाज हरपला ….
सिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं आज पहाटे सहा वाजता निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील व सातारकर फड परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली ह. भ. प. भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचं नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी, इ.स. १९३६ रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे . त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे . प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली. हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर ते प्रवचने करत असत. त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र अप्पामहाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली. इ.स. १९६२ साली अप्पामहाराजांचे निधन झाल्यावर अप्पामहाराजांचे पुतणे – नीळकंठ ज्ञानेश्वरांनी, अर्थात बाबामहाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली.
अतिशय सहज साध्या आणि रसाळ वाणीतून त्यांनी ज्ञानेश्वरी व संत साहित्याचे निरुपण केले. त्यांच्या निधनामुळे संतसाहित्याचे एक थोर अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेले….
दरम्यान, याचवर्षी मार्च महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी ह. भ. प. रुक्मिणी उर्फ माई सातारकर यांचंही ८६व्या वर्षी निधन झालं. बाबा महाराज सातारकर यांच्यासमवेत रुक्मिणी सातारकर यांनीही वारकरी संप्रदाय परंपरा पुढे वाढवण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडली. खाद्यसंस्कृतीबाबत विशेष आवड असणाऱ्या रुक्मिणी सातारकर यांनी त्याबाबत विपुल लेखनही केलं होतं.
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक लोकजीवनाचा मंगलकारी प्रवाह.
चंद्रभागेच्या या वाळवंटात भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वरमाउलींपासून कळस सजवणाऱ्या संतश्रेष्ट तुकाराम महाराजांपर्यंत सकल संताची मांदियाळी कीर्तनरंगी रंगली, नामघोषात मग्न होवून कृतार्थ झाली.
याच वाळवंटात नाचत, जयघोष करत, हजारो वारकरी फेर धरतात तो हरिभक्तीपरायण श्री बाबामहाराज सातारकरांच्या किर्तनांच्या तालावर, सुरावर भक्तिमय झालेला.
किर्तनकलेचा परिपुर्ण आविष्कार म्हणावे, हजारो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान म्हणावे, भागवत धर्माचा वैश्वीक राजदूत म्हणावे, की आधुनिक काळातील माउली महावैष्णव! श्री बाबामहाराज सातारकरांचं कर्तृत्त्व, वक्तृत्त्व, नेतृत्त्व आणि व्यक्तीमत्त्व त्यांना अवघ्या महाराष्ट्राला भावणारा भक्तीस्वर होण्याचा मान प्रदान करतात.
त्यांच्या वडिलांचे नाव श्री ज्ञानेश्वर आणि आईचे नाव माता लक्ष्मीबाई आहे. बालपणी त्यांना घोडेसवारी, क्रिकेट, बोटिंग, ट्रकिंग, शुटिंग, स्विमींग या सर्वात अभ्यासाबरोबरच रस होता. फोटोग्राफी त्यांचा आवडता छंद होता. कलाकुसर, अनोख्या रचनांची त्यांची आवड, लाकूड, दगड, चित्रे, इमारती उठुन दिसते.
सातारकरांची वारकरी परंपरा श्रीक्षेत्र पंढरपूर वारीमहाराष्टाचे एक आगळे वेगळे नवल विशेष आहे. विश्वाला आनंद,आश्चर्य देणारी ही वारी आषाढी आणि कार्तिकीला शुध्द एकादशीला संपन्न होते. आषाढी वारीला सर्व संताच्या पालख्या पंढरीला लाखो वारकरी भक्त भाविकासह आपआपल्या गावापासून पायी वाटचाल करीत टाळवीणामृंदगाचे नादब्रह्माच्या आनंदात पंढरीत येतात.
श्री बाबामहाराज सातारकर यांना मिळालेले पुरस्कार
१. श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पुणे, पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासनतर्फे पुरस्कार,
२. महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार,
३. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ,तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली, याशिवाय मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, पैठण,अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देवून पुरस्कृत करण्यात आले आहे.
४. पण संगीताच्या जगात एक विक्रमी कीर्तनकॅसेट विक्री बाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरविलेले पहिले एकमेव कीर्तनकार महाराजच आहेत.
श्री बाबामहाराज सातारकर यांचे ट्रस्ट
१. श्री चैतन्य आध्यत्मिक ज्ञान प्रसार संस्था – १९८३ साली
२. श्री बाबामहाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठान – १९९० साली या दोन ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष श्री बाबामहाराज सातारकर आहेत.
त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
वयाच्या १२ व्या वर्षांपासून त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावर गाण्यास सुरुवात केली. वडिलांकडून त्यांनी पखवाज वादनाचे शिक्षण घेतले. बाबा महाराजांचा विवाह वारकरी संप्रदायातील देशमुख महाराज यांचे वीणेकरी पांडुरंग जाधव यांची नात दुर्गाबाई नामदेव जाधव यांच्याशी झाला. १९५० ते १९५४ या काळात बाबामहाराज यांनी लाकूड सामानाचा (फर्निचर) व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला.
सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश अशा राज्यात कीर्तन – प्रवचनांचे शेकडो कार्यक्रम त्यांनी केले. भंडारा डोंगर, देहू , त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी त्यांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले. बाबामहाराजांनी सुमारे १५ लाख व्यक्तींना संप्रदायाची दिक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त केले.
१९८३ साली त्यांनी जनसेवेसाठी श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत ६० ते ७० हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा तसेच औषधे पुरविण्यात येतात. लंडन येथे हिंदीतून चार प्रवचने तसेच अमेरिकेत बोस्टन, फिलाडेल्फिया, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, आरलँडो आदी ठिकाणी १४ ज्ञानेश्वरी प्रवचने बाबामहाराजांनी केली आहेत.
बाबांच्या आवाजातील हरिपाठ सकाळ संध्याकाळ ऐकतच राहावा असा भावपूर्ण आवाज आज हरपला.
वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि समाजसेवा यांचा सुंदर समन्वय बाबामहाराज सातारकर यांनी आपल्या जीवन कर्तृत्वाने साध्य केला आहे.
धन्यवाद .. !
सौ. रुपाली स्वप्नील शिंदे
भादवन ता . आजरा
मुख्यसंपादक