औषधी वनस्पतींची लागवड सध्याच्या शेतीमध्ये केली जात आहे. यात सर्वात अधिक चर्चा होत आहे ती अश्वगंधाची. सध्याच्या कोरोना काळामध्ये आयुष्य मंत्रालयाने जो औषधी काढा पिण्यास सांगितला आहे आणि ज्या वनस्पतींचे दैनंदिन वापरात सेवन करण्यास सांगितले आहे. त्याच औषधी वनस्पतीच्या शेतीविषयी आपण माहिती घेणार आहोत. लोकांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यात अश्वगंधा महत्वाची भूमिका निभावताना दिसतो आहे. येत्या काळात भारत सरकार या औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहील.
कारण या वनस्पतींचा आरोग्यावर चांगला परिणाम होऊन लोक निरोगी राहण्यास मदत होते. त्यासाठी बाजारांमध्ये अश्वगंधेला चांगली मागणी असणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळाची पाऊले ओळखून या पिकाची शेती करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी करार तत्वावरती शेती करावी किंवा गट शेती करावी. बऱ्याच वेळा बाजारपेठ मिळत नसल्याने शेतीत केलेला प्रयोग फसत असतो. त्यामुळे याची विक्री थेट मध्यप्रदेशमधील मुनिच किंवा मंदसौर बाजारामध्ये करावी. तेथे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. त्यासाठी लागवड खर्च कमी आहे तसेच पिकाची काळजी कमी असते त्यामुळे कमी कालावधी मध्ये पारंपारिक पिकांना एक चांगला पर्याय अश्वगंधा पिकाची लागवड करून देऊन शकतो.
जमीन आणि हवामान- या पीकाच्या लागवडीसाठी सर्व प्रकारची माती चालते, पण वाळूमिश्रीत पोयट्याची, लाल किंवा गाळाची जमीन चांगली असते. पाण्याचा निचरा होणारी, सेंद्रिय घटकांचे प्रमाण चांगले व २०-३० सेंमी भुसभुशीत जमीन असावी. मातीचा सामू साधारणता ७.५-८ पर्यंत असावा. खरिप हंगामामधील लागवड मानवते, तसेच या पिकासाठी कोरडे वातावरण चांगले मानवते. २०-३८ से.ग्रे. तामनात या पिकाची वाढ चांगली होते.
पूर्वमशागत- लागवडीचे क्षेत्र निवडताना शक्यतो जमीन भुसभुशीत असावी, उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करून, २०-२५ टन चांगले कुजलेले शेणखत घालून घ्यावे. रोटावेटरने किंवा डिस्क हॅरोने ढेकळ फोडून घ्यावीत. वळीव पावसानंतर कुळवणी करून जमीन लागवडीसाठी तयार करून घ्यावी.
वाण- पोषिता, रक्षिता, जवाहर अशगंध-२० व व्ही.एस.आर.
लागवड- मान्सून हंगामात (जून-ऑगस्ट) तयार केलेल्या सरी-वरंबा पद्धतीचा लागवडीसाठी वापर करावा. अश्वगांधेची वंशवृध्दी बियाण्यापासून केली जाते. त्यासाठी जर प्रसारण पद्धतीने लागवड करण्यासाठी १०-१२ किलो बियाणे प्रती हेक्टर व रोपवाटिकेमध्ये जर का रोपे तयार करून पुनर्लागवड करायची असेल तर ४-५ किलो बियाणे पुरेसे आहे. दोन सऱ्यांमधील अंतर ६० सेंमी ठेवावे तसेच दोन रोपांमधील अंतर ६० सेंमी ठेवावे किंवा ४५ × ३० सेंमी ठेवावे. बियाणे प्रक्रियेसाठी एम-४५ @ ३ ग्राम किंवा ट्रायकोडर्मा @ ५ ग्रॅम प्रसारण करण्यापूर्वी किंवा रोपावाटीकेमध्ये लावण्यापूर्वी चोळावे. ३०-३५ दिवसाच्या वयाचे रोपावाटीकेमधील रोपाची लागवड करावी.
खत व्यवस्थापन- जमिनीच्या प्रकारानुसार आणि मातीतील उपलब्ध खतांच्या तपासणी अहवालानुसार खतांचे नियोजन करावे. साधारण १५:२५ किलो नत्र:स्पुरद प्रती हेक्टरी द्यावे. लागवडीच्या सुरुवातीला आर्धी खताची मात्रा दयावी व राहिलेली मात्रा पिकाच्या वाढीच्या गरजेनुसार द्यावी. औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी शक्यतो सेंद्रिय खतांचा वापर करावा, त्यामध्ये शेण व गोमुत्राची स्लरी, वर्मिवॅशचा वापर उत्तम.
पाणी व्यवस्थापन- या पिकाची लागवड खरीप महिन्यांमध्ये होते त्यामुळे पाण्याची शक्यतो आवश्यकता भासत नाही पण पाऊस जर का वेळेत झाला नाहीतर २-३ पाणी पिकाला बसायला हवीत. ठिबक सिंचनाने जर पाणी द्यायची सोय असेल तर स्लरी किंवा जैविक खाते ड्रीपवाटे देऊ शकता.
आंतरमशागत- लागवडीनंतर साधारणता एक महिन्यानंतर खुरपणी करून घ्यावी, तणनाशक वापरू नये. सरासरी दोन खुरपण्या करून घ्याव्यात.
काढणी व उत्पन्न- साधारणता पेरणीनंतर १५०-१८० दिवसांनी अश्वगंधा काढणीसाठी तयार होते. फळधारणा झाल्यानंतर त्यांचा लाल रंग होतो त्याचबरोबर पाने वाळतात तेव्हा पीक काढणीसाठी तयार झाले आहे समजून जायचे. मुळांचा भाग औषधी असल्याने त्याला बाजारात मागणी असते म्हणून शीर्ष भागाच्या वर १-२ सेंमी वर अंतर ठेवून कापून घ्यावीत. धुवून ५-१० सेमीचे तुकडे करून वाळवून विकण्यासाठी तयार होतात. वाळलेल्या झाडांपासून बिया काढून ठेवल्या तर ५०-७५ किलो बियाण्यांचे उत्पन्न तर ३-५ क्विंटल वाळलेल्या मुळ्यांचे प्रती हेक्टरी उत्पन्न मिळून जाते.
“अश्याच नवनवीन शेतीविषयक माहिती घेण्यासाठी Follow करा आपल्या हक्काची लिंक मराठी वेबसाईट “
संकलन – लिंक मराठी टीम
मुख्यसंपादक