कोकण म्हणजे निसर्गरम्य छायेमध्ये डोलणारे जणू एक स्वर्गच..
कोकणची ख्याती वर्णवी तेवढी कमीच, विकत देखील घेता येणार नाही अशी किमया कोकणामध्ये आहे. स्वच्छ व सुंदर निसर्ग, रानमेवा, जागृत देवस्थान, दऱ्या, किनारे पर्यटकांच्या मनाला आणि डोळ्यांना भुरळ पडेल असे मोहक दृश्य हवेहवेसे वाटतात.
पिढ्यानंपिढ्या चालत आलेल्या रूढी आणि परंपरांना, सणवार, दरवर्षी नित्यनेमाने जपून पुढे चालू ठेवण्याचे कार्य कोकणात उत्तम प्रकारे चालते.. कोकणी माणूस सणांना जास्त प्रमाणात महत्व देतो ; कारण सणासोबतच संस्कृती जपली जातेच, त्याचबरोबर माणसांबददलची आपुलकी, मनं सुद्धा जपली जातात. या सणामधील एक वैशिष्टपूर्ण सण म्हणजे शिमगा .

शिमगा म्हटला कि, गावापासून परगावी गेलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात गावाकडे जाण्याची ओढ लागते. पारंपरिक सण म्हणून समजला जाणारा शिमगा प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गावामध्ये होळी सजवून जाळण्याची प्रथा आहे. कोकणामध्ये त्याला होम देखील म्हटले जाते. गावाकडे अशी समज आहे कि, होळी जळल्यानंतर आपल्या मनातील वाईट विचार, अशुद्ध गोष्टी जळून जावोत आणि त्यांच्या तेजस्वी प्रखर उजेडाने सगळ्यांच्या आयुष्यात आनंदाचे भरभराटीचे क्षण येवोत अशी आराधना केली जाते.. इतर वेळी दर्शन घ्यायाचे झाल्यास मंदिरात जावे लागते परंतु ; या शिमगा उत्सवमध्ये देवांची पालखी प्रत्येकांच्या घरी भेटीला येते हा आनंद काही वेगळाच असतो. शिमगा उत्सव चालू असताना अनेक लोककला जोपसल्या जातात. संकसूर, खेळे, तमाशा, वाघनाट्य, पालखीच्या खुणा अशा अनेक लोककलेच्या माध्यमातून शिमगा उत्सव साजरा करण्यात येतो. पालखीच्या खुणा हि लोककला पाहण्यासाठी लोक प्रचंड संख्येने उपस्थित राहतात यामध्ये देवाचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने दर्शन घडते अशी आगळीवेगळी प्रथा शिमगा उत्सवमध्ये बघावंयास मिळते. लोकांमध्ये मनोरंजन, तसेच संस्कृती जपण्याची आत्मीयता जागरूक राहते.. लहान थोरांच्या मनात घर करणारा हा बारा महिन्याच्या बारा दिवसांचा असा हा शिमगा नवी उमेद घेऊन सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो….
शिमगा उत्सवाच्या खुप शुभेच्छा…
लेखन : विशाखा चंद्रकांत आगरे.
दापोली पांगारी.

मुख्यसंपादक