Homeमुक्त- व्यासपीठअश्या प्रकारे मला ( इलेक्टिक ) electric bike चा झडका बसला

अश्या प्रकारे मला ( इलेक्टिक ) electric bike चा झडका बसला

 मी कार मधून चाललो होतो. शेजारी बायको बसलेली होती. बाहेर मस्त पाऊस पडत होता. गाडीत गुलाबाचा सुगंध दरवळत होता. मंद संगीत चालू होतं. (बायकांना) रोमँटिक वाटेल अशीच सगळी परिस्थिती होती. माझी बायको मात्र शेजारी शांत बसलेली होती. खरं म्हणजे बायका कधीही शांत बसत नाहीत. सतत तोंडाची टकळी चालू असते. तरीही 'ही' शांत बसून समोर बघत होती याचा अर्थ ही वादळापूर्वीची शांतता होती. 

 "ही समोर स्कुटर चाललीय ना, तशी स्कुटर मला घेऊन द्या!" बायकोने सहज सुरात इच्छा व्यक्त केली.

 "आपल्याकडे तीन स्कुटर्स आहेत. त्या ही होंडा. सगळ्या स्कुटर्स तशा नवीनच आणि चांगल्या स्थितीत आहेत. !" मी चाचरत बोललो.

 "त्यातली एखादी विकून टाका आणि मला ही स्कुटर घेऊन द्या" बायकोने शांतपणे सांगितले.

 "अरेच्चा! अचानक स्कुटर विकत घ्यायचा विषय आला कुठून?" मी मोठ्याने 'मनात' बोललो. आपल्या मनात आपण कितीही मोठ्याने बोलू शकतो. मी  कलकत्त्याला गेलो तेव्हा याच पद्धतीने 'जय श्रीराम' बोललो होतो. 

 "ही जी स्कुटर आहे ना, ती बॅटरीवर चालते. हिला फारसा स्पीड नसतो. चार्जिंग करावी लागते ती. शिवाय तीला री-सेल नाहीये. आपली होंडा कशी जोरात पळते. होंडाची टेक्नॉलॉजी चांगली आहे!" मी एका दमात सगळं समजाऊन सांगितलं.

 "सगळ्या गाड्या सारख्याच असतात, त्यात मशीनमध्ये काही फारसा फरक नसतो!" बायकोने थंडपणे सांगितलं."आणि स्पीड करायचाय काय? या वयात काय तुम्हाला ही स्कुटर घेऊन कॉलेजरोडवर फिरायचं आहे? आहेत तेवढ्या मैत्रिणी काय कमी आहेत का?" बायकोने एकाच वाक्यात जागतिक तंत्रज्ञान साम्यवादी श्रेणीत आणत सोबत आमच्याबद्दलचा सात्विक संतापही व्यक्त करून घेतला.  

 मुळात बहुतांशी बायकांना ऑटोमोबाईलमध्ये काडीचा रस नसतो. गाडी चालवत रहायची. बंद पडली की रस्त्यावरचा कोणीतरी मदत करायला तयारच असतो. कित्येकदा बायकांना आपली गाडी ओळखूच येत नाही. स्वतःच्या गाडीचा नंबर सुद्धा बायकांना माहीत नसतो.  आमच्या ओळखीतील एका महिलेला नवऱ्याने कार घेऊन दिली. पावसामुळे कार चिखलाने भरली. बाईसाहेब बादलीभर पाणी घेऊन इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या कारला फडक्याने धुऊन काढायला सज्ज झाल्या. अर्धी गाडी धुऊन झाली. तेव्हा बिल्डिंगमधल्या मुलाने त्यांना विचारले, "आंटी, आप मेहता अंकल की कार क्यू वॉश कर रही हो?" तेव्हा त्यांना त्यांची चूक कळली. दुसऱ्या एक बाई तर दुकानातून काही वस्तू आणण्यासाठी कार मधून खाली उतरल्या. नवरा गाडीतच बसून राहला. नेहमीप्रमाणे बाईंना पहिल्या दुकानात वस्तू आणि दर पसंत पडेना. त्या पुढच्या दुकानात गेल्या. दोन चार दुकाने पालथी घालून, मनाप्रमाणे घासाघीस केल्यानंतर एकदाची खरेदी आटोपली. त्या बाहेर आल्या. दार उघडून कारमध्ये बसल्या तर शेजारी भलताच माणूस....! गाडीत नवऱ्याच्या जागी परपुरुष बघून बाई किंचाळल्या. मग त्यांच्या लक्षात त्यांची चूक आली की आपली कार मागेच उभी आहे आणि आपण त्याच रंगाच्या दुसऱ्याच गाडीत बसलोय. तो नवखा माणूस बिचारा एकाच वेळी आश्चर्य , आनंद, भीती, कुतूहल यात गुंतून पडला.

 'शेवटी काय, चलती का नाम गाडी!' या सगळ्या पार्श्वभूमीवर अचानक बायकोला 'ही' स्कुटर का घ्यायची आहे ते मला कळेना. "या स्कुटरमध्ये असं काय आहे?" मी बायकोला विचारलं.

 "तिचा रंग किती छान आहे! खूप मस्त मस्त कलर्स आहेत या गाडीत. आमच्या भिशीतल्या एकीने घेतलीय ना अशी स्कुटर! मी शीलुच्या लग्नात जी पैठणी घेतलीय ना, सेम त्या कलरची स्कुटर आहे बघा ही!! मला फार आवडतो हा कलर!!!" बायकोने मूळ कारण सांगितलं.

 आता कार चालवताना माझ्या मनात वादळानंतरची शांतता पसरली. 'ही'चं नंतरचं बोलणं, कार टेपवर चालू असलेलं मंद संगीत असं काही काही मला ऐकू येईनासं झालं. ही 'इ- स्कुटर' बारा व्हॉल्ट्सच्या बॅटरीवर चालते. बारा व्हॉल्ट्सचा कधी शॉक बसत नाही असे विज्ञान सांगते. मला मात्र अशा प्रकारे इलेक्ट्रिक स्कुटरचा जोरदार 'शॉक' बसला आहे. आमची तीनपैकी एक होंडा स्कुटर आता विकाऊ आहे.
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular