Homeवैशिष्ट्येllश्री पांडुरंग सु. प्र. Il

llश्री पांडुरंग सु. प्र. Il

llश्री पांडुरंग सु. प्र. Il
Ilकाकड आरती एक भक्तीमेळा ॥
विवेकाने ज्याने सुघटित समाजा टिकविले।
महा सिद्धांताचे गुढ रसिकत्व उकलिले ।
लसितरसेतर तरविला श्री भागवत तरु ।
तया ज्ञानेशाते विमल मतिने वंदन करु ।।
महाराष्ट्राच्या पवित्र पावन भुमीमध्ये संतांच्या  वाःङ्मय व संत साहित्यावरच समाजाची जडणघडण वा उभारणी झालेली आपणास पहावयास मिळते .
याहीपेक्षा समाजामध्ये सद्गुण, सदाचार,    इतरांविषयी  ममत्व भावना या गुणांची पाया भरणी समाजाच्या उत्कर्षासाठी आवश्यक आहे व ते कार्य संत साहित्यातून आजही आपणास पहावयास व अनुभवास आल्याचे प्रत्ययास येते.
महाराष्ट्राच्या पवित्र भुमीमध्ये शिक्षण व संस्काराची एक व्याख्या केली आहे ‘ ऐकून  मनुष्य जे निश्चित करतो त्याला संस्कार म्हणतात. ‘ तू असा बन असा हो’ असे जे सांगितले जाते, जे लादले जाते, त्याला शिक्षण म्हणतात. शिक्षण वेगळे व संस्कार वेगळे.
महाराष्ट्रामध्ये संस्काराच्या पायावर  संतांच्या मांदिआळीने समाजाची उभारणी केली. समाज एकत्रीकरण,  लोक संघटन करून भक्तिमार्गाप्रती समाज कार्यप्रवण केला.  परमेश्वराची भक्ती करत असताना नवविधा भक्तीमधील कीर्तन भक्तीने समाजमन जागृत केले. त्याद्वारे देव – भक्त आणि नाम या त्रिवर्गाचा समन्वय साधला नव्हे नव्हे देवाच्या सख्यत्वासाठी । पडाव्या  जिवलगांच्या तुटी। सर्व अर्पावे शेवटी। प्राण तोही वेचावा।। ही प्रेरणा व समाज हाक दिली. हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा या हरीपाठातील अभंगाने गावा-गावातील भक्तीप्रेमाची सायंकाळ घवघवीत व पवित्र झाली .
    किर्तन असो, हरिपाठ असो वा काकड आरती या सर्व साधनांचा हेतूच मूळी सर्व समाजाला ईश्वर भक्तीप्रती जागृत करुन ‘अवघाची संसार सुखाचा करीन ‘ या माऊलीच्या न्यायाने प्रेरित करणे हाच आहे .
अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा हा एक महिना गावा – गावात काकड आरती परंपरेने व सातत्याने गायली जाते . त्याद्वारे श्री पांडुरंग परमात्म्याची आळवणी आत्यंतिक आर्त भावाने केली जाते.जुण्याकाळात गावातील निष्ठावंत भजनी मंडळी सह गावातील महिला भक्त व छोट्या छोट्या कुमारिका हातामधे दिपताटी घेऊन आपली श्री पांडुरंगाप्रती सेवा रुजू करत असत. ब्राह्मी मुहूर्तावर उठुन गावातील सेवाभावी वृत्तीच्या माता भगिनी श्री पांडुरंगाचे देऊळ सारवून घेत असत.पहाटे चार वाजता गावातील भजनी मंडळी शुचिर्भूत होऊन देवळातील मृदंग, टाळ, विणा काढून अलंकावती पुण्यभूमी पवित्र करून जय जय राम कृष्ण हरी म्हणून श्री पांडुरंगाकडे दृष्टी लावत असत .
रुप पहाता लोचनी ।सुख झाले हो साजणी। या अभंगाने काकड आरती ला सुरुवात करतात  . ब्राह्मी मुहूर्तावर धीर गंभीर व शांत वातावरणात या अभंग श्रवणाने मंदिरा शेजारच्या महिला व पुरुष मंडळी घरातील दैनंदिन कामाला राम कृष्ण हरी गुण गुणत कामाला लागतात. विणेकरी गायक स्वर – ताल लय  तपासून पाहता पाहता ‘ तुझ पाहता सामोरी। दृष्टी न फिरे माघारी। माझे चित्त तुझ्या पाया । मिठी पडली पंढरीराया’।।  या संत तुकारामाच्या अभंगाने देह-भान विसरून जातात.   प्रपंचातील दैनंदिन कामातील झालेल्या शारिरीक व मानसिक श्रमाचा  त्या भक्ताला श्री पांडुरंग दर्शनाने विसर पडतो.
   काकड आरती मध्ये संतांनी सामान्य जीवाच्या अवनत अवस्थेचे यथार्थ वर्णन केले आहे. ‘मी तव अनाथ अपराधी। कर्महींन मतिमंद बुद्धि । तुझ म्या आठविले   नाही कधी। ही जीवाची वास्तव अवस्था प्रतिपादन केली आहे .आता यापुढे मला तुझ्या स्वरूपाची जाणीव होऊन ‘ तू तव कृपेचा सागर। उतरी पार तुका म्हणे’। असे म्हणत  अवनती कडून उन्नत अवस्थेकडे जीवाची वाटचाल संतांनी वाङ्मयाच्या द्वारे केली आहे. भक्ताची हाक देवाकडे पोहोचवणारे मार्गदर्शक हे संत झाले आहेत, आणि म्हणून भक्त त्यांना तुम्ही  सनकादिक संत। म्हणाविता कृपावंत। असे संबोधून एवढा करा उपकार। सांगा देवा नमस्कार। हा निरोप देवापर्यंत पोहोचवतात.
काकड आरती म्हणजे श्री पांडुरंगाच्या सगुण रूपाचे वर्णन याबरोबरच भक्ताच्या स्व – स्वरूपाची जाणीव. परमेश्वराची भक्ती करत असताना मी आणि माझ्या मध्ये असलेल्या अवगुणांची  निवृत्ती करावयाची आहे. माझ्यातला राग द्वेष घालवायचा आहे हे समजणे म्हणजे काकड आरती. तुका म्हणे तुज विरहित। कोण करील माझे हित। हा आत्मविश्वास व अनन्यता म्हणजे काकड आरती. आपल्यामध्ये असलेली अविद्या याचा नाश म्हणजे काकड आरती. ‘एथ अविद्या नाशु हे स्थळ’ असे वर्णन माऊली महावैष्णव यांनी केले तद्वत पाप ताप दैन्य जाय उठा उठी । ही नामस्मरणाची फलनिष्पत्ती आहे. याच्या प्राप्तीसाठी मी ‘कोठुनी कोण आलो कसा हो ‘ याची ओळख व्हावी लागते. ती ओळख काकड आरतीने दृढ होते.

येथे येणाऱ्या भाविकांसाठी जात- पात- पंथ -लहान- थोर असा कुठलाही निकष नाही. यासाठी संतांचा  दाखला आहे की या रे या रे लहानथोर। याती भलत्या नारी नर । करावा विचार। न लगे चिंता कोणाशी।।  किंवा सकळाशी येथे आहे अधिकार । ही अत्यंत पारदर्शक भूमिका या परंपरेत पाळली आहे.
भारतीय भक्ती शास्त्रामध्ये भक्ती मार्गाचे दोन विचार प्रवाह मध्ययुगीन काळात दृढ झाले होते.एक होता भक्तिमार्गाच्या वाटेवरुन चालणाऱ्या भागवत धर्मी मार्गस्थांचा. व दुसरा प्रवाह भक्तिमार्गा इतकाच राष्ट्रधर्म मानणाऱ्या राष्ट्रप्रेमी मार्गियांचा . भक्ती मार्गाच्या वाटेवरून चालणाऱ्या संतांनी ” उठा जागे व्हा रे आता। स्मरण करा पंढरीनाथा। भावे चरणी ठेवूनी माथा। चूकवी व्यथा जन्माच्या”। अशी हाक देऊन अ-शाश्वत प्रपंचाचे वर्णन करून या बंधनातून आमची सुटका करा अशी संतांनी श्री पांडुरंगाकडे मागणी केली, तर दुसरा मार्ग राष्ट्रभक्तीची प्रेरणा देऊन त्याद्वारे राष्ट्रधर्माचे उत्थान करणारा दुसरा वर्ग.” मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा”। अशी गर्जना करून समर्थ रामदासांनी स्वराज्य धर्माची पहाटनिर्माणासाठी महाराष्ट्र एकसंघ केला . तर स्वामी विवेकानंद यांनी कठोपनिषदातील उत्तिष्ठत! जाग्रत!!प्राप्य वरान्निबोधत!!! अशी आरोळी देऊन हिंदू धर्म जागरणासाठी भारतातील तरुणांमध्ये विजिगिषू वृत्ती वाढवली व राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली.
कठोपनिषदातील या वचनाचा उपयोग स्वामीजींनी अविरतपणे आयुष्यभर केला. संतांच्या वाङ्मयाद्वारे संतांनी साध्या सोप्या भाषेत सामान्यजणांना जागे केले. जागे करून संत थांबले नाहीत तर त्यांच्यामध्ये भक्तिज्ञानाचा स्फुल्लिंग प्रज्वलित केला. तो ‘मी भक्त तू देव ऐसे करी’ या जाणिवेतून केला. काकड आरती हे हरिदासांना भेटण्याचे व विचारांची देवान-घेवाण आणि सुसंवाद साधण्याचे माध्यम आहे.
प्रापंचिकाचे दु;ख दैन्य घालविण्याचे सामर्थ्य या हरिदासांच्या भेटीत आहे.

