कोल्हापूर,
Monsoon is startingपावसाळा काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीसाठी लगबग सुरू आहे. खरीप हंगाम सुरू होताना हंगामात घ्यायचे पीक आणि त्यासाठी शेतीची मशागत कशी करावी या संदर्भात कृषी विभागाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. कोल्हापुरच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना या संदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान यामध्ये पुढील काही दिवसांबद्दलचा हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कसे असेल हवामान ?
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान अनुक्रमे 34° ते 36°, 36° ते 39° आणि 35° ते 38° तसेच किमान तापमान हे अनुक्रमे 22° ते 23°, 22° ते 24°, 22° ते 24° सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये अनुक्रमे वाऱ्याचा वेग ताशी 12 ते 18 किमीपर्यंत, 14 ते 23 किमी आणि 13 ते 21 किमी दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यात पुढच्या काही दिवसात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची तर काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची देखील शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान पावसामध्ये जमिनीची धूप होऊ नये म्हणून शेतामधील बांधबंदिस्तीची कामे करून घ्यावीत. जमिनीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी फळे तसेच भाजीपाला पिकामध्ये आच्छादानांचा वापर करावा, अशा सूचनाही शेतकऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
या पिकांची घ्या काळजी
भात – खरीप हंगामामध्ये भाताची लागवड करण्यासाठी रोपवाटिका तयार करणेकारिता गादी वाफे तयार करून घ्यावेत. पेरणीसाठी 1 मी. रुंदीचे 15 सेमी उंचीचे आणि आवश्यकतेनुसार लांबीचे गादीवाफे तयार करावेत. हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीसाठी 10 गुंठे क्षेत्रावरील रोपवाटिका पुरेशी होते. तर वाफे तयार करताना गुंठा क्षेत्रास 250 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खताबरोबर 500 ग्रॅम नत्र, 400 ग्रॅम स्फुरद आणि 500 ग्रॅम पालाश हि खते चांगल्या प्रकारे मातीत मिसळावीत.
तसेच भात लागवडीसाठी पुढील वाणांची निवड करावी :-
• हळवा : कर्जत-184, रत्नागिरी-1, कर्जत-4, फुले राधा
• निमगरवा : फुले समृद्धी
• गरवा : रत्नागिरी-2, कर्जत-2
• सुवासिक वाण : बासमती 370 इंद्रायणी, भोगावती, सुगंधा
• संकरीत : सह्याद्री-1, सह्याद्री-4, सह्याद्री-5
सोयाबीन – खोल नांगरट आणि कुळवाच्या दोन पाळ्या घालाव्यात. शेवटच्या कुळवणी आगोदर प्रती हेक्टरी 5 टन शेणखत मिसळावे.
ऊस – वळवाचा पहिला पाऊस झाल्यावर हुमणीचे भुंगेरे सायंकाळी बाभूळ, कडूनिंब आणि बोर या झाडांवर जमा होतात. अगोदर मादी भुंगेरे आणि नंतर तर भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात. या झाडांवर बसून ते झाडाचा पाला खातात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकूण त्यांचा नाश करावा.
टोमॅटो – खरीप हंगामामध्ये टोमेटो लागवडीसाठी 3 मि. लांबी, 1 मि. रुंदी आणि 15 सेमी. उंचीचे गादी वाफे तयार करावेत. वाफ्यामधील दगड, ढेकळे काढून टाकावेत आणि प्रत्येक वाफ्यात एक घमेले चांगले कुजलेले शेणखत, 50 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड 100 ते 150 ग्रॅम सुफला मिसळून घ्यावा आणि वाफा सपाट करून घ्या. वाफ्यावर 4 बोटांच्या अंतरावर वाफ्याच्या रुंदिशी समांतर रेषा पाडाव्यात आणि अश्या ओळींमध्ये बी पातळ पेरावे आणि नंतर हलक्या हाताने झाकून टाकावे. त्यानंतर वाफ्याला झारीने पाणी द्यावे. हंगामानुसार रोपे 3 ते 5 आठवड्यात लागवडीसाठी तयार होतात. लागवडीसाठी भाग्यश्री आणि धनश्री हे वाण वापरावे.
मिरची – मागील आठवड्यामध्ये कोरडे हवामान राहिल्यामुळे मिरची पिकावर कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसून येताच मिरची नियंत्रणासाठी फेनप्रोपथ्रीन 30% ई.सी. 5 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.
हळद – जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हळद लागवड पूर्ण करावी. लागवडीसाठी फुले स्वरूप, सेलेम, कृष्णा, राजापुरी आणि टेकुरपेटा वाण वापरावेत. लागवडीसाठी 25 ते 30 क्विंटल गड्डे बियाणे प्रती हेक्टरी या प्रमाणात वापरावे.
• आंतरपिके : हळद+घेवडा, हळद+मेथी, हळद+मिरची
• खते : लागवडीपूर्वी प्रती हेक्टरी 25 ते 40 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून टाकावे तसेच 100 किलो स्फुरद व 100 किलो पालाश द्यावे.
• सेंद्रिय हळद – 1) जैविक बीज प्रक्रिया – हेक्टरी 500 लिटर पाण्यात व्हॅम 12.5 किलो + पी. एस. बी. 5 किलो + ॲझोस्पिरीलीयम 5 किलो मिसळून या द्रावणात 15 मिनिटे कंद बुडवावेत.
2) खतांची मात्रा: शेणखत 15 ते 20 टन/हे + लिंबोळी पेंड 4 टन/हे + गांडूळ खत 2 टन/हे द्यावे.
घरातील तेलाची गरज भागवण्यासाठी पिता-पुत्रांनी शोधली आयडिया, तुम्हीही घेणार का आदर्श? Video
आंबा – आंबा पिकामध्ये तयार झालेली फळे नुतन झेल्याच्या सहाय्याने 80 ते 85 टक्के पक्वतेला काढावीत. काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
जनावरे – हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याने जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. जनावरांना लाळखुरकत फऱ्या, घटसर्प या रोगांच्या एकत्रित रोगप्रतिबंधक लस टोचून घ्याव्यात.
पूर्व मशागत – खरीप हंगामामध्ये पिक घेण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत (नांगरणी) करून घ्यावी. खरीप कडधान्य पिकण्यासाठी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर दोन पाळ्या द्याव्यात. वाळवणी अगोदर हेक्टरी 5 टन कंपोस्ट/शेणखत शेतात मिसळावे.