Homeमुक्त- व्यासपीठसोशल मीडिया आणि फसवणूक

सोशल मीडिया आणि फसवणूक

                     सध्याच्या काळात समाज माध्यमं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा आरसा होऊन गेला आहे, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टी माणूस याच समाज माध्यमांवर अगदी सहज टाकत असतो, आणि हे कित्येकांच्या अंगळवणी, सवयीचे झालेले आहे. याच लागलेल्या सवयींमूळे कधीतरी आपल्याच भावनांचा कडेलोट होऊ शकतो याची कुणालाच पुसटशीही कल्पना नसते. यात महिलांची जितकी फसवणूक होते तितकीच पुरुषांचीही फसवणूक होते.

या अशा आभासी जगाने आता सर्वांनाच भुरळ घातलेली आहे, याला कोणीही अपवाद नाही. यातून सर्वजण जगाच्या कानाकोपऱ्यातून एकमेकांच्या जवळ आले असले तरी त्याचे दुष्परिणाम हे भयानक आहेत शिवाय जेव्हा परिणाम समोर येतात तेव्हा मात्र आपोआपच डोक्याला हात लावून बसायला भाग पडते.

खरं तर प्रत्येक माणसाने आपल्या जवळच्या ओळखीच्या माणसांशी संवाद साधून मनातले काही असेल तर मोकळे व्हावे.
घरातल्या व्यक्ती असतातच ना, मग इतरांशी मनातले सांगण्याची काय गरज असते. बरं, एक वेळ मान्य केलं की आपली लोकं आपल्याला समजून घेतील की नाही या अविचारातून आपण सांगत नाहीत, मुळात हा असा विचार करणेच चुकीचे आहे, समजून घेतील किंवा नाही घेणार हा मुद्दा तेव्हा उत्पन्न होतो जेव्हा आपण त्यांना आपल्या मनातले सांगत नाही. एकदा सांगितले की असे मुद्देच अस्तित्वात उरत नाहीत.
आपल्या घरात आपली आई, बाबा, भाऊ, बहीण,अशी अनेक नाती असतात त्यांच्याशी बोलून नक्कीच आपल्याला पडलेले प्रश्न सुटू शकतात, फक्त आपल्याला तितकं धैर्य ठेवता आले पाहिजे.
“बोलून बघा, प्रश्न नक्कीच सुटतील”

समाज माध्यमांतून नक्कीच आपल्याला लहान असल्यापासून किंवा शाळेतील मित्र-मैत्रिणी आपल्या संपर्कात येऊ शकतात.
इथपर्यंत ठीक आहे, परंतु नवीन ओळखी निर्माण करायला जाताना समोरच्या व्यक्तीची प्रोफाइल नीट तपासून बघायला हवी. हेही तितकंच खरं आहे.
सुसंवाद राहावा यासाठी गरजेपोटी बोलत राहणे वाढत जाते, याच निर्माण झालेल्या विश्वासातून आपले फोटो, वैयक्तिक माहिती कधीही न पाहिलेल्या माणसांना सोपविली जाते, मग त्याचा गैरवापर करून ती माणसं स्वतःचा स्वार्थ साधण्यास मोकळी होतात, ज्याचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध आलेला नसतो, अशा लोकांना आपण आपल्या जीवनातील सगळी हकीकत सांगून टाकतो. का ? तर एक अनोळखी व्यक्ती आपल्याला विश्वासातला वाटतो म्हणून ?
मग विचार करा, आपण घरातल्या माणसांवरही तितकाच विश्वास ठेवून जर त्यांच्याशी प्रामाणिक राहिलो तर, नक्कीच आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही.

या मायजाळमध्ये कित्येक व्यक्ती आपल्या आयुष्याला मुकलेही आहेत.
स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झाले तर, अनोळख्या व्यक्तींकडून येणाऱ्या मैत्रीच्या विनंत्या लगेच स्वीकार करणे चुकीचे आहे, आपण ज्या लोकांना ओळखतो त्यांची विनंती स्वीकार करा, परंतु अनोळखी माणसांकडून असे होत असेल तर, तपासून पाहिल्यावरच निर्णय घेणे योग्य ठरेल.
काही स्त्रिया आपल्या बाबतीत काहीतरी चुकीचे होत आहे याची जाणीव झाल्यावर समोरच्याला फटकारतात देखील आणि एखादे वेळी माणूस समोर असेल तर कानफटातही लावून देतात. परंतु काहीजणी समाजाच्या भीतीने म्हणजेच आपण बोललो तर लोकं आपल्याला काय म्हणतील, याच विचाराने आपले पाऊल मागे घेतात; अशा वेळी खरं तर महिलांनी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे, तरच असे वागणारे, विकृत बुद्धीच्या लोकांना असे करण्यापासून रोखता येईल.
कोणत्याही समाज माध्यमांत महिला सदस्य असतील आणि असा प्रकार घडल्यास त्या समूहाच्या प्रशासन मंडळास कळवून, स्वतः त्या माणसाच्या नावाने एक पोस्ट त्याच समूहात सादर करावी, अगदी त्या नालायक माणसाच्या नावासाहित, म्हणजे पुन्हा समूहातील कोणीही असे करण्यास धजावणार नाही.

स्त्रियांच्याच बाबतीत असे होते असे नाही, पुरुषांचीही तीच गत आहे, पण पुरुषांना आपण फसलो आहोत हे उशिरा कळते, आणि आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतलाय हे कळते. कारण पुरुषांना स्त्रियांची आकर्षणाची बाजू लंगडी करते. तिच्या गोड बोलण्यावर भुलले जातात, मागण्या पुरवतात, आपल्याकडून पैसा आणि आपला अमूल्य असा वेळ वाया घालवला जात आहे याची थोडीही भनक या फोफावलेल्या विचारांच्या, आपल्याकडे एक अद्भुत विचारसरणी आहे असे समजून चुकलेल्या, भुळचट लोकांना कळतदेखील नाही, आणि सर्वस्व लुटून बसतात. फक्त नी फक्त स्वतःच्याच अवचट बुद्धीचा वापर केल्यामुळे.

दुसरी बाब म्हणजे,फेसबूक या माध्यमाने नव्या लोकांची मैत्री होते हे जरी खरे असले, तरी थोडी सावधगिरी सगळ्यांनीच बाळगायला हवी. आता या फेसबुकचा वापर आर्थिक फसवणूक करण्यासाठीही केला जात असल्याचं समोर आलेलं आहे. याला सध्या फसवणुकीचा नवीन ट्रेंडच म्हणावा लागेल. जो सर्वात सोपा मार्ग आहे. कुठल्याही व्यक्तीचा एक फेसबुक अकाउंट बनवून मेसेंजरद्वारे त्यांच्या फ्रेंडलिस्ट मधील असलेल्या लोकांकडून पैसे मागायचे आणि ऑनलाईन ते पैसे आपल्या अकाउंटमध्ये मागून घ्यायचे. काही लोकं याला बळी सुद्धा पडली आहेत. म्हणूनच प्रत्येकाने सावधान राहायला हवे.

समाज माध्यमांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने पहावयास मिळते ती म्हणजे, लाईक्स आणि कमेंटची चढाओढ.
इथे सर्वांनाच व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण प्रत्येकाने व्यक्त होताना त्याच्या परिणामांचा विचार करायला हवा.
फसवणुकीला बळी न पडता, तसे झाल्यास बदनामीच्या कारणाला न घाबरता तक्रार करण्यास पुढे यायला हवं.
सर्वांनीच एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आपल्या घरात जी माणसं आहेत तशीच इतरांच्याही घरात आहेत, मग आपण त्यांच्याशी विचित्र वागलो तर, इतर लोक आपल्या माणसांशीही विचित्र वागले तर काय म्हणाल मग.
व्यक्त होणाचे समाज माध्यम एक खूपच चांगले माध्यम आहे, विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी एक उत्तम पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे, परंतु प्रत्येकाने त्याचा योग्य त्या रीतीने वापर करायला हवा.
आभासी जग असले तरीही आपण सगळेच त्यातून एकमेकांशी जोडले गेलो आहोत, त्याचा योग्य वापर आपल्याला करायचा आहे, याचे भान असावे.

✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर – आण्णा

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular