Homeमुक्त- व्यासपीठएक कटिंग असाही…

एक कटिंग असाही…

सकाळी सकाळी मला फोन आला.
“नमस्कार. आपण भास्कर आपटे बोलताय का?”
“नमस्कार, मी भास्कर आपटे बोलतोय. आपण कोण बोलताय?”

“काका, तुम्ही सुरेश कामतांना ओळखता ना? मी त्यांचा मुलगा बोलतोय. “
” कोणाचा मुलगा?”
” सुरेश कामतांचा. बाबा म्हणाले की तुम्ही कॉलेजात असताना जिगरी दोस्त होतात. “
” हो. होतो आम्ही जिगरी दोस्त. पण आता त्याचे काय. आमची मैत्री मोडून पण चाळीस वर्षे झाली.आता आम्ही कित्येक वर्ष भेटलेलो सुद्धा नाही. “

” हो. बाबा नेहमी तुमच्या आठवणी सांगायचे. तुम्हाला कॉलेजचे जय वीरू म्हणायचे ना? “
सुरशाच्या मुलाचे पुढचे शब्द माझ्या कानावर पडत होते खरे पण मी पूर्णपणे भूतकाळात शिरलो होतो. एखादा सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये पहावा तसे माझे बालपण माझ्या नजरेसमोर येत होते.
मी आणि सुरेश काही दिवसांच्या फरकाने एकाच चाळीत जन्माला आलो. आमची मैत्री आधी झाली मग कधीतरी आम्ही चड्डीची नाडी बांधायला शिकलो. इतक्या लहानपणापासून आम्ही दोघे एकत्रच असायचो. एकमेकांशिवाय आमचे पान हलत नसे. कधी भांडलो तरी तेवढ्यापुरते. तासादोन तासाच्यावर आमचे भांडण टिकायचेच नाही.
आम्ही गेल्या जन्मी एकमेकांचे भाऊ असणार असे आमच्या आया म्हणायच्या. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही दोघे एकत्रच माझ्या आणि त्याच्या आजोळी राहायला जायचो. मी कामतांकडे मासे खायला शिकलो सुरेश आमच्याकडचे शाकाहारी जेवण मनापासून जेवायचा. अगदी पंचामृत, अळूच्या फतफद्यासकट सगळे पदार्थ तो आवडीने खायचा.
कॉलेजातही आमची मैत्री फेमस होती. आम्ही कॅंटीनमधला कटिंग चहा पण अर्धा अर्धा करून प्यायचो. चहा हा आमच्या दोघांचाही वीक पॉईंट..दिवसभरात दोघांचा मिळून दहाबारा कप चहा होत असे. गप्पा मारताना, अगदी मुलींकडे चोरून बघताना, अभ्यास करताना. आम्हाला चहा हवाच असायचा. आमच्या चहा पिण्याची थट्टा व्हायची. आम्ही दोघे नेहमी म्हणायचो आमची चहाची सवय आणि आमची मैत्री कधीच तुटणार नाही.

सगळे म्हणायचे दृष्ट लागण्यासारखी मैत्री आहे या दोघांची. खरच कोणाची दृष्ट लागली आमच्या मैत्रीला?

कॉलेजमधल्या आमच्या इतर मित्रांनी एकमेकांत आमच्यात भांडण लावून द्यायची पैज लावली होती. जो त्यात यशस्वी होईल त्याला दोन हजार रुपये इतरांनी मिळून द्यायचे असे ठरले होते.
आम्हाला दोघांना या प्लॅनची अजिबात कल्पना नव्हती.
आम्ही आमच्याच विश्वात मश्गुल असायचो. पण हळूहळू इतरांनी मिळून आमच्या मनात एकमेकांविषयी स्पर्धा निर्माण करण्यात यश मिळविले. कधी नव्हे ते आम्ही एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पहायला लागलो. आमचा शेवटच्या वर्षाचा रिझल्ट लागला. दरवर्षी मी पहिला यायचो आणि सुरेश दुसरा किंवा तिसरा असायचा. यावेळी पहिल्यांदाच माझा दुसरा नंबर आला आणि सुरेशचा पहिला..
माझा मूड आधीच खराब होता. त्यात इतर मित्रांनी मला सांगितले की सुरेशने कॉपी करुन पहिला नंबर मिळवला आणि मुलींवर पहिल्या नंबरचे इंप्रेशन मारत फिरतोय.
तेवढ्यात सुरेश व आमच्या वर्गातलीच एक मुलगी मला भेटायला कॅंटीनमधे आले . तो बिचारा स्वतःचा पहिला नंबर येऊनसुद्धा माझा पहिला नंबर आला नाही म्हणून अस्वस्थ झाला होता. पण मला काय झाले होते कोणास ठाऊक. मी त्याला वाट्टेल ते बोललो. त्या मुलीवरूनही त्याला बोलायला लागलो. तो सुरूवातीला शांत होता पण नंतर त्याचा ही संयम संपला. आम्ही खूप भांडलो. एकमेकांची उणीदुणी काढली. आणि पुन्हा एकमेकांचे तोंडही पहायचे नाही असे मनाशी पक्के करूनच घरी आलो. आमच्या घरच्यांनी आमची खूप समजूत काढायचा प्रयत्न केला. ज्या मित्रांनी पैज लावली त्यांनीही आमच्यात समेट घडवून आणायचा प्रयत्न केला. आम्ही दोघेही अडून बसलो. प्रेस्टीज इश्यू केला. पुढे मला नोकरी मिळाली. मी पुणे सोडून मुंबईत आलो. आमची जुनी चाळ पाडली. सगळी पांगापांग झाली.
आताशा कॉलेजच्या मित्रांची रियुनियन झाली. सुरेश तिथे असेल म्हणून मी जायचे टाळले. एकदा वाटले की आपण फोन करून सुरेशशी बोलावे. रियुनियनच्या निमित्ताने का होईना पुन्हा भेटावे. पण माझा इगो आड आला. इतकी वर्षे गेली तरी त्यानेही स्वतःहून कधीच फोन केला नाही. तो ही कॉलेजच्या व्हॉटसअॅप ग्रुप पासून दूरच राहिला. आणि आज अचानक हा त्याच्या मुलाचा फोन…
“काका ऐकताय ना? मला तुम्हाला भेटायचे आहे. आजच्या आजच. मी दुपारी येऊ का?” माझी तंद्री भंग पावली.
“का? तू का भेटणार आहेस. तुझ्या बाबांनी का फोन नाही केला. त्याला अजूनही माझ्याशी बोलायचे नाहीच ना? तू तरी कशाला येतोयस मग?”

“काका, प्लीज. मी आल्यावर सविस्तर बोलू. मला प्लीज थोडा वेळ तरी भेटा.”

मला त्याच्या बोलण्यातली कळकळ जाणवली. मी पण फारसे आढेवेढे न घेता त्याला भेटायला तयार झालो.
त्याला माझ्या घराचा पत्ता मेसेज केला. अर्ध्या तासात येतो असा त्याने उलटा मेसेज केला.

मी त्याची उत्सुकतेने वाट पहात होतो. अक्षरशः वीस मिनिटात माझ्या घराची बेल वाजली. मी दार उघडले तर माझ्या समोर जणू तरूणपणीचा सुरेशच उभा आहे असा भास मला झाला. सुरेशच्या मुलाला मी पहाताक्षणी ओळखले.
तो घरात येऊन बसला. गौतमीने माझ्या सुनेने आम्हाला कॉफी आणून दिली.
“काका तुम्ही चक्क कॉफी पिताय?” सुरेशच्या मुलाला आश्चर्याचा धक्काच बसला होता. “बाबा म्हणायचे की तुम्ही दोघे कॉफी पिणाऱ्यांची थट्टा करायचा आणि आपण जन्मात कधी चहा सोडून कॉफी पिणार नाही म्हणायचात.”
मी पुन्हा जुन्या आठवणीत रमणार होतो पण तेवढ्यात हा सुरेशचा मुलगा सुरेशचा उल्लेख भूतकाळात करतोय हे मला चांगलेच खटकले. मी न रहावून त्याला विचारलेच.” तुझे बाबा का नाही आले, अजूनही राग गेला नाही का? “
” तेच सांगायला आलोय काका.. मागच्या आठवड्यात बाबा गेले. “

” काय!!”
मला खूप मोठ्ठा धक्का बसला.
“असा कसा गेला. मला न भेटताच. शक्यच नाही. तू मला फसवतोयस. होय ना.”
“नाही काका. मी या बाबतीत कसा फसवीन?बाबांना जायच्या आधी तुम्हाला भेटायची आणि तुमच्याबरोबर चहा प्यायची खूप इच्छा होती पण तितका वेळच मिळाला नाही. त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला तोच खूप मॅसिव्ह होता. अर्ध्या तासात सारा कारभार आटोपला. काका उद्या बाबांचे दहावे आहे. तुम्ही याल? तुम्ही आला नाहीत. तिथे येऊन चहा प्यायला नाहीत तर बाबांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. काका याल ना? “

मी पुरता कोसळलो होतो. सुन्न झालो होतो. गौतमीने मला सावरले. तिनेच सुरेशच्या मुलाकडून त्यांचा पत्ता घेतला आणि मला तिथे घेऊन ती स्वतः किवा माझा मुलगा येईल असे सांगितले.
त्या दिवशी मी काय केले, काय खाल्ले याची मला शुद्धच नव्हती. सतत सुरेश डोळ्यासमोर दिसत होता. मी कितीही मनापासून त्याची माफी मागितली तरी त्याचा आता काहीही फायदा होणार नाही हे सत्य पचवणे मला अशक्य होत होते.
दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊन माझा मुलगा माझ्याबरोबर सुरेशकडे आला.सुरेशच्या बायकोला, गिरिजावहिनींना मी पहिल्यांदाच भेटलो. त्यांना देखील मी अगदी ओळखीचा वाटत होतो. माझ्याबद्दल सुरेश सतत भरभरून बोलायचा.
थोड्यावेळाने आम्ही गच्चीत गेलो. तिथे सुरेशची सून दोन चहाचे कप घेऊन आली. एक कप माझ्या हातात दिला आणि एक कठड्यावर माझ्यापासून थोडा लांब ठेवला.मी तिला एक कप चहा परत न्यायला सांगितले. पूर्वी प्यायचो तसा अर्धा अर्धा चहा आता आम्ही पिणार होतो. माझ्या चहातला अर्धा चहा एका बशीत ओतून मी गच्चीच्या कठड्यावर ठेवला आणि
मी मनातल्या मनात सुरेशशी बोलू लागलो. कित्येक वर्षांची कसर भरुन काढू बघत होतो.
“सुरशा, बघ मी आलोय तुला भेटायला.बरोब्बर एकोणचाळीस वर्षे सहा महिने बावीस दिवस झाले तुला भेटलो नाही. इतक्या वर्षात तुला माझ्याशी बोलावेसे वाटले नाही ना? माझ्यावर इतका रागावलास. मला मान्य आहे चूक माझीच होती. पण आता मी मनापासून तुझी माफी मागतोय. तुला माहिती आहे. त्या दिवसापासून आजपर्यंत मी चहा प्यायलो नाही. तुझ्याशिवाय चहा प्यायची कल्पनाच करवत नाही. आज मात्र तुझ्या सुनेच्या हातचा चहा आपण दोघे मिळून पिणार आहोत. . मला माहितीये तू आहेस इथेच कुठेतरी आसपास. तुझे शरीर इथे नसले तरी तुझा आत्मा इथेच आहे. तू ऐकतोयस ना? चल आज आपण पूर्वीसारखाच कटिंग पिऊया. “
असे म्हणून मी चहाचा कप तोंडाला लावला आणि भर्रकन एक कावळा आला आणि त्याने कठड्यावर ठेवलेल्या चहात चोच बुडवली.

समिधा ययाती गांधी
ता. क. – तुम्हाला एक माहितीय का माझ्या मुलाचे नाव सुरेश आहे आणि…..
आणि सुरेशच्या मुलाचे नाव… भास्कर आहे.)

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular