शोधू पाहते मी स्वतःचं अस्तित्व
तुमच्या या पांढरपेशा समाजात…
तशी ओळख आहे माझी
तुमच्या या पांढरपेशा समाजात…
कधी रांड,कधी छिनाल तर कधी वेश्या म्हणून
तुमच्या या पांढरपेशा समाजात…
मला खरं तर,
याच नावानं ओळखतात…
नटते मीही रोजचं नव्या नवरीसारखी
रोज होणाऱ्या माझ्या त्या मधुचंद्रासाठी…
कधी खिडकीत तर कधी दारात
शुक-शुक करते गिर्हाईकाला बघून टीचभर पोटासाठी…
सभ्य असणाऱ्या या माणसांच्या दुनियेत
भेटतात कधी भडवे-दलाल तर कधी वासनेचे शिकारी…
तुटून पडतात अंगावर,खेळतात कधी छातीशी
तर कधी चाळा करतात पोटाखालच्या इंद्रियाशी
जशी टाकतात कुत्र्यासमोर भाकरी…
म्हणतात ना,तुमच्याच या पांढरपेशा समाजात
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती…
पण सभ्य असणाऱ्या या माणसांच्या नजरेत
लपली आहे फक्त वासनेची विकृती…
वाटतं मलाही नेहमीच,
कुणाचीतरी आई,बहिण तर कधी पत्नी म्हणून जगावं…
डोळ्यात लपलेले अश्रू अन् मनातल्या या भावना
अंगावर खेळणाऱ्या गिर्हाईकाला कसं हे सांगावं…?
येईल माझाही एक राजकुमार
अन् बाहेर काढेल या वासनेच्या दलदलीतून…
जिवंतपणीच मरणं भोगते मी
फक्त याच आशेतून…
तुमच्या या पांढरपेशा समाजाने मांडलाय बाजार
माझ्या तारुण्याचा अन् इज्जतीचा…
क्षणभंगूर हे तारुण्य उद्या नष्ट होताच
स्वत:ला पांढरपेशा म्हणविणारा हा समाज
प्रश्न सोडवेल का ?
माझ्या उद्याच्या फक्त एका भाकरीचा…!
- संदीप देविदास पगारे
मु.पो.खानगाव थडी

मुख्यसंपादक