Homeमुक्त- व्यासपीठनिसर्ग :- एक लाख मोलाचा दागिना ( सत्य घटनेवर आधारित )

निसर्ग :- एक लाख मोलाचा दागिना ( सत्य घटनेवर आधारित )

    ते दिवस म्हणजे आमच्या पिढीने अनुभवलेले सर्वात अविस्मरणीय क्षण होते. गाव तस आमचं छोटंसं अगदी चारही बाजूंनी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल. अगदी  साजेल असं चार गल्लीच, गावात पोहचायला एक मोठा चढ आहेच अन् गावाला लाभलेलं एक छान मोठं मैदान त्याला आम्ही गोटन म्हणतो. या मैदानात आमचं बालपण गेलं. गावच नाव जाधेवाडी तेही साजेल अस पण आजुबाजूच्या गावाला पण हे गाव इथ आहे याची बातमीही नव्हती. त्या गावच मैदान हेच या गावची शान होत. त्या मैदानाच्या एका टोकावर पाहिलं की एक अतिशय आवाढव्य, एकडे- तिकडे वळण घेतलेलं, पूर्णपणे टुमदार आणि दिमखात उभारलेले एक मोठ, भव्य अस वडाच झाड होत. झाड एवढं भव्य होत की पाहूनच मनात भीती निर्माण व्हायची आम्ही लहान होतो तेव्हा अस वाटायचं की या झाडात कोणती ना कोणती तरी दिव्य शक्ती आहे कारण ते झाडच खूप रुंद अस होत त्याचा बुंदा (खोड) इतकं भव्य होत की दहा- बारा जणांनी त्याला हात धरून मिठी मारली तरी ते कमीच वाटायचं. अस हे भयान आणि मनात थरकाप उडवणार.
  वडाच झाड म्हणजे जणू देवच असत हे मात्र आम्हाला पटल कारण त्या झाडावर सतत पक्षांची किलबिल असायची, पोपटांच वास्तव असायचं मोठीच्या मोठी धोली असायची आणि त्यात ती पाखर आनंदाने वास्तव करायची, खूपच छान दिवस होते ते. मला तर वाटतं या झाडाचा जन्म हजारो वर्षापूर्वी झाला असावा. गावात वटपौर्णिमा आल्या की हे झाड अगदी नटून थटून बसायचं मग गावातल्या स्त्रिया येऊन त्याची पूजा करायच्या त्याला प्रसाद द्यायच्या आणि सोबत आपल्या नवऱ्यासाठी मागणं मागून जायच्या खर तर त्या आपल्या नवर देवासाठी मागणं मागून जायच्या पण झाड बीचार आख्या सृष्टीला निवारा द्यायच, स्वच्छ हवा द्यायचं, आणि पक्ष्यांना निवारा द्यायचं अगदी काही अपेक्षा न ठेवता.
 आम्हा पोरांना त्या झाडाची एकाच दिवशी आठवण यायची नागपंचमी दिवशी कारण आम्हा साऱ्यांच वजन पेलणार या जगात तीनच लोक होती एक म्हणजे आपली आई दुसरे आणि तिसर म्हणजे हे नेहमी आपले पणाने जवळ घेणार झाड कारण या नागपंचमी दिवशी खास गोष्ट म्हणजे त्या झाडावर पाळणा बांधायचा आणि उंच उंच झोके घ्यायचे आणि साऱ्या गावच वजन आपल्या खांद्यावर झेळणार एकच गावात झाड होत ते म्हणजे हे वडाचं झाड. या दिवशी खूप मजा करायचो आम्ही झाडाला मोठे दोन दोर बांधायचे आणि उंच उंच झोके घ्यायचे तसे झोके तर जीवनात सगळेच झोपाळ्यावर घेतात पण हे झोके असे कि सरळ आम्ही जाऊन दुसऱ्या गावात पडतो की काय की आपला जीव जाणार की आपला आज शेवटचा दिवस हेच कळत नव्हत भले भले रडायचे. बाकीचे हसायचे आणि एकच वाक्य असायचं " तेला काय व्हतय जा तू अरे भितोस काय बघ मी जातो" तो तर वाघा सारखा जायचा पण येताना ससा बनून यायचा. भली भली माणस रडायची झोके घेऊन झोका घेतला की वाटायच आपण समोरच्या मासेवाडी गावात जाऊन पडतो की काय. एकदा तर रावसाहेब कुरूनकर या बहादर व्यक्तीला बसवलं तो बी जोशात म्हणाला भीतोय काय आणि काय सांगू हा अगदी गोरा गोमटा गडी बसला पाळण्यात आणि जसे झोके घातले तसा या गड्यान शिव्यांचा भडीमार केला अरे उतरा मला अरे उतरा त्यात त्याला आता उतरवणार नाही हे ठरलेलं कारण खाली झोके घालायला गावातला सगळ्यात वांड आणि अतरंगी पोरगा कोण तर सुभाष भुजंग, रावसाहेब पार गोरा होता तो लाल झाला डोळे पान्यावले रडू लागला आणि मग झोके थांबले. तो पण गेला वाघ बनून आणि आला ससा बनून सरळ सांगायचं तर जो जाईल त्याच्या गोट्या कपाळावर. मला पण एकदा तसच नाही नाही म्हणून सुभाष दादा न बसवलं आणि माझं पण तसंच मी पण दादाची आय बहीण काढली तरी काय गडी आयकणा आणि त्याच्या जोडीला अजून एक होता माझा अशोक मामा पार रडवल मला तर या जीवनात आम्ही आमचं बालपण या झाडाच्या कुशीत काढल. तो एक दिवस आम्हाला पर्यावरणाचं महत्त्व जाणवून द्यायचा. ते झाड होतच न्यार जीव लावणार.
 ऊन असो वारा असो अगदी आहे तस असायचं आमच्या कितीतरी पिढ्यांनी या झाडाच्या अंगा खांद्यावर काढली. त्या झाडाची मूळ अगदी गोटन भर पसरली होती. आपले मूळ खोल जमिनीत रोवून ते ताठ उभ होत. आमची पिढी कदाचित ती शेवटची पिढी होती. आम्ही पाहत होतो ज्या झाडांन आम्हाला हसत हसत मोठ केलं ते झाड आता म्हातारं झालं होत. हजारो वर्षे तिथं उभ होतं एक वर्षी खूप मोठा पाऊस पडला, मोठ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह ते झाड खाली कोसळ आणि त्यानं सुटकेचा श्वास घेतला. अगदी गावातल्या सर्व लोकांसाठी ही अतिशय दुःखाची बातमी होती कारण या झाडान आम्हाला आंगा खांद्यावर वाढवलं होत, लहानाचं मोठं केलं होत, पक्ष्यांना निवारा दिला होता हजारो वर्षांपासून उभ असलेलं झाड आता शांत पडून होत. गावात ही बातमी लागताच प्रत्येकाच्या मनात खोल दुःख झाल होत कारण या झाडाने प्रत्येकाला काही ना काही दिलं होत.
 वडाची जागा आज रिकामी झाली होती. पूर्ण गोटन आता मोकळा दिसू लागला अगदी राजा विना सिंहासन जणू. आम्ही आजही त्या जागेकडे बघतो तेव्हा आम्हाला ती जागा रिकामी वाटते गावी गेलो जरी आम्ही समोरच्या डोंगरावर गेलो तर एकेकाळी दूर वर हिरवळ दिसणारी झाड आता दिसत नाही. पैशाच्या हव्यासापोटी ही झाड तोडली गेली पूर्ण गावातील शेत आता ओसाड दिसत आहेत. मित्रानो झाडांनी आपल जीवन घडवल आहे. जुन्या पिढीने झाडे लावली म्हणून आम्ही आमचं बालपण आनंदात घालवल आम्ही शेळ्या चारायाला गेलो की झाडावर खेळायचो, झोके घ्यायचे, थकलो तर निवांत झोप घ्यायचो भूक लागली तर फळे खायचो, मधाची पोळी काढून गोड मध खायचो हे होत आमचं बालपण.
    "ते वडाचं झाड आज जरी तिथं दिसत नसलं तरी त्याच्या आठवणी आजही आमच्या मनात तशाच ताज्या आहेत अगदी मनाच्या खोल रुतलेल्या आहेत जसी त्याची मुळं जमिनीत खोल रुतली होती तशी."

काय माहित कोणी ते वडाचं झाड लावलं पण आमच्या सारख्या हजारो पिढ्यांनी त्याचा उपयोग करून घेतला त्याच्या अंगा खांद्यावर मजा केली आणि त्या आठवणी मनात रुजवून घेतल्या. आजची पिढी तंत्रज्ञान विकसित करीत आहे तशीच त्यांनी झाड ही विकसित करावी. पर्यावरणाचं महत्त्व जाणून झाडे लावून ती वाढवावित कारण निसर्ग आहे तर आपण जीवित राहू शकतो, निसर्गाचा आनंद घेऊ शकतो आणि स्वच्छ सुंदर हवा घेऊ शकतो. आणि पुढील पिढीला या झाडांचा आस्वाद देऊ शकतो म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावलच पाहिजे.

“झाडे लावा झाडे जगवा”
लेखक :- अनिकेत शिंदे
गाव :- जाधेवाडी , आजरा

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular