Homeमुक्त- व्यासपीठमाझी मायमराठी आणि मी

माझी मायमराठी आणि मी

“रसिक जणांनो,
माझ्या मराठी भाषेचं कौतुक काय सांगू…
मी अशी शब्दयोजना करेन, की मी केलेले वर्णन चांगले की अमृत? अशी स्पर्धा लावली, तर मी केलेले वर्णन जिंकेल…
इतकी गोड, रसाळ माझी मायमराठी भाषा आहे.”
असे श्री संत ज्ञानेश्वर माऊली आत्मविश्वासाने म्हणतात.
पण, फक्त संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून माझी मराठी भाषा सर्वांत चांगली आहे का…?
तर नाही…
माझी मायमराठी मला प्राणांहून प्रिय आहे, म्हणून ती सर्वांत चांगली आहे.
इथे मी माझी भाषा श्रेष्ठ आहे असे म्हणत नाही, कारण श्रेष्ठ आणि कनिष्ठ या संकल्पनेचा, जेव्हा जेव्हा उपयोग केला जातो, तेव्हा तेव्हा ती भाषा आतून पोखरली गेलेली असते.
आणि त्या भाषेच्या मजबूती अभावी पोकळपणामुळे कालांतराने ती नामशेष होण्याच्या मार्गावर असते.
‘म्हणून कोणतीही भाषा श्रेष्ठ नाही, किंवा कोणती कनिष्ठ नाही.’

माझ्या लहानपणापासून गावात अवतीभवती सगळीकडे लोक ज्या भाषेत बोलतात, त्याच भाषेत मी बोलत आलेलो आहे. अगदी कॉलेजमध्ये सुद्धा गावठी भाषेचा तडाखा सर्रासपणे सुरू ठेवलेला. काही शहरी मित्रांच्या सहवासात काही शब्दांत सुधारणा होत गेली, पण उच्चार आणि स्वर तोच कायम राहिला.
पुढे नोकरी निमित्त पुण्यात आलो, तरीही गावाकडे जसं बोलत होतो, तसंच इथं बोलत होतो. फरक इतकाच, की गावी ठामपणे, विश्वासाने बोलत होतो , ते इथे दबक्या आवाजात बोलत होतो, कारण आपण जे बोलतो, त्या मराठीतील शब्दाचा अर्थ या लोकांना लागतोय की नाही किंवा मी जे बोलतोय त्या शब्दांना शुद्ध भाषेत काय म्हणत असतील, याबद्दल शंका यायची.

मी पुण्यात नवीनच होतो, त्यावेळची गोष्ट,
एका सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानात नेल पेंट आणायला गेलो. दुकानदाराला विचारले, ” जरा वेगवेगळ्या रंगांच्या नख पॉलिस दाखवता का?”
त्यावर त्याने खालून वरपर्यंत निहाळून पाहिले आणि म्हणाला, “कसलं पॉलिस?…”
मी माझा हात पुढे केला आणि बोटांची नखे दाखवत त्याला बोललो,” या नखांवर लावायची रंगाची बाटली… नख पॉलिस…”
यावर तो इतका खळखळून हसायला लागला. एक क्षणभर मला वाटले, की हा माणूस वेडा आहे… की मला वेड्यात काढतोय,
कारण त्याने इतकं हसण्यासारखा असा काही विनोद मी केलाच नव्हता. तो हसून शांत व्हायची वाट बघत मी त्याच्याकडे पाहत तसाच उभा राहिलो. त्यानंतर तो थोडा भानावर आला आणि म्हणाला, ” अहो, याला नेल पेंट म्हणतात.”
थोडं थांबला आणि पुन्हा फक्त ‘नख पॉलिस…’ इतकंच बोलून पुन्हा उकळ्या फुटलेलं हसू तोंडातल्या तोंडात दाबून धरत मला नेल पेंट दिली.

काही दिवस इथं राहिल्यानंतर समजले, शहरात मराठी शब्दाऐवजी जास्तीत जास्त इंग्रजी शब्द वापरतात. शाळेत असताना, खूप इंग्रजी शब्दांचे अर्थ तोंडपाठ केले होते,
पण पुस्तकातील शब्द आणि व्यवहारातील शब्द यांचा दूर दूर पर्यंत कुठे संबंध लागत नव्हता.
या वातावरणात राहिलो, रुळलो, मिसळलो, तेव्हा कुठे आत्मविश्वासाने आणि जाणूनबुजून मराठीतच बोलू लागलो.

एकदा अॉफिसमध्ये वरीष्ठ साहेबांनी कपाटातून एक महत्त्वाची फाईल शोधून आणायला सांगितली. मीही लगोलग कपाटाकडे गेलो. खूप वेळ फाईलींची उलथापालथ केली, पण ती सापडलीच नाही. मी तसाच येऊन साहेबांच्या समोर उभा राहिलो आणि म्हणालो,
” सर, लय हुडाकली, पण कुठंच घावली नाय.”
माझं बोलणं ऐकून साहेबांनी हातातलं काम जिथल्या तिथं ठेवलं आणि माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने कटाक्ष टाकला आणि बोलले,
” म्हणजे काय ?”
कदाचित त्यांना मी काय म्हणतोय हे समजले नसावं, हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी पुन्हा बोललो,
” सर, खूप शोधली ,पण सापडली नाही.”
त्यावर ते शांतपणे “ठिक आहे. नंतर दोघे मिळून शोधू.”, असे म्हणाले.

वरील दोन घटनांवरून, मला इतकंच म्हणायचं आहे, की आर्थिक आणि नैसर्गिक कारणांमुळे भाषा जितकी दडपली जाते, तितकीच ती सामाजिक आणि माणसांचा त्या भाषेकडे बघण्याचा दृष्टीकोन यामुळेही भाषा मागे पडत जाते.
मराठी बोलता बोलता त्या वाक्यात हिंदी आणि इंग्रजी भाषेचाच जास्त वापर केला जातो आणि अशा पद्धतीने बोलणाऱ्यांकडे इतर लोक ‘उच्च दर्जाचा माणूस’ म्हणून बघत असतात. सर्वत्र ही एक सामाजिक मानसिकताच तयार झालेली तुम्हाला दिसेल.
मान्य आहे, की भाषेला एखाद्या साच्यात घालून बंदिस्त करता येऊ शकत नाही, कारण कोणतीच भाषा बंदिखान्यात वाढत नाही. ती व्यावहारिक शब्द स्विकारुन समृद्ध होत जाते. कोणतीही भाषा तळ्यात साचलेल्या पाण्यासारखी नसते,
तर ती काळानूसार नव्या ज्ञानाचे, नव्या विचारांचे, नव्या जाणिवांचे पाझर स्विकारून नदीतील वाहणाऱ्या पाण्यासारखी वाहत राहते.
‘आजपर्यंत काळानुसार आवश्यक त्या ठिकाणी मराठी भाषा इतर भाषेतील शब्द स्विकारत आलेली आहे, पण प्रतिष्ठेच्या नावाखाली आपण स्वतःहून काही शब्द तिच्यावर लादतो आहे.’
आपलं वेगळेपण दाखवण्यासाठी मराठी भाषेत बोलताना किंवा लिहिताना जास्तीत जास्त इंग्रजी आणि हिंदी भाषेतील शब्दांचा वापर केला जातो, पण यामध्ये आपण कुठे तरी आपलेपण हरवत जातो, ही वास्तविकता आहे.
ज्याला जे सोईचे वाटेल ते त्याने जरूर करावे, यावर माझं बंधन नाही,
पण फक्त मराठीतच बोलणे किंवा लिहिणे, म्हणजे अडाणीपणाचे आणि मागासलेपणाचे लक्षण आहे असे मानणे, म्हणजे वैचारिक मागासलेपणाचे लक्षण आहे.

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की
‘विचारांची प्रगती आणि क्रांती स्वतःच्या म्हणजे मातृभाषेच्या किनाऱ्यावरच पेरता येते.’
हे तुम्ही त्या दिशेने पाऊले टाकाल, त्यावेळी तुम्हाला जाणवेल.

परदेशातील लोकांशी कामानिमित्त अनेकदा संपर्क येतो, त्यावेळी सवयीने ते लोक मुद्दामहून येत नसेल तरीही जमल तसं आपल्याशी मराठी भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतात, पण आपलेच लोक पुढारलेपणाच्या नावाखाली मातृभाषा सोडून सर्रासपणे इतर भाषा वापरतात.

एक समाज रचनाच अशी झाली आहे, की जो बोलताना किंवा लिहिताना जास्तीत जास्त इंग्रजी आणि हिंदी भाषेचा वापर करतो, तो खूप उच्च शिक्षण घेतलेला.
आणि फक्त मराठी भाषा बोलणारा अडाणी किंवा गावठी.(हे आपल्याला what’s up मॅसेजेस मधून संवाद साधताना सर्रासपणे लक्षात येईल)

भाषेच्या संवर्धनासाठी मंत्रालयाकडून दर तीन वर्षांसाठी एक समिती नेमली जाते, पण मुळात मातृभाषा टिकवून ठेवणे हे एखाद्या मंत्रालयाच्या शासकीय विभागाचे काम आहे का?…
भाषा जपणं हे माझं, तुमचं, आपल्या सगळ्यांचं काम आहे. आपण बोलताना मराठी बोलत आहोत, याचा मनात सतत अभिमान असला, म्हणजे आपल्याला इतर भाषेतील शब्दांचा टेकू घेण्याची गरजच पडणार नाही.

माझे हिंदी भाषिक वरिष्ठ, जेव्हा मी अनेक कागदपत्रे मराठीत सादर केलेली आणि त्यावर मी मराठीतच सही केलेली पाहतात त्यावेळी हमखास म्हणतात, ” पक्का मराठी माणूस! “
आणि वरून ‘जय महाराष्ट्र!!’ म्हणून साद घालतात, तेव्हा उर अभिमानाने भरून येतो.
जवळ जवळ माझे देशातील महाराष्ट्रासह कलकत्ता, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, उडिसा, छत्तीसगड, आसाम आणि परदेशातील दुबई येथील सहकारी मित्र , “जय महाराष्ट्र! भाऊ.” म्हणून फोनवरून संपर्क साधतात, त्यावेळी आपण आपल्या जिवलगांशी बोलत आहोत याची जाणीव होते.
परदेशात गेल्यानंतर एखादा अनोळखी माणूस अचानक आपल्याशी मराठीत बोलायला लागला, की तो आपला जवळच्या नात्यातील, पण खूप दिवसांनी भेटलेला ‘आपला माणूस’ आहे, असं वाटायला लागतं.
ही गोडी आहे…
ही आपुलकी आहे…
ही जादू आहे…
आपल्या मराठी भाषेची.

http://linkmarathi.com/मी-मावळा-शिवरायांचा/

कवी गुरू ठाकूर म्हणतात त्याप्रमाणे,
अलवार कधी, तलवार कधी,
पैठण सुबक नऊवार कधी,
कधी कस्तुरीचा दरवळ दैवी,
ती सप्तसुरांवर स्वार कधी,

अशी चराचरात वसलेली माझी मायमराठी.

_सुभाष मंडले

( सदस्य, जागतिक लोकसाहित्य मंच )

RELATED ARTICLES

7 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular