मागच्या रविवारी मार्केट मध्ये महांतेश या मित्रासोबत किरकोळ खरेदी करण्यासाठी गेलो होतो. मित्राला नाश्ता पार्सल हवा होता त्यामुळे आमची स्वारी एका प्रसिद्ध डोसा बनवणाऱ्या हॉटेलच्या समोर थांबली. मित्र आतमध्ये पार्सल आणण्यासाठी गेला आणि मी त्याची प्रतीक्षा करू लागलो होतो. तो चौक असल्यामुळे तेथे रिक्षा थांबल्या होत्या. इकडे तिकडे पाहण्यात गुंग असताना थोड्याशा समोर एक वयस्कर गृहस्थ अंदाजे वय ७५ च्या आसपास असलेला पाहण्यात आला. ते अगदी पूर्ण जोशमध्ये बिडी फुंकण्यात रम्य होते. मी माझ्या नेहमीच्या शैलीत न्याहाळू लागलो. तितक्यात त्यांच्या जवळील तरुण हसत म्हणाला, “काय बघत आहात? “मी पण उत्साहाने म्हणालो की, “हे काका खूप छान पद्धतीने बिडी ओढत आहेत.” लगेच मी त्या बिडी पिण्याऱ्या वृद्धाला म्हणालो की, “मी तुमचा फोटो काढू शकतो का?” तर त्यांनी अगदी हसत म्हटले की, “बिनधास्त काढ”.
लगेच मी खिशातून मोबाईल काढला आणि फोटो काढला. ते पण अगदी सुरेख पद्धतीने बिडी ओढून पोज देवू लागले. तीन ते चार फोटो घेतल्यानंतर माझा बोलका स्वभाव मला शांत बसू दिला नाही. मग मी माझ्या प्रश्नांचा भडिमार त्यांच्यावर केला. “बिडी पिता काही त्रास होत नाही का?” तर ते म्हटले की, “काही त्रास होत नाही. दिवसातून ३ ते ४ वेळा मी ओढतो. २० व्या वयापासून मला बिडी ओढण्याची सवय लागली.” मग माझा दुसरा प्रश्न त्यांना विचारला, “दारू सुद्धा घेता का?” तर त्यांनी म्हटले की, “दारू पीत नाही, दारूमुळे लिव्हर खराब होते आणि शरीर नुकसान करते.” त्यांना लगेच म्हटलो की, ” कोरोना चे वातावरण आहे, आणि तुम्ही मास्क घातला नाही भीती वाटत नाही का?” तर ते म्हणाले की, “घाबरायचे नाही, लोकांच्या जवळ जायचे नाही, जर काम असेल तर, मास्क घालूनच बोलायचे आणि बिनधास्त राहायचे जास्त त्राण घ्यायचा नाही. जेवायचे पोट भरून मी तर आठवड्यातून तीन वेळा चिकन, मटण खात असतो.” माझे प्रश्र्ने संपली होती आणि त्यांना सुद्धा कामाच्या ठिकाणी जायचे होते. त्यांनी म्हटले, “चला निघतो आमच्या कामाला, आपण भेटू परत.” ते रिक्षामध्ये बसले आणि जाताना रिक्षा चालू झाल्यानंतर हात बाहेर काढून माझा निरोप घेतला. शेजारील पान पट्टीवाला मुलगा म्हणाला की, “हे दररोज येथे येतात. ते रोड बनवण्याच्या कामात बिगारी म्हणून काम करतात.”
मित्र लांबून हा प्रसंग पाहत होता आणि तो पार्सल घेवून आला आणि आमची स्वारी घरी जाण्यासाठी निघाली. मित्राला माहीत होते की, हा फोटो काढत आहे म्हणजे नक्कीच लेख लिहिणार आहे. त्यामुळे त्याने जाताना म्हटला की, “लेख पूर्ण झाल्यावर पाठव.” त्याला त्याच्या घरी सोडून निघताना मनात प्रश्ने येऊ लागले. मी तर व्यसनांचा कट्टर विरोधक आहे तर आज जे पाहिले ते चकित करण्यासारखे होते. इतक्या वर्षांपासून तो वृध्द व्यक्ती बिडी पितो तरी तो अगदी धडधाकट कसा आहे? मला असे वाटते की, अजून पण जुन्या लोकांना व्यसने आहेत पण त्यांनी पहिल्यापासून शेतात किंवा इतर ठिकाणी राब राबून आपले शरीर तंदुरुस्त ठेवले आहेत. शरीराला कष्टाची आणि व्यायामाची जोड असेल तर ते शरीर आणि मन निरोगी तसेच आनंदी राहते. आपण सर्वजण मोठ मोठ्या पगाराची आणि व्यवसायातून किंवा इतर जोड धंद्यातून खूप पैसे मिळावे याच्या पाठीमागे पडलो आहोत. त्या वृध्द माणसाला जेमतेम पगार असेल आपले व कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तरी सुद्धा ते आनंदी जीवन व्यतीत करत आहेत.
आज त्या वृद्धाने जीवनातील शाळेत एक धडा शिकवला की, शरीराला जर कष्टाची जोड असेल तर माणूस निरोगी तसेच आनंदी जीवन १०० वर्षे जगू शकतो.
- लेखन – श्री. सनी चंद्रकांत कुंभार.
मुख्यसंपादक
Very Nice Article 👌👌👌
Very Nice Article 👌👌👌
Very nice
Nice 👍