Homeवैशिष्ट्येअनोखे रक्षाबंधन

अनोखे रक्षाबंधन

ही कथा – कथा नाहीय, एक भावनिक बंध आणि मायेची सावली या कथेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आलेल्या संकटांना न घाबरता उठून उभे राहून मेहनत, कष्ट करून कसं एक भाऊ आपल्या मोठ्या बहिणीला आधार देतो, हे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कथा आवडल्यास, आपल्या शब्द-सुमनांनी अभिप्राय देण्यास विसरू नये.
धन्यवाद…!!💐
◆◆★◆◆◆★◆◆◆★◆◆◆★◆◆◆★◆◆◆★◆◆◆★◆◆

रक्षाबंधन –

अगं ताई आली तू, बस जर मी आलोच.

असं म्हणून कुणाल बराच उशीर झाला तरी घरी परतला नाही, म्हणून वहिनीला हाक मारून काजल ने वहिनीला विचारले, वहिनी कुणाल नक्की कुठे गेला आहे गं ?

ताई, ते सध्या कामाला नाही आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही आहे. लॉकडाऊन झाल्यापासून दोन वर्षे ते घरातच बसले होते, आता दोन महिन्यांसाठी एक काम पकडलं होतं, पण त्यांनीही आता त्यांचं काम पूर्ण झाल्यामुळे नको येऊ असं सांगितलं आहे. महिना झाला सध्या घरातच आहेत ते. सगळ्या मित्रांना आणी बाकी सर्व ओळखीच्यांनाही फोन करून रोज कामाविषयी विचारत असतात, पण कोणीही बोलावत नाही की सांगत नाही.

ताई, काल तुम्ही येणार म्हणून सांगितलंत तेव्हापासून ते रडत होते, ताई येणार आहे पण माझ्या खिशात दमडीही नाही, असे बोलून रात्रभर रडत बसले होते, आणि आता निघून गेलेत घराबाहेर. तुम्ही बसा मी बघून येते त्यांना, असतील इथे कुठेतरी.

थांब वहिनी, तो कुठे गेला असेल याची मला कल्पना आहे, तुला नाही सापडायचा तो. त्याच्या मनात असले काही विषय आले की तो ठरलेल्या जागी जाऊन विचार करत बसतो. लहापणापासून सवय आहे त्याला, आणि त्या जागेलाही त्याची.
तू थांब मीच जाते आणि आणते बघ त्याला.

रस्त्याने चालताना कोमलला लहानपणीचे हलाखीचे दिवस आठवत होते. आई-बाबा लहानपणीच आजारपणातून वारले आणि कुणाल वर घराची जबाबदारी पडली.
मी मोठी असूनही माझ्या शिक्षणासाठी काबाड कष्ट करत राहिला. म्हणायचा- मी शिकून काय करणार आहे, तुला दुसऱ्याच्या घरी सून म्हणून जावे लागेल तेव्हा काय तिकडे जाऊन भांडीच घसणार आहेस का ? शिकून घे.
शिकून खूप मोठी हो आणि चांगला नवरा बघून लग्न कर. मस्स्त संसार कर तुझा. इतक्या लहान वयातही मोठ्या भावासारखा सावलीप्रमाणे सोबत राहिला, मोठी होईपर्यंत मला कशाचेही काही कमी पडू दिले नाही. आज हे हवंय म्हटलं की उद्या डोळ्यासमोर वस्तू हजर असायची, आणखी काय लागलं तर सांग, हा तुझा भाऊ खंबीर आहे, अजिबात काळजी करू नकोस.
शिक्षण पूर्ण झालं नि दिवस भराभर सारून आम्ही कधी मोठे झालो हे कळलेच नाही. माझ्या लग्नासाठी स्वतःच कोणतेतरी स्थळ पाहिले आणि लग्न करून दिले. लग्नासाठी मला कळू न देता काढलेले कर्ज सात वर्षे फेडत होता, पण मला त्याची कधीच भनक लागू दिली नाही. लग्नाच्या तीन वर्षांनी नवऱ्याने मला सांगितले की, तुझ्या भावाने मला अट घालून दिली, तेव्हा तो हो म्हणाला.
अट होती – माझ्या बहिणीच्या डोळ्यांतून एकही अश्रूचा थेंब येता कामा नये, मान्य असेल तर लग्न लावून देतो.
त्या दिवशी माझ्यासाहित माझा नवराही माझ्याबरोबर रडला होता. म्हणाला, असा भाऊ सर्व बहिणींना मिळाला तर सगळ्या बहिणींचे भाग्यच उजळेल.

मनातले हे आर्जव चालू असताना आजीची टपरी कधी आली ते तिला कळलेही नाही.
टपरीच्या बाजूला कट्ट्यावर बसून असलेला भाऊ तिला दिसला. रडवेला चेहरा आणि डोळ्यांतून आलेले अश्रू तसेच गालावर सुकलेले स्पष्टपणे दिसत होते.
कोमल त्याच्या बरोबर समोर जाऊन उभी ठाकली. तसा तो कावरा बावरा झाला, आणि दोन्ही हातांनी आपले तोंड पुसत उभा राहिला.
बहिणीला पाहून त्याला राहवलं नाही, लहान पोरासारखा ढसाढसा बहिणीच्या खांद्यावर डोके ठेऊन तो रडू लागला, कोमल ने त्याला आईप्रमाणे जवळ घेतले, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याच्या डोळ्यांतली आसवे बघून तिचाही बांध फुटला आणि भाऊ-बहीण श्रावनधारा बरसाव्यात तसे रडू लागले.

अरे, आजपर्यंत मी मागितले ते तू मला आणून देत होतास, मला शिकवलंस, लग्न करून दिलंस आणि आज तुझ्यावर वेळ आली आहे तर तू माझ्या पासून लपवून ठेवलंस, का? तुला वाटलं बहिणीला त्रास होईल म्हणून. अरे आईचं काळीज आणि बापाची माया काय असते ते मला तुझ्यामुळे कळालं रे.
मी तुला असा एकटा पडू देणार नाही. मला तुझ्याकडून काहीच नकोय, आजपर्यंत जसे प्रेम दिलंस तसंच या पुढेही देत राहा.

कोमल ने घरातून निघताना ताटातली राखी उचलून आणली होती, ती राखी तिने त्याच्या पुढे केली, म्हणाली, हात पुढे कर, रक्षाबंधन करायचं नाही का रे ?
कुणाल पुन्हा भावुक झाला आणि पुन्हा आपल्या बहिणीला बिलगून रडू लागला.
ताई तुझ्यासारखी बहीण सगळ्यांना मिळाली तर सगळ्या भावांचे भाग्यच उजळेल.
ते राहूदे भाग्य बिग्य आता घरी चल, वहिनी वाट बघतेय.

दोघेही घरी आले…

अगं ये आश्विनी रात्रीचा भात आहे ना त्याचा फोडणीचा भात कर, माझ्या ताईला खूप आवडतो. इतकं बोलून कुणाल आतल्या खोलीत जाऊन लहानपणी ताईनेच स्वतःकडे राखून ठेवलेले पन्नास रुपये त्याला दिलेले तो घेऊन बाहेर आला.
ताई, नाही म्हणू नकोस आज, हीच माझ्याकडून रक्षाबंधनाची भेट समजून घे.
कोमलने ती नोट पाहिली आणि हमसून हमसून रडू लागली, अरे हे पैसे अजून जपून ठेवलेयस तू – कसा रे तू.
माझी आई – बाबा – भाऊ परमेश्वराने मला एकाच रुपात दाखवले…धन्य ते माझे आई-बाबा जे माझ्या पदरात असा भाऊ दिला.

असे हे अनोखे रक्षाबंधन…..

आजच्या रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या, माझ्याकडून आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

✍️ विजय वैशाली दत्ताराम पराडकर – आण्णा

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular