Homeमुक्त- व्यासपीठवटपौर्णिमा स्पेशल -: वटसत्यवान

वटपौर्णिमा स्पेशल -: वटसत्यवान

“हाय, बिझी आहेस का ?”

हं, पण तू बोल, बरी आहेस ना? काही प्रॉब्लेम नाही ना? डॉक्टरला बोलावू का? “

” अरे हो हो, काहीही झालेले नाही. फक्त आज येताना लॉकरमधून माझी नथ, पाटल्या आणि हार आणशील ना? हे विचारायला फोन केला होता. बॅंक पाच वाजता बंद होते. त्याआधी काढून आण. आणशील ना?”

“आता हे मधेच दागिने कशाला? उगाच घरात ठेवायचे म्हणजे रिस्क आहे ग”

” मला वाटलच होतं तू विसरणार. अरे उद्या वटपौर्णिमा आहे. मला वडाची पुजा करायचीय. आपल्या स्वैपाकिण काकू बाकीची फळांची, पूजेची तयारी करतील. तू फक्त दागिने घेऊन ये. “

अग पण राणू तुला झेपणार आहे का? एकतर तू असले काहीतरी उपास बिपास करतेस हेच मला आवडत नाही. माझा या सगळ्यावर विश्वासच नाही. त्यात आत्ता या आजारपणात तुला का करायचाय उपास? त्या वडाला एकवीस फेऱ्या मारायला जमणार आहेत का? उगाच हट्ट करू नकोस”

” ए, अरे असं काय करतोस. मला झेपेल रे. बाकी अख्खा दिवस मी झोपून राहीन. खूप सारी फळे खाईन. नेहमीसारखा निर्जळी उपास नाही करणार. पण मला करायचीय रे पूजा वडावर जाऊन. काय उत्साही वातावरण असतं रे! कसलं भारी वाटतं माहितीय. मला पण छान वाटेल रे. “

” नको ना ग हट्ट करू. तुला नाही झेपलं तर उगाच त्रास होईल ग! ऐक ना माझं जरा “

अरे आजारामुळे माझं शरीर दमलय, मन मस्त ताजंतवानं आहे. उद्या चार माणसात गेले की आणखी फ्रेश होईन मी. हवं तर माझी शेवटची इच्छा समज!”

“मार मिळेल हं असं काही बोललीस तर. याद राख”

“चुकून बोलले सॉरी, सॉरी. परत नाही बोलणार. पण जाऊ ना उद्या वडावर. अरे काकू येणार आहेत माझ्याबरोबर. जाऊ दे ना प्लीज “

” तू काय ऐकणार आहेस थोडीच. कर काय करायचं ते. हट्टी आहेस एक नंबरची “
वॉव… थॅंक यू सो मच! चल बाय. दागिने आणायला विसरू नको रे. बाय बाय!”

मी फोन ठेवला आणि स्वतःशीच विचार करायला लागलो. हिला जमणार आहे का ही पूजा? नाही म्हणालो तरी ऐकणार आहे थोडीच. आजकाल जरा जास्तच हट्टी झालेय.
गेल्या महिन्यात तिला ताप आला. पाठोपाठ उलट्या सुरू झाल्या. दोनतीन दिवस वाट पाहून आमच्या फॅमिली डॉक्टरांनी तिला स्पेशालिस्टना दाखवायचा सल्ला दिला. काही तपासण्या केल्यावर डॉक्टरांनी तिला अॅडमिट केले कितीतरी वेगवेगळ्या तपासण्या केल्या तेव्हा तिला एकप्रकारची कावीळ झाली आहे आणि त्यासाठी लिव्हरची बायॉप्सी करायला लागेल असे डॉक्टर म्हणाले. बायॉप्सी हा शब्द ऐकून आम्ही हादरुन गेलो होतो पण डॉक्टरांनी छान समजावून सांगितले की बायॉप्सी काही फक्त कॅन्सर पेशंटचीच करतात असे नाही. इतरही काही आजारांचे निदान करण्यासाठी बायॉप्सी करणे जरूरीचे असते. तरीही मनात खूप भिती होती आम्ही दोघेही एकमेकांना धीर देत होतो. सततच्या उलट्या आणि तापामुळे ती पण हैराण झाली होती. तिला अन्न जात नव्हते आणि खाल्लेले पचत नव्हते त्यामुळे महिनाभरात दहा बारा किलो वजन कमी झाले होते.
बायॉप्सीचा रिपोर्ट अजून यायचा होता. चार दिवसांपूर्वीच तिला हॉस्पिटल मधून घरी आणले होते. मला एकीकडे हिच्या हट्टीपणाचा रागही येत होता दुसरीकडे तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे आणि मानसिक उभारीचे मला कौतुक वाटत होते. काही विचार करून मी ऑफीसमधून लवकर निघालो. उद्याचा हाफ डे टाकला.बॅंकेतून तिचे दागिने काढून आणले. वाटेत गजरेवालीकडून तिला आवडणाऱ्या मोगऱ्याचा गजरा घेतला आणि घरी पोचलो.

घरी हिच्या उत्साहाला उधाण आले होते. एखादा सण म्हटला की ही नेहमीच सगळे साग्रसंगीत करायची. माझा यात शून्य सहभाग असे. तिनेही मला कधीच कसला आग्रह केला नाही पण सण साजरे करणे व्रतवैकल्ये करणेही थांबवले नाही. तशी ही आधुनिक विचारांची त्यामुळे जुनाट परंपरांना तिने छान नवीन वळण दिले होते. तिला ज्या संकल्पना कालबाह्य वाटत त्या ती पाळत नसे पण तरीही तिची देवावर श्रद्धा होती. वटसावित्री म्हणजे तिला अथक प्रयत्न करणाऱ्यांची देवी वाटायची. सावित्री सारखी चिकाटी आपल्यात यायला हवी आणि आपल्या मनावर, शरीरावर आपल्याला ताबा ठेवता येतो का? ते पाहाण्यासाठी ती दर वटपौर्णिमेला निर्जळी उपास करायची.

दुसऱ्या दिवशी ती लवकरच उठली. आज छान फ्रेश दिसत होती. तिच्या सुचनेबरहुकुम काकूंनी पूर्ण तयारी करून दिली. ती तयार होऊन, गजरा माळून बाहेर आली आणि मी पाहातच बसलो. एवढी आजारी आहे तरीही काय सुंदर दिसते ही!

“येते रे वडावर जाऊन.” तिने माझ्या नजरेतले कौतुक ओळखले. इतक्या वर्षाच्या सहवासानंतर आम्हाला एकमेकांच्या मनातले सहज ओळखता येते.
“एकटी कुठे चाललीस. मी पण येतो.”

“चल काहीतरीच काय? काकू आहेत न सोबत”

“हे बघ मी तुला वडावर जायला नाही म्हणालो का? मग आता माझे ऐकायचे.. तुला वड पूजायला जायचे असेल तर मी सोबत येणार नाहीतर तू पण जायचे नाहीस. आणि हो मी आज हाफ डे टाकलाय त्यामुळे मला अॉफिसला जायला उशीर होणार नाहीये “
” तिथल्या बायका हसतील तुला आणि मला. “
” मला काही माहीत नाही आणि मी येणार म्हणजे येणार. काकू तुम्ही नाही आलात बरोबर तरी चालेल. मी आहे “
तिला घेऊन मी जवळच्या वडाच्या झाडापाशी गेलो. तिथे बायकांची नुसती झुंबड उडाली होती. एवढ्या बायकांमध्ये मी एकटाच पुरूष असल्याने थोडा बावरलो पण तरीही तिच्या जवळच थांबलो. तिची पूजा झाल्यावर तिला वडाभोवती फेऱ्या मारायच्या होत्या चारपाच फेऱ्यातच तिचे पाय लटपटायला लागले. माझ्याने राहावले नाही. मी सरळ त्या घोळक्यातून पुढे गेलो. तिला चक्क उचलून घेतले आणि फेऱ्या पूर्ण केल्या. आमच्या आजूबाजूच्या बायकांच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव होते.
“असा नवरा मिळणार असेल तर मी वर्षातून एकदाच नाही तर दहादा उपास करेन. कोणीतरी बोललेले आमच्या कानावर पडत होते. हिच्या विरोधाला मी जुमानलेच नाही.
पूजेनंतर वडाच्या पारावर जरा विसावलो. गुरूजी सत्यवान सावित्रीची कथा सांगत होते.
मी ही ठरवले कितीही प्रयत्न करायला लागले तरी बेहत्तर आपण मागे हटायचे नाही. हिला बरे करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावायचे.तिच्याबरोबरीने केलेली वटपौर्णिमा मला वेगळीच उर्जा देऊन गेली.त्या वेळी त्या वडाच्या झाडाला मी प्रॉमीस केले की पुढच्या वर्षी आम्ही दोघेही परत येऊ आणि बरोबरीने त्याची पूजा करू.
चार दिवसांनतर रिपोर्ट आला. तिला एक खूपच दुर्मिळ प्रकारची काविळ झाली होती. औषधोपचार आणि पथ्य पाळले, योग्य ती काळजी घेतली तर ती नक्की बरी होईल असे डॉक्टर म्हणाले. मी कोणती औषधे कधी व कशी घ्यायची ते नीट समजावून घेतले. तिला जे पदार्थ वर्ज्य आहेत ते घरी बनवायचेच नाहीत अशी सूचना काकूंना दिली.
आमची तिच्या आजाराबरोबर लढाई सुरु झाली. तिचा आजार रोज नवे प्रश्न उभे करत होता. तिच्या गोळ्यांचे खूप साईड इफेक्ट्स होते. तिचे सतत तोंड यायचे, सगळ्या अंगाला सूज यायची. प्रचंड अॅसिडिटी व्हायची. तिची खूप चिडचिड व्हायची. काहीवेळा आम्ही दोघेही खूप फ्रस्ट्रेट व्हायचो.अशावेळी मी वडाला एकत्र मारलेल्या फेऱ्या आठवायचो.वडाच्या झाडाला केलेले प्रॉमीस आठवायचो. तिलाही परत चिअर अप करायचो. आमचा लेक हॉस्टेलमध्ये होता. तोही त्याला जमेल तेव्हा घरी यायचा. आईच्या अवतीभवती असायचा. तिच्या आजारपणाने तोही पट्कन मोठाच होऊन गेला.
हळूहळू तिचा आजार आटोक्यात येत होता. अचानक तिला परत ताप यायला सुरुवात झाली. माझे तर धाबे दणाणले. तिला परत अॅडमीट केले. तिला कसलेतरी इन्फेक्शन झाले होते. त्यात लिव्हर कमजोर असल्याने अनेक औषधे देणे शक्य नव्हते.. तिला आयसीयू मध्ये हलवले आणि माझा धीर सुटायला लागला. तिचे, माझे सगळे नातेवाईक आमची मित्रमंडळी सतत बरोबर होतेच. तरीही मला खूप एकटे वाटत होते. मी तिला गमावून बसेन की काय अशी धास्ती वाटायला लागली होती. दोन दिवस मी हॉस्पिटल मध्येच होतो. आईने आग्रह करून मला घरी विश्रांती घ्यायला पाठवले.

वाटेत मला ते वडाचे झाड दिसले. आज तिथे कोणीच नव्हते. मी गाडीतून उतरलो. पारावर जरा टेकलो. वाऱ्याने पाने, पारंब्या सळसळत होत्या. जणू माझ्याशी बोलायचा मला धीर द्यायचा प्रयत्न करीत होत्या. मला तिथे खूप शांत वाटत होते. काही वेळाने मी उठलो. घरी जाऊन आंघोळ केली. घर तिच्याशिवाय अगदीच ओकेबोके वाटत होते. मी किचन मध्ये डोकावलो. समोरचा देव्हारा पारोसा दिसत होता. मला काय वाटले कोणास ठाऊक मी तो देव्हारा स्वच्छ केला. देवांनाही स्वच्छ आंघोळ घातली आणि दिवा लावला. किचन उजळून गेल्यासारखे वाटले. माझे हात आपोआपच जोडले गेले.
“तो आहे रे. त्याची गणितं, त्याचे प्लॅनिंग वेगळे असते. आपल्याला माहित नसते ना म्हणून आपण घाबरतो. त्याच्यावर विश्वास ठेव. बघ सगळे एकदम सोपे होईल.” तिचे शब्द जणू मी ऐकत होतो. आज तिचे म्हणणे माझ्या मनाला पटत होते. का कुणास ठाऊक पण ती नक्की बरी होईल असेच मला वाटत होते. तिच्यावर उत्तम उपाय सुरू होते. डॉक्टरही प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते.

मी तासाभराने हॉस्पिटल मध्ये गेलो. तिला पाच मिनिटे भेटायची परवानगी होती. मी तिच्याजवळ गेलो. ती गुंगीत होती. मी तिच्या हातावर हात ठेवला. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिने डोळे उघडले. मी आल्याचे तिला जाणवले. तिने डोळ्यांनीच मला धीर दिला. आमचा शब्दावीण संवाद सुरु होता. मी बाहेर आलो. मन खूपच शांतावले होते.
डॉक्टरना भेटलो. ते ही म्हणाले की वेळ लागेल पण ती बरी होण्याचे चान्सेस आहेत.

त्यांच्या प्रयत्नांना यश मिळतेय अशी चिन्हे दिसायला लागली. तिच्यावर चालू असलेल्या उपचारांना तिचे शरीर साथ देऊ लागले. ती म्हणायची त्याप्रमाणे देवाचे प्लॅन तिला बरे करायचे होते. तब्बल महिनाभराने ती घरी आली. चार महिने विश्रांती घेतल्यावर ती घरात हिंडूफिरू लागली.
आज वटपौर्णिमा!! मी ही तिच्याबरोबर आज वड पूजायला जाणार आहे
आम्ही दोघेही वडावर गेलो. जोडीने पूजा केली. आज वडाला फेऱ्या मारताना इतके दिवस आवरून ठेवलेले माझे डोळे अखंड वहात होते आणि वडाच्या आसपास वावरणारे सत्यवान सावित्रीचे अदृश्य आत्मे आम्हाला आशिर्वाद देत होते!!

  • डॉ. समिधा गांधी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular