Homeसंपादकीयपु. ल देशपांडे यांच्या निधनानंतर सुनिता बाईंनी त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले...

पु. ल देशपांडे यांच्या निधनानंतर सुनिता बाईंनी त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले होते ; त्याला जर पुलंनी उत्तर दिले असते तर …

प्रिय सुनिता,

पत्राचा मायना बघून तुझ्या नेहमीच्या शैलीत गालातल्या गालात हसलीस ना? समोर असतो तर म्हणालीही असतीस, “काय भाई, बरा आहेस ना?” पण तरीही तू मला प्रिय आहेस हे तू चांगलेच ओळखून आहेस.
आपले लग्न आठवतय? 12जून 1946. दुपारी चहाच्या वेळी तुझे वडील मॅरेज रजिस्टारला घरी घेऊन आले. मी तर घरच्या लेंगा बनियन वर आणि तू पण घरातलीच साडी नेसलेली होतीस. चहासाठी तापवत ठेवलेले दूध उतू जाण्याआधी आपण दोघांनी सह्या केल्या आणि तू सुनिता ठाकूरची सुनिता देशपांडे झालीस. इतक्या सहजपणे आपलं लग्न झालं आणि तो सहजपणा आपल्या नात्यातही होता. मी हा असा सुरात रमणारा पण बराचसा असूरासारखा दिसणारा, गबाळा आणि तू, विलक्षण देखणी, नीटनेटकी आणि शिस्तीचीही.
आपण असे दोन ध्रुवावरून आलेले असल्याप्रमाणे आणि तरीही आपल्यात एक मैत्र, एक विश्वासाचे नाते फुलले. अर्थात तुझ्या समजूतदारपणामुळेच!
माझ्यात एक लहान मुल दडलय तू नेहमी म्हणायचीस. एखाद्या वाया गेलेल्या मुलाला आईने शिस्त लावावी तशी तू मला, माझ्या लिखाणाला शिस्त लावण्यासाठी सतत प्रयत्न करायचीस. खरेतर तू ही प्रतिभासंपन्न आहेस. उत्तम कलाकार आहेस. मला वंदेमातरम, तुझी दीदीराजे आजही आठवतेय अगदी जशीच्या तशी. पण माझ्यासाठी, माझी प्रतिभा फुलावी म्हणून तू तुझी आवड, तुझ्यातले ते गुण बाजूला सारलेस. मी मला जे वाटेल ते किंवा सुचेल ते लिहून मोकळा व्हायचो पण त्यानंतरचे किचकट सोपस्कार तू तुझ्या अंगभूत शिस्तीने आणि निगुतीने करायचीस. तुझा प्रत्येक बाबतीतला अचूक परिपूर्णतेचा पराकोटीचा अट्टाहास आणि त्यासाठी तू घेत असलेले कष्ट मला अनेकवेळा थक्क करून सोडायचे. कधीकधी तर रागही यायचा मग आपले वाद होत. बहुतेक वेळा मीच हरत असे किंवा माघार घेत असे. तू करशील ते नेहमीच योग्य असेल यावर माझा गाढ विश्वास होता.
माझ्या साहित्याची मी आई होतो पण त्याला सांभाळून, त्याची काळजी घेणारा आणि त्यांच्याकडे नीट लक्ष ठेवणारा बाप तू होतीस.
इतकेच नाही तर मिळवलेल्या पैशांची सुद्धा तू उत्तम काळजी घ्यायचीस. तुझ्याशिवाय मी हे कसं करणार होतो माहीत नाही. आम्हा आळशी माणसांच्या मांदियाळीत तुझी फार कुचंबणा होत असेल ना? अग पण मला आपण काही कामे करावीत हे सुचायचेच नाही आणि काही करायला गेलो आणि धडपडून गोंधळ घातला तर परत तुलाच त्रास झाला असता.
तुला आठवतय आपण दिल्लीला असताना धरणीकंप झाला होता. बाकी सगळे भितीने हातातले सामान तसेच टाकून घराबाहेर पळाले. अगदी मी सुद्धा चक्क धावलो पण तू शांतपणे नाटकाला जायच्या आधी जसे घर आवरून कुलूप लावून निघतात तशी अगदी कुलुप लावून बाहेर पडलीस. तुझा व्यवस्थितपणा पाहून जमीन देखील अचंबीत झाली आणि थरथरायचेच विसरून गेली आपल्यामुळे हिच्या कामात व्यत्यय आला तर ही रागावेल असे त्या पृथ्वीला वाटले होते बहुतेक. तुझा दराराच तसा होता.
तुला सांगतो तू काहीही केलं असतेस तरी ते उत्तम नव्हे सर्वोत्तम केले असतेस तू उत्तम प्रशासक, शिक्षिका, अभिनेत्री, लेखिका आहेस पण यातले काहीही न निवडता तू पूर्णवेळ माझी पत्नी म्हणून वावरलीस. वेळप्रसंगी वाईटपणाही स्विकारलास पण आपली भूमिका तू अत्युत्तम पणे निभावलीस आणि मी सगळे कळून न कळल्यासारखा तुला उपदेशपांडे ही उपाधी बहाल करता झालो. ते ही तू बिरुद म्हणून स्विकारलेस
आपल्या लग्नानंतर आपण रत्नागिरीत होतो. तुमच्या ठाकूरांच्या वाड्यासमोर एक पारिजातकाचे झाड होते. एके दिवशी पहाटे न्हाऊन तू पारिजातकाची फुले वेचीत होतीस. मी मागून येऊन ते झाड हलकेच हलवले. तू पारिजातकाने डवरून निघाली होतीस.फुलात न्हाली पहाट ओली नंतर आपण अभिवाचन करायचो ती महानोरांची कविताच होतीस जणू तू! आपल्यात असे मोहरलेले क्षण कमीच. एरवी तू आई आणि मी तुझे मूल अशाच आपल्या भूमिका होत्या नाही. असाच होतो ग मी माझ्या माझ्यातच गुंतलेला. शब्दसुरांशी खेळणारा.. … आपल्या लग्नापूर्वी तू भावांसाठी खानावळीतून डबे आणायचीस. ते जड डबे तू एकटीने उचलून चालत असायचीस. मी सोबत असायचो पण कधीही तुझ्या हातातले डबे आपण घ्यावे असे काही सुचले नाही बघ मला. माझ्या डोक्यात सतत काहीतरी घोळत असायचे. वाचलेले, अनुभवलेले इतके काही तुला सांगायचे असायचे त्यातच मी दंग असायचो. हळूहळू तुलाही मी असाच आहे याची सवय करून घ्यावी लागली. हो ना!
लग्नानंतर तुला अनेक धक्केच पचवावे लागले. आम्ही देशपांडे कमालीचे आळशी, बेशिस्त त्यात घरची परिस्थिती बेतास बात पण तू तुझ्या अंगीभूत करारीबाण्यामुळे आणि परिस्थितीला आपण वाकवू शकू या आत्मविश्वासाने आमच्यात रुळायचा प्रयत्न करत होतीस. आपण जवळपास बावीस बिऱ्हाडे बदलली. प्रत्येक वेळी त्यासाठी करावी लागणारी बांधाबांध, नियोजन तूच कर्तेपणाने करायचीस. मी फक्त पक्षाने एका झाडावरून उडून दुसऱ्या झाडावर बसावे तितक्या सहजतेने वावरायचो. आहे त्यात निगुतीने संसार कसा करावा हे तुझ्याकडून शिकावे. सुरुवातीला माझ्या सिगरेटच्या रिकाम्या डब्यात धान्य, डाळी भरून तू संसार मांडला होतास. माझ्या विश्रांतीच्या वेळा पाळणे, माझ्या लिखाणाच्या वेळी कोणतीही अडचण येणार नाही याबद्दल तू आग्रही असायचीस.प्रत्येक गोष्टीतला तुझा काटेकोरपणा आणि सुत्रबद्धता वाखाणण्याजोगी होती पण मी गमतीने म्हणायचो की शाळेत असताना हिचे शास्त्र पक्के होते कोणतीही गोष्ट सुत्रात(साखळीत) बांधल्याशिवाय हिला चैनच पडत नाही!!
मी चित्रपटात त्याच्या चित्रीकरणात, त्यातल्या गाण्यात अगदी बारीकसारीक गोष्टीत रमायचो. आपला गुळाचा गणपती चित्रपट आठवतोय. त्यात संगीतकार, लेखक, दिग्दर्शक आणि नटही मीच होतो. चित्रपट गाजला पण आपल्याला आर्थिक फायदा झाला नाहीच पण मनस्ताप खूप झाला.
तरीही मी चित्रपटात, गप्पांचे फड रंगवण्यात आणि गाण्याबजावण्यातच अडकून राहिलो असतो. अंगभूत आळशीपणामुळे माझाच “गुळाचा गणपती” झाला असता.
तुझ्यात एक व्यवहारी शहाणीव होती. तू मला प्रयत्नपूर्वक हलकेच लेखनाकडे वळवलेस.
त्यासाठी तू अनेक युक्त्या करायचीस आणि मी त्याला बळी पडायचो.
तुझ्या एका वाढदिवसाला मी तुला काय भेट देऊ असै विचारताच उद्याच्या दिवसात ‘तुझे आहे तुजपाशीचा’ तिसरा अंक लिहून पूर्ण कर हीच माझी भेट असे म्हणालीस. मी अनेक दिवस रेंगाळलेले तिसऱ्या अंकाचे लेखन तीन तासात पूर्ण केले.
माझ्या लेखनाची पहिली समिक्षकही तूच होतीस. मी व्यक्ती आणि वल्ली मधला नामू परीट लिहून तुला ऐकवला. तुझ्याबरोबर प्रफुल्लाही होती. माझे वाचन झाल्यावर प्रफुल्ला त्याची स्तुती करू लागली पण तू तिलाच फटकारलेस. भाई परिटाची भट्टी जमली नाही म्हणताच मी ते कागद तिथल्यातिथे फाडले आणि नव्याने नामू परिटाची घडी बसवायला लागलो. तुझ्यातला समिक्षकही तुझ्या इतकाच कर्तव्य कठोर होता. मी जे काही लिहीन ते सर्वोत्तमच असेल याच्याकडे तू डोळ्यात तेल घालून लक्ष पुरवायचीस. तशीही तुझ्याकडे तैलबुद्धी होतीच डोळ्यात वेगळे तेल घालायची गरजच नव्हती. आणि तू डोळ्यात काजळही घातले नसतेस. तेलबील घालण्याच्या फंदात पडणे तर दूरच. हा मुद्दा अलाहिदा!!
सगळ्यांचे वाढदिवस लक्षात ठेऊन त्यांना फोन करणे त्यांना पत्र लिहिणे हा देखील तुझाच प्रांत होता. माझ्या असले तपशील लक्षातच रहात नसत. तू आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेऊन त्यांचा यथास्थित पाहुणचार करायचीस. आलेला कोणीही असाच पाहुणचाराशिवाय जाणार नाही हे तू बघायचीस. मी त्या पाहुण्यांबरोबर गप्पा मारण्यात, शाब्दिक कोट्या करण्यात आणि माझी स्तुती ऐकण्यात दंग असायचो. तुला काही मदत करावी हे मात्र सुचले नाही कधी. आणि सुचले असेल तरी जागचे हलायचा प्रचंड आळस!
तू कोणतही काम मन ओतून करायचीस अगदी डाळिंबाचे दाणे सोलताना त्यात एकही पांढरा देठ किंवा पापुद्रा येऊ नये यासाठी दक्ष असायचीस. ते असे सोललेले दाणे काय सुंदर दिसायचे. आणि येणारे पाहुणे त्याचे बोकाणे भरायचे. आपली मेहनत कोणाच्या लक्षात येणार नाही हे माहित असूनही तू कधी कंटाळा केलाच नाहीस. एकदा तुझ्याजवळची डिक्शनरी उघडून त्यात आळस, अव्यवस्थितपणा, कंटाळा हे शब्द खरोखरच नाहीत की काय हे पडताळून पहायचे राहुनच गेले.
आपल्या बटाट्याची चाळचे प्रयोग खूपच छान रंगायचे. मी फक्त स्टेजवर अॅक्टिंग करायचो पण त्यामागची अगदी तिकिटविक्री ते ध्वनीसंयोजन ही सगळी कामे तू करायचीस. कार्यक्रम निर्दोष व्हावा यासाठी तू आग्रही होतीस. लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेला हा कार्यक्रम मी गावोगावी करत राहिलो असतो तरी आपले मस्त चालले असते. पण तू अशी अल्पसंतुष्ट नव्हतीस प्रत्येक एकपात्री प्रयोगाच्या पन्नासाव्या प्रयोगाला नवीन कार्यक्रमाचा जाहिर संकल्प करायचा हा तूच ठरवून दिलेला पायंडा होता. आणि नवीन प्रॉडक्शन रंगभूमीवर येई पर्यंत जुन्या कार्यक्रमाचे प्रयोग करायचे नाहीत हा ही तुझा अट्टाहास. माझ्यातल्या आळशी लेखकाला कामाला लावायची ही तुझी पद्धत होती. पण त्यामुळेच मी वाऱ्यावरची वरात, असामी असामी, वटवट वटवट लिहिले.पण मला दम लागतोय, मी थकतोय हे जाणवताच
हे सगळे कार्यक्रम धो धो चालू असताना, आपल्याला आर्थिक स्थैर्य मिळवून देणारे हे प्रयोग तू तितक्याच कठोरपणे बंद करायला लावलेस. अनेकांनी प्रयत्न करूनही तू बधली नाहीस. पण त्यामुळेच माझा उतारवयात केविलवाणेपण देणारा बालगंधर्व झाला नाही.
लोकांकडून घेतलेले लोकांनाच परत करावे या विचाराने आपण (खरे म्हणजे तूच) पु ल देशपांडे प्रतिष्ठानची स्थापना केली. तुझ्या असंख्य व्यापात आणखी एका व्यापाची भर पडली. पण त्यामुळे अनेक मुक्तांगणे निर्माण झाली आणि फुललीही.
आपणच कमावलेले पैसे आपल्यासाठी न वापरता कोणतीही छानछौकी न करता एका व्रतस्थपणे तू सामाजिक कामांसाठी वापरलीस. तुझ्यामुळे हा आनंदाचा, समाधानाचा मळा फुलला!
हे करताना तुला कोठेही मोठेपणा मिळणार नाही किंबहुना तुझे नाव कुठेही येणार नाही याबाबत तू जागरुक असायचीस. स्टेजवर येणे, पुढेपुढे करणे, फोटोसाठी उभे राहाणे याचा तुला पराकोटीचा तिटकारा. त्यामुळे लोकांचे तुझ्याबद्दल गैरसमज झाले तरी तुला त्याची पर्वा नसायचीच.
कविता वाचणे, त्या जगात रमणे तुला प्राणाहून प्रिय. नाधोंच्या, मर्ढेकरांच्या, आरती प्रभूच्या कविता तुला मुखोद्गत होत्या. आपण दोघे काही वर्षे त्यांच्या कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम करायचो. वाचिक अभिनय म्हणजे काय याचा वस्तुपाठ तुझ्या काव्यवाचनामुळे उभा रहायचा.
तरीही काही वर्षांनंतर आपण तेही प्रयोग थांबवले.

तुझ्यातल्या कितीतरी गुणविशेषांची मी नेहमीच खिल्ली उडवली किंवा त्याच्यावर शाब्दिक कोट्या केल्या. मला कोणी पुष्पगुच्छ दिला की त्यातली फुले सुटी करून तू फुलदाण्या सजवायचीस. पाणी बदलणे, सुकलेल्या पाकळ्या काढणे हे सगळे तू व्यवस्थित करायचीस. मी गमतीत जपानची इकेबाना आणि सुनिताची सुकेबाना असे म्हणायचो. पण कोणीही दिलेला पुष्पगुच्छ तुझ्यासाठी घरी आणायचो. इतके असले तरी तुझ्यासाठी स्वतः जाऊन फुले आणावीत हे काही तेव्हा कधी सुचले नाही. ते आत्ता सुचले बघ.
तू पिंडाने स्वातंत्र्यसैनिक आणि गांधीजींच्या विचारांचा तुझ्यावर पगडा! त्यामुळे वक्तशीरपणा, सत्यवचन आणि अपरिग्रह हे गुण तुझ्या मध्ये होतेच. कमालीची काटकसर करून तू पैसे वाचवायचीस. त्या पैशांचा उपयोग सामाजिक कामांसाठी करायचा तुझा अट्टाहास असे.

माझ्यासाठी तू काय होतीस हे सांगायला माझेही शब्द थीटे पडतील म्हणूनच बहुदा मी चारलोकात तुझी फारशी स्तुती केली नाही.
तू एखाद्या नारळाचे कवच धारण केलेल्या काटेरी फणसासारखी आहेस. ती तुझी कवचकुंडले भेदून तुझ्यापर्यंत पोचणाऱ्यांना मग रसाळ गऱ्यांची मेजवानी मिळे.
कुठे थांबायचे हे तुला अचूक कळते. पण मला कळत नाही ग. मी आपला लिहितच गेलो. भाई आता पुरे हे म्हणायला तू आत्ता माझ्याजवळ नाहीस म्हणून इतका वाहावत गेलो.
तू लवकर ये असे तरी कसे म्हणू? पण तुझी वाट बघतोय असे तरी नक्कीच म्हणू शकतो.

कुसुमाग्रजांची एक कविता आहे बघ
समिधाच सख्या त्या
जात्याच रुक्ष त्या
त्यात कसा ओलावा.
तशी तू आहेस जात्याच रूक्ष नाहीस तरीही माझ्यातले लेखकाचे स्फुल्लिंग सतत चेतवत राहिलीस.
तुझ्यावर नेहमीच लोभ करणारा

            तुझा भाई
 • समिधा गांधी
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

2 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular