Homeवैशिष्ट्येभाग एक - जाधेवाडी वर बोलू काही..

भाग एक – जाधेवाडी वर बोलू काही..

आज मला स्वतःला प्रामाणिकपणे वाटलं की आज आपल्या जाधेवाडी गावावर काही तरी लिहावं, बोलावं, सांगावं कारण मला जे दिसत, उमगत, वाटतं ते एकदा समोर मांडून तरी पाहू. खरंतर हे जे मी आज लीहतोय ते लिहायची वेळही आज माझ्यावर यायला नको होती पण मला लिहावं लागतं आहे कारण हे जे लिहल आहे ते लिहन म्हणजे आपल्या गावातल्या प्रत्येक नागरिकाचा हा आवाज आहे. त्यांच्या मनातल्या या भावना आहेत आणि त्या भावना मी आज मांडणार आहे कारण जे सत्य आहे ते लोकांपर्यंत पोहचवन हेच खरं लेखकांचं कर्तव्य असत. आणि आज तेच मी मांडणार आहे..
आपल जाधेवाडी हे गाव अतिशय सुंदर, आनंदी, लहानसा अगदी मोजक्या घरानी, शे- पाचशे लोकसंख्या असणार आपल गाव. हे गाव जरी लहान असल तरी या गावच्या पोटात काय आहे कोणालाच काहीच कळत नाही. सर्वात वाईट अवस्था म्हणजे आपल गाव इथ आहे हे सांगण्यासाठी आपल्याला दुसऱ्या गावची ओळख सांगावी लागते उदाहरणार्थ – कुठ आल तुमच गाव ..? मग आम्ही बोलणारं ते भादवण जवळ त्या आजरा – गडहिंग्लज रस्त्याला हाय ते. मग चार गावचे रस्ते सांगितल्यावर आपल्या गावचा पत्ता समोरच्याला कळणार अस का झाल..विचार केला आहे कधी. ? नाही ना . मी सांगतो .


आजही तुम्ही आपल्या गावच्या वेशीवर जा तुम्हाला आपल्या गावचा बॉर्ड दिसतो का पहा. नाही दिसरणार तिथं दिसणार फक्त अपर्णा हॉटेल नावाचा बोर्ड. मग ज्या गावचा बोर्ड नाही,ओळख नाही तर मग लोकांना कळणार कसे की इथ जाधेवाडी गाव आहे.
ही झाली आपल्या गावापासून झालेली सुरुवात.
आपण जेव्हा आजरा – गडहिंग्लज बसणं प्रवास करतो तेव्हा आपल्याला जे तिकीट भेटतं तेव्हा त्या तिकिटावर आपण आपल्या गावाचं नाव सांगितलं तरीही आपल्याला खोराटवाडी किँवा भादवनवाडी या गावाचं तिकीट मिळतं एकदा तपासून पहा एवढच काय तर जाणारी जी गाडी आहे ती देखील आपल्या गावच्या बस स्टॉप वर न थांबता दुसऱ्या गावच्या स्टॉपवर थांबते
सार कटू वाटेल पण सत्य आहे. म्हणजे आपण बड्या बढाया मारत असतो ना तर मग त्या काहीच कामाच्या नाहीत कळलं का जर अशी परिस्थिती असेल तर.
आपल्या गावच रेशन भरायला जे हकाचे आहे, एवढंच नाही लाईट बिल भरायला, म्हाताऱ्या माणसांची पेन्शनचे पैसे काढायला आपल्याला चालत सादारण सहा- ते सात किलोमीटवर दूर अंतरावर चालत जावं लागतं कधी केलाय का विचार याचा.आपल तरुण वर्गाचं ठीक आहे पण ही म्हातारी माणसं बिचारी आजही चालत त्या भादवन गावाला जातात आणि समजा रेशन दुकान किंवा बँक बंद असेल तर परत चालत येतात अन् जर रेशन जरी मिळालं तर ते डोक्यावरून घेऊन येतात लक्षात घ्या मित्रानो थोड्या वर्षांनी आपणही म्हातारं होऊच की मग आपण ही असच चालत जायचं का…?मग याचा विचार केला आहे का आपल्या गावात सुविधा का नाही..? होऊ शकत, विचार करतात सर्व पण बोलणारं कोण ..? कोणाला बोलणारं कोणाला.? कारण आपलेच दात आणि आपलेच ओठ याच एकमेव कारण म्हणजे मतदान .
जेव्हा आपण एकाला मत देतो तेव्हा विचार करतो का…? ज्याला आपण मत देतोय तो राजकारणी आपल्या गावचे, आपल्या कुटुंबाचे कल्याण करील का. नाही ना आपल्याला दिसते फक्तं पैसा, दारू, भावकी, भांडण आणि महत्वाचं म्हणजे दुसऱ्यावर जळण. जो चांगल काम करतो त्याला माग खेचन आणि जो काहीच करत नाही त्याला निवडून देणं मग तो कोणी असो
हा प्रश्र्न फक्त माझ्या एकट्याचा नाही सर्व गावकऱ्यांचा आहे. जो निवडणुकीला उभा राहतो त्याच आपण शिक्षण पाहतो का कधी ? त्याच्या हातून नक्की चांगली कार्य घडतील का ?असा कोणताच विचार न करता आपण डोळे झाकून मतदान करतो. माझं तर ठाम मत आहे ज्याला तुम्ही मतदान करता तो आपल्या गावच कल्याण किती करू शकतो..? त्याची ती कुवत आहे का .?असेल तरच मतदान करा नाही तर राहू दे
अहो ज्या गावात समता, बंधुता, लोकशाही या मुल्यांच पालन होत असेल तरच आपण हे करू शकतो आपल्या गावात फक्त एकच आहे ते म्हणजे आपापसात असनारे वाद आणि यामुळे आपली प्रगती होत नाही.
गावात मोजकीच कामे करून त्याचे आजकाल फोटो काढून पाठवले जातात. उदाहरणार्थ – गावचे रस्ते, ग्रामपंचायत रंगकाम, शाळेचे रंगकाम, मंदिराचे रंगकाम, पण जे करायला हवं ते कोणीच दाखवत नाही. शाळेचे, ग्रामपंचायतीचे रंगकाम केले पण त्याच्या समोर आसलेला कठडा पडला आहे त्याच काय..? ग्रामपंचायतीच्या सामोर ते भले मोठे मातीचे ढीग लावले आहेत ते कोण काढणार, गावची गटारे बांधून झाली आहेत पण ती झाकणार कोण. ती झाकत नाहीत म्हणून आपणच त्यात घाण टाकतो याला पण कारणीभूत आपणच, मंदिरांना रंगकाम झालं पण त्या मंदिरा समोर असणारा कलेचा स्टेज ढासळत चालला आहे त्याचं काय…? लोकांना फक्त आणि फक्त चांगले काम झाले आहे ते दिसत पण बाकीची काम अपुरी आहेत ते कोणाला दिसत नाही.
यावर्षी आपला गावचा रस्ता झाला. अतिशय छान रस्ता झाला आहे पण ते काम ह्यान केलं, त्यानं केलं, त्याच्या पैशातून केलं, त्यान पैसे खाले, यावर जास्त चर्चा आहे. सरळ आणि जे स्पष्ट बोलायचं झालं तर मी कोणाची बाजू घेत नाही पण एकच सांगतो जो आपल्या ग्रामपंचायतीचा सदस्य नाही आणि ज्याला आपण मते दिले नाही आणि निवडणुकीत ज्याला आपण पाडला आहे तोच आपल्या गावची काम करतोय हे सत्य आहे आणि हे आपल्या गावातल्या सर्व नागरिकांना मान्य करावच लागेल. मग तुम्ही त्याला कितीही नावे ठेवा. जो चांगल काम करेल त्यालाच तुम्ही मत द्या.
पावसाळ्यात आपल्याला शेतात जायचं असेल तर दोन तास चालत जावे लागत कारण काय तर शेता पर्यंत जाण्यासाठी चांगली वाट नाही. यालाही कारणीभूत आपणच आहोत कारण आज शासन नियमानुसार प्रत्येक गावात शेता पर्यंत रस्ता व्हायलाच हवा. मग सांगा आपल्या गावात का नाही होऊ शकत. कारण आपण कोणीच विचारत नाही इथच आपल चुकत ना गावकऱ्यांनो
सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला ज्या काही सुविधा पुरवल्या जातात त्या अर्धवट पुरवल्या जातात म्हणजे थोडक्यात सांगायचं तर गावातील आर्ध्याच लोकांना सुविधा मिळतात अर्ध्या लोकांपर्यंत सुविधा पुरवल्या जात नाही आणि काहीना तर कल्पनाच नसते कारण का…? यामागच कारण एकच आपण ज्या माणसाला निवडून देतो तो फक्त आपल्याला ज्यांनी मते दिली आहेत त्याचंच फक्त भले करतो. आणि त्याला ज्याने मते दिली नाहीत त्याला मात्र या सुविधा पासून वंचित रहावे लागते.
यालाही कारणीभूत आपणच आहोत. अजूनही वेळ गेली नाही जागे व्हा यातून. जो गावच्या सर्व नागरिकांचं कल्याण करील त्यालाच मते द्या
आज गावातील अनेक लोकांना या सर्व समस्यांना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळं विचार करा.अजून भरपूर समस्या आहेत गावच्या. आपण जर एकत्र आलो तरच गावचा विकास होईल.
आज युवा पिढीतील तरुण वर्ग शिक्षण या क्षेत्राला दुरावला आहे .याचे परिणाम थोड्या वर्षांनी आपल्याला दिसून येईल. कसं ते सांगतो .
आज आपल्या गावात २०११ ते २०२२ या काळात फक्त दहावी झालेले मुलांची यादी काढा. त्यात पदवीधर शिक्षण किती मुलांनी घेतल आहे ते फक्त बघा. शंभर मधले पंधरा ते वीस मिळतील. थोड्या मुलांनी आय. टी. आय. केलेला दिसून येईल आणि तो पण अर्धवट. दहा बारा वगळता. बाकीचे मग करतात काय. मी सांगतो. क्रिकेट खेळने, गावभर फिरणे, नेत्यांच्या बढाय मारत फिरणे, कुत्री पळवणे, दिवसभर चांभार चवकश्या करणे, निवडणुका आल्या की पार्ट्या करत फिरणे. सर्वात महत्वाच म्हणजे सकाळ, दुपार आणि रात्री घरी येऊन पोटभर जेवणे आणि निवांत झोपणे ही यांची प्रमुख कामे आहेत.
याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत. म्हणून त्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन करणे, योग्य त्या ठिकाणी शिकण्यास प्रोत्साहित करणे खूप महत्वाचे आहे .कारण आताच्या डिजिटल युगात जॉब मिळणे हा सुधा एक खेळ बनला आहे . क्रिकेट खेळणे , म्हणजे सर्वस्व नाही पण सर्वस्व म्हणजे क्रिकेट नाही. एवढं लक्षात घ्या शिका, संघटित व्हा, चांगली काम करा, सण उत्सव एकत्र साजरे करा. गावची प्रगती कशी होईल यावर लक्ष द्या मित्रांनो. आपण सर्वजण एकत्र आलो ना खूप काही करू शकतो पण त्यासाठी आपण एकत्र येणं फार फार महत्वाचे आहे. बघा जमत का.

आपण सर्वजण एकत्र येऊ, आपला गाव सूख, समृध्दी व थाटात सजवू. मग अभिमानानं जेव्हा कोणी विचारेल की तुझ गाव कुठल तेव्हा आपल्या गावाचं नाव समोरच्याने ऐकल्यावर त्यांच्या डोळ्या समोर आपल्या गावचा नकाशा उभा राहिला पाहिजे असा गाव आपण बनवू. तिकीट काढल्यावर त्या तिकिटावर आपल्या गावच नाव छापलेले दिसायला हवे एवढच नाही तर आपल्या गावच्या बस स्टॉप वर एस. टी थांबलीच पाहिजे. अस अफाट काही तरी करू चला

स्वराज्य स्थापन होण्याआधी महाराष्ट्र म्हटल की मोघल समोर दिसायचे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य जेव्हा स्थापन केले तेव्हा महाराष्ट्र म्हटल की सर्व गणीमान समोर मराठे दिसायचे अशीच प्रतिकृती आपण आपल्या गावची स्थापन करायला हवी.

पुढील भाग लिहायचं की नाही हे तुम्हीच ठरवा तुमची मान्यता असेल तर पुढील भाग लिहेन..

टीप – कोणाला काही मत मांडायचे असेल तर मांडू शकता चूक झाली असेल तर कृपया सविस्तर संपर्क करावा

लेखक – अनिकेत शिंदे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular