नावाचा रुपाचा गुणाचा महिमा
धर्मग्रंथात तुझा खूपचं आहे
कारण,तू फक्त स्त्री आहे
धर्मग्रंथ लिहिणाऱ्या पुरुषांनीच
एकिकडे देवीचं रुप
तर दुसरीकडे स्वतः च्या स्वार्थासाठी
दुय्यम स्थान दिले
कारण,तू फक्त स्त्री आहे
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता
ही संस्कृती खरी
पण पुरुष प्रधान संस्कृतीत
तुलाच पाहून म्हणतात
पायातली वाण पायातचं बरी
कारण,तू फक्त स्त्री आहे
पुरुषानं जशी जात निर्माण केली
तसा धर्मही
अन् याच धर्मानं आधी पुरुषाची
म्हणजे ॲडमची निर्मिती केली
उपभोगण्यासाठी ॲडमच्या बरगडीतून
इव्ह म्हणजे तू आली
कारण,तू फक्त स्त्री आहे
किती हृया धर्माचा पगडा
तुझ्या या बाईपणावर
होता म्हणे स्वर्गात तुझा बाप
त्याची ती हालकट आज्ञा मोडून
तुला फळ खाण्याची इच्छा झाली
अन् तिथूनच वाढत गेला
तुझा बाई म्हणून वांझोटेपणाचा ताप
कारण,तू फक्त स्त्री आहे
या धर्मानं तुला
सती म्हणून जाळलं
अन् या पुरुषानं
बलात्कार करून कापलं
वर्षानुवर्षे तू हेच सहन केलं
कारण,तू फक्त स्त्री आहे
सगळे धर्मग्रंथ पुरुषांनीच लिहिले
तुला फक्त त्यात दुय्यम स्थान दिले
भाकरी करपली म्हणून
घटस्फोट तर कधी तोंडी तलाक
ही तरतूद पुरुषी घाणेरड्या धर्मानं केली
तू धर्माला प्रमाण मानून
जीवघेणी तरतूदही मुकाट्यानं सहन केली
कारण,तू फक्त स्त्री आहे
या धर्मानं तुला
मोक्षाचा अधिकार नाही दिला
तुझा पती दारुडा,जुगारी
अन् रंडीबाज का असेना
तरी,पती हा परमेश्वरच
असं तुला मानायला सांगितलं
कारण,तू फक्त स्त्री आहे
आज विज्ञानयुगात प्रगती झाली
होणारं अपत्य
पुरुषी गुणसूत्रावर अवलंबून असतं
सगळं माहित असूनही
तुला मुलगी झाली तर
कधी घराबाहेर काढलं जातं
तर कधी जीवंत जाळलं जातं
कारण,तू फक्त स्त्री आहे
कधी तू कुमारी
तर कधी सौभाग्यकांक्षिणी बनते
कधी विधवा
तर कधी नवरोबानं टाकून दिल्यानं
परित्यक्ता म्हणून जगते
कारण,तू फक्त स्त्री आहे
शिकली सवरली तू
मजल मारली अगदी राष्ट्रपती पदापर्यंत
पण येथील पुरुषी घाणेरड्या धर्मानं
व्रत वैकल्ये अन् मासिक पाळीत
अडकून ठेवलं मंदिराच्या पायरीपर्यंत
कारण,तू फक्त स्त्री आहे
तू विश्वाची आहे जननी
हा इतिहास आठव
चौकाचौकात तुझ्या प्रगतीत
आड येणाऱ्या पुरुषाला
अन् घाणेरड्या धर्माला
आता पायाखाली तुडव
कारण,तू फक्त स्त्री आहे
तू फक्त स्त्री आहे…!
- संदीप देविदास पगारे
खानगाव थडी नांदूर मधमेश्वर-नाशिक

मुख्यसंपादक