करंगळी दाखवून
नाक मुरडलं
की कट्टी म्हणजे डिव्होर्सच असायचा आमचा..
आणि
थुका लावून दोन बोटांची बट्टी दाखवली
की सगळ्या चुका माफ
इतकं साफ असायचं आमचं प्रेम..
कट्टी बट्टी च्या वयात
” तुझी शपथ “
म्हणलं
तरी सहज विश्वास बसायचा
एकमेकांवर
खोटी शपथ खाल्ली की माणूस मरतो
अंधश्रद्धा असली तरी
शपथेवर श्रद्धा असायची खूप…
तिचा पडका दात
दिसायचा
पण ओठांवरती लक्ष जायचं नाही
ओठ बोलण्यासाठी असतात
आणि
मुका तर फक्त
गालाचाच घ्यायचा असतो,
अवयवांची ओळख नसलेलंच किती बरं असतं ना..?
अक्कल
नसणाऱ्या वयात
मोठ्यांची नक्कल करायचो
तेव्हा समजायचं
ती स्त्री आहे आणि मी पुरुष..
घर घर खेळताना
ती बायांची कामं करायची आणि मी गड्यांची..
संस्कृतीने लादलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीच
हेच ते गोड वाटणारं
बाळकडू…
आयुष्याने अजून किती वेळ
असच थांबावं
ट्याम्प्लिस घेऊन..?
पण मला
आजही असंच वाटतंय
ती लपली आहे इथंच कुठं तरी
मला ढप्पा देण्यासाठी…
- सुमित गुणवंत

मुख्यसंपादक