उठा पांडुरंगा हरिजना सांभाळी। पाहू द्या वदन वंदू पायाची धूळी । ही आर्त हाक संत तुकारामांनी आपल्या अभंगांमधून दिली .काकड आरती म्हणजे परमेश्वरा प्रती केलेली मागणी . ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा। दोन्ही कर जोडोनि चरणी ठेवीन माथा। हे भक्ती प्रेम म्हणजे काकड आरती.
प्रपंचात राहून सबंध आयुष्य खर्ची करणाऱ्या अज्ञानी जीवाचे प्रतिनिधित्व संत तुकाराम महाराजांनी उत्तमपणे मांडले आहे. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय। बैसलों जयावरी सैराट ते जाय ।अशा अवनत व दारुण अवस्थेत अडकलेल्या जीवाला हिंडता गव्हाणे गा शिनलो येरझारी । न मिळेचि दाता कोणी जन्म दुःख निवारी । या दुःखद अवस्थेतून देखिला देखिला देवा आधी देव बरवा । समाधान जिवा पाहता वाटे गे माये। याची जाणीव प्रगट होते.
उपरोक्त काकड आरतीचे अभंग धामणगाव येथील रहिवासी असलेले ह.भ.प.वै.बापुराव नाथोबा पौळ हे फार उत्तम गात असत . अप्रतिम पारंपारिक चाली व श्री गुरुकृपा यामुळे त्यांचे गायन रसाळ होत असे.वै.बापुराव हे श्रीमत् प.प.पूर्णाश्रम स्वामी संस्थानचे मुद्रांकित शिष्य होते.मुका झालो वाचा गेली। व अवताराची राशी तो हा उभा विटेवरी। हे त्यांनी गायलेले अभंग ऐकणाऱ्यांचे अष्टसात्विक भाव जागृत करत असत. अखंडित हे सांग सेवा घडावी । या समर्थ न्यायाने त्यांनी पूर्णाश्रम स्वामी संस्थानची सेवा केली .
भागवत संप्रदायामध्ये हरिपाठ, काकड आरती हा दैनंदिन उपासनेचा भाग आहे तशीच परंपरा जांब संस्थानमध्येही आहे .

भागवत संप्रदायातील काकड आरती अभंगांना ज्या चाली दिल्या की ज्या अत्यंत गोड, अवीट आहेत, उत्कृष्ट आहेत, गायकीच्या अंगाने जर विचार केला तर त्या अत्यंत श्रवणीय आहेत त्या चाली ह. भ. प. गु. वै. बंकट स्वामी महाराजांनी दिलेल्या आहेत.
ह. भ. प .गु. स्वामी हे मूळचे बीड जिल्ह्यातील निणगुर म्हणजेच आजचे नेकनूर या गावचे राहणारे. त्यांचा जन्म सण १८७७ साली झाला. दैवजात गोड गळा व अत्यंत अप्रतिम, लडिवाळ अभंगाच्या चाली यामुळे ते प्रसिद्ध होते. एकदा गु. विष्णू महाराज जोग यांची व स्वामींची भेट झाली, त्यांनी स्वामींना आळंदीला येण्याचा आग्रह केला गु. स्वामी आळंदीला गेले, पुढे जोग महाराजांनी आळंदीत पहिली वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. गु. मामासाहेब दांडेकर, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मारुती महाराज गुरव व बंकट स्वामी हे सर्व लोक त्या संस्थेचे प्रमुख खांब होते. गु. स्वामी यांनी वर्तमान कीर्तन पद्धती, प्रवचन पद्धती, भजन गायन पद्धती, पुनर्स्थापित करण्याचे सर्व श्रेय बंकट स्वामी महाराज यांनाच आहे.
काकड आरती, हरिपाठ, सांप्रदायिक गायन ,भजन, कीर्तन हे आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे. त्यातील संत विचार आपण सर्वांनी आचरणात आणण्याचा यथावकाश प्रयत्न करायला हवा.
प्रस्तुत लेख लिहिण्यासाठी मौ.पिंपळी धामणगाव येथील भजनी मंडळी यांनी मला भजनी मालिका देवुन उपकृत केले .मौ.आसनगाव व कोकाटे हादगाव येथील विख्यात सांप्रदायिक गायक यांनी काकड आरतीतील अभंगाच्या चाली म्हणून दाखवून मला उपकृत केले.या सर्वाचा मी ऋणी आहे.
झाले समाधान ।तुमचे देखीले चरण। आता उठावेसे मना। येत नाही नारायणा।। या प्रार्थनेसह सर्व भजनी, भाविक भक्तांना ही शब्दरूपी प्राजक्ताची ओंजळ अर्पण करतो व थांबतो.
।। इति शुभं भवतु।।


दीपक शामराव कुलकर्णी , करंजाळकर . ह.मु. पिंपळी धामणगाव ता परतुर जि जालना

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular