कोल्हापूर — ( प्रतिनिधी ) – शहरातील एका बेकरी व्यावसायिकास गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने २० लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी उदय माळी यांनी येथील राजारामपुरी पोलिसात गुरुवारी रिका लिम या मलेशियातील महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
बेकरी व्यावसायिक उदय माळी यांच्या मोबाईलवर संशयित रिका लिम या महिलेने मोबाईल वरून व्हाट्सअप मेसेज देऊन आपण मलेशियातील जागतिक दर्जाच्या मार्केटिंग कंपनीसाठी काम करीत आहे. भारत व मलेशिया या देशासाठी सल्लागार अधिकारी आहे. हिरे, प्लास्टिक संबंधी शेअर्स, प्लॉट खरेदीचा व्यवहार कंपनीतर्फे केला जातो. यात पैसे गुंतवले तर झटपट फायदा मिळेल, असे तिने सांगितले. या महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून माळी यांनी ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली. काही काळातच या रकमेत मोठी वाढ झाली.
या व्यवहारावर विश्वास बसला. पुढे लिम हिने दिलेल्या वेगवेगळ्या राज्यातील बँक खात्यावर २० लाख रुपयांची गुंतवणूक केली. ही रक्कम ४० लाखापर्यंत वाढल्याचे दिसून आले. पैशाची गरज असल्याने माळी यांनी लिम हिच्या खात्यावरून पैसे काढणार असल्याचे सांगितले. त्यावर तिने या रकमेवर बोनस मिळणार असल्याने लगेच पैसे काढू नका, असा सल्ला दिला. तथापि माळी यांना ३० मे रोजी पैशांची अत्यंत निकड असल्याने पैसे काढण्यासाठी वेबसाईट सुरू केली असता ती बंद असल्याचे लक्षात आले.लिम हिचाही संपर्क होत नव्हता. त्यामुळे तिने फसवणूक केल्याप्रकरणी माळी यांनी फिर्याद दिली असल्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले.
मुख्यसंपादक