रविवारी, खूप दिवसांनी कुठेतरी फिरायला जायचे ठरवले. ठरवले होते राजगडचा ट्रेक करायचा पण अर्ध्या वाटेत गेलो आणि नियोजन बदलले. गाडी राजगड रस्त्यावरुन पुढे पानशेत डॅम आणि लवासा सिटी कडे धावू लागली.
पानशेत वर पहीला ठिय्या टाकला. मस्त डॅममध्ये बोटींग केले. शांत पाण्यावर निवांत पडून राहण्याचा आनंद घेतला. जाता- जाता पाण्याच्या तरंगावर एक दगडाची बारीक चिप भिरकावून दिली अन् …. लहानपणीचा आनंद घेतला.
लवासा सिटी बद्दल खूप ऐकले होते, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी (HCC India) द्वारा पोर्टोफिनो या इटालियन शहराच्या धर्तीवर बांधलेले हे शहर आज वादात सापडले आहे. काहीही असो पण पश्चिम घाटात बाजी पासलकर जलाशयाच्या काठावर वसलेले आणि कधी पाहण्यात न आलेले हे शहर खूप निवांत वेळेत पाहण्याचा योग आला.
लवासा शहराच्या सुरुवातीलाच बाजी पासलकर जलाशयावर मोठा पुल बांधण्यात आला आहे. मी सहकारी मित्र सद्दाम सोबत पुलावर थांबून फोटो काढत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत होतो. याचवेळी मागून एक गोड आवाज आला. दादा सरबत पाहीजे का? खर तर आम्ही वाटेत येताना थंड पिण्यासाठी काहीतरी शोधतच होतो. पण काहीही मिळाले नसल्याने सरबत हा शब्द कानावर पडताच आम्ही बाजूच्या कट्ट्यावर मांडी घातली.
त्या छोट्या मुलीने पिशवीतील दोन ग्लास बाहेर काढत बाटलीतील तयार थंड सरबत त्या ग्लास मध्ये ओतून आमच्या हातात दिले. सरबताच्या पहिलाच घोटाने कोरड्या तोंडाला ओलावा देत लिंबू , आले आणि साखर-मीठाच्या मिश्रणाचा आस्वाद दिला.
दुसरा घोट पितच माझ्या तोंडून दिदी तुझे नाव काय आणि तु शाळेत कितवीला आहेस असे दोन प्रश्न बाहेर पडले. त्यावर माझे नाव.. सुनिता आणि मी ७ वी मध्ये आहे.
मी... आज काय शाळा नाही?
आज रविवार सुट्टी आहे. म्हणूनच तर आले सरबत विकायला. आईला थोडी पैशाची मदत व्हावी म्हणून मी सुट्टीच्या दिवशी सरबत विकते. यातून आईला मदत पण होते आणि माझा शाळेचा खर्च पण मिटून जातो.
तसं पहिलं वाक्य मला विशेष वाटलं नाही पण दुसरं वाक्य कुठेतरी माझ्या आयुष्याशी मला मिळत-जुळत वाटलं. शिक्षणाचा खर्च पण माझ्या या सरबत विकण्यातून करुन टाकते.
तसा मी ५ वी पासूनच भाषण करायचो पण ८ ला आलो आणि स्पर्धा समजली. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा जिंकायचो आणि आलेल्या बक्षिसाच्या रकमेतून माझ्या शिक्षणासाठी थोडाफार हातभार लावायचो. पुढे १० वी झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरात जाव लागणार होतं. गावातून शहरात जायचे म्हणजे जाण्या येण्याचा बसचा मासिक पास आणि काॅलेजची फी. इतकाच खर्च होता.
खर तर माझे आजी-आजोबा, आई-वडील आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी मला शिक्षणासाठी कधीच काही कमी पडू दिले नाही. पण घरातील त्यावेळीची परिस्थिती आणि समस्या पाहता मी बाहेर इतर कामे करुन अनेक वेळा शिक्षणाचा व स्वतःला आवश्यक खर्च स्वतः केला.
माफ करा. थोडा माझ्याच भूतकाळात हरवलो होतो. मी सुट्टीच्या दिवशी सरबत विकते. यातून आईला मदत पण होते आणि माझा शाळेचा खर्च पण मिटून जातो असे बोलणाऱ्या सुनिताकडे मी कौतुकाने पाहत होतो. एवढ्या कमी वयात परिस्थितीची जाणीव ठेवून स्वतःच्या आईला मदत करणारी १२ वर्षाची सुनिता माझ्यासमोर भविष्यातील कर्तृत्ववान मुलगी, कर्तबगार महिला आणि भारताचं बलशाली अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी संस्कारक्षम पिढी घडवणारी माता या तीन भूमिकांमध्ये उभी होती.
आज लवासा सिटी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिथे एका कंपनीने इटलीतील पोर्टोफिनो या शहराच्या धर्तीवर नवे शहर उभारुन भारतात इटली आणण्याचा प्रयत्न केला. पण तेथील स्थानिक १३ वर्षाच्या सुनिताला भेटल्यावर कोणी कितीही इटली आणू दे नाहीतर जपान आणू दे भारतीय संस्कार आणि संस्कृतीची पाळमूळ ही अधिक खोलवर रुजली आहेत आणि ती पिढ्यान-पीढ्या अबाधित राहतील याचा विश्वास वाटला.
चला जाऊ आता. अजून पुढे सरबत विकायचा आहे. असे म्हणत म्हणतच ती बोल्ली दादा कसा होता माझ्या हातचा सरबत?
माझ्या तोंडून शब्द पुटपुटले…
सुनिता तु अन् तुझ्या हातचा सरबत एक नंबर गोड होता.
- नयन राजेश्री राजेंद्र गुरव
मुख्यसंपादक