भाग-१.
स्त्री लंपट लेखकाय तो….
त्याला बाहेर ओढा.
त्याला पोलिसांच्या हवाली करा.
नाहीतर आम्ही बघून घेतो.
आमच्या ताब्यात द्या त्याला.
नालायक आमच्या आया बहिणींच्या इज्जतीशी खेळतो काय…?
आणि आमच्या देव देवतांची विटंबना आपल्या शब्दात मांडतो काय….
आज दाखवतोच साल्याला.
पुण्याच्या साहित्य सेवा मंडळाच्या ऑफिस मधील तो प्रचंड गलका पाहून भेदलेलं मंडळ गर्भगळीत झालं होतं.
बाहेर प्रचंड जमाव होता.
त्याच्या हातात दगड होते.
डोक्यात आग होती.
रक्त पेटलं होतं त्यांचं.
पोलिसांना गर्दी आवरत नव्हती तरीही आपल्या खात्याची नाचक्की नको म्हणून सगळे पोलीस प्राणपणाने कायदा आणि सुव्यवस्था राखायचा आटोकाट प्रयत्न करत होते.
वातावरण एकदम गंभीर.
प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर पुढे काय घडणार याची उत्सुकता होती.
भल्या मोठया रस्त्यावर उतरलेली माणसं पाहून पुण्यातल्या ट्रॅफिकचे ३/१३ वाजले होते.
सगळं पुणं जणू मंतरुन टाकल्यासारखं भारून गेलं होतं.
पण……..
इतक्या सगळ्यात तो मात्र सिगारेटचं थोटुक हातात घेऊन हसत होता.
तोंडातला धूर हवेत सोडून त्या धुरात काहीतरी शोधत असल्यासारखा अगदी गप्प गप्प.
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया…..
हर फिक्र को धुवे में उड़ाता चला गया.
त्याचं असं तोंडातल्या तोंडात गुणगुणत राहणं म्हणजे त्याचा माज होता, की वेडेपणाने करायला निघालेला आत्मघात होता ?
याला वेड तर लागलं नसेल ना…?
असं आतल्या लोकांना वाटायला लागलं.
वरून प्रेशर होतं म्हणून जिल्हाधिकारी स्वतः जातीने साहित्य मंडळाच्या ऑफिसमध्ये उपस्थित होते.
सगळे न्युज चैनेल्सवाले आपापले माईक सावरत कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करत होते.
नव्हे……..
ते एका माणसाची चड्डी उतरायला आले होते.
चड्डी…..
जी आपण लाज झाकण्यासाठी वापरतो ती.
टीआरपी म्हणजे भारतीय पत्रकारितेला लागलेला कलंक आहे हे कळण्याचं भान आजून इथल्या मीडियात आलेलं दिसत नाही.
स्वतःचा नागडेपणा लपवत दुसऱ्याच्या उघडेपणाला हिणवणं म्हणजे….
आरश्यासमोर उभा राहून मी शालीन असल्याचं ढोंग करणं.
मी नाही त्यातली अन कडी घाल आतली ही परंपरा आपण अजून किती वर्ष चालवणार आहोत काय माहीत.
तुम्ही आज इथे बघताय की कसा प्रचंड जनसमुदाय इथं लोटलेला आहे….
पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात ही घाण कशी वाढत चाललीय….
त्याने जगाचं ,किंबहुना साहित्याचं किती नुकसान होत चाललय.
याची इत्थंभूत माहिती आम्ही आज दिवसभर तुम्हाला देणार आहोत.
तेंव्हा बघत रहा कॅमेरामन स्वप्नील केळकरसह मी दीपाली …
न्यूज …..
एक सुंदर तरुणी माईक हातात धरून बोलत होती.
अरे ए हरामखोरा…..
बाहेर ये की.
तुला बघतोच आम्ही.
असं म्हणत तरुणांचा एक घोळका त्याला बाहेर येण्यासाठी उचकावत होता.
पण तो मात्र अतिशय शांतपणे साहित्य मंडळाच्या टेबलावर बसून ऐकत होता सारं…..
सालं…. आयुष्यभर ज्या प्रेक्षकांनी माझ्यावर उदंड प्रेम केलं त्यांनीच मला मारायची भाषा करावी?
माशाल्लाह…….
आपल्यावर, आपल्या लिखाणावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांच्या हातून मरण येणं किती भाग्याची गोष्ट आहे.
याच्यासारखा दुसरा सुंदर मृत्यू असूच शकत नाही.
कुणीतरी म्हटलंय…..
आपली किंमत तेंव्हाच कळते जेंव्हा आपल्या मयताला प्रचंड जनसमुदाय लोटलेला असतो.
आणि आज ते भाग्य मला लाभलंय.
किती भाग्यवान आहे ना मी.
इतका सुंदर मृत्यू कोण नाकारील बरं.?
त्याने कोपऱ्यात नजर वळवली.
कोपऱ्यात भेदरून उभ्या असलेल्या साहित्यिक मान्यवरांच्या वरून नजर फिरवली.
सगळ्यात भित्री जात साहित्यिकाची असते.
तो लिहितो छान छान….
पण तसा जगत नाही.
म्हणून प्रेक्षकांनी फक्त त्याच्या लिखाणावर प्रेम करावं.
त्याच्यावर नाही.
कारण जर का तो या मायाजाळात गुरफटला.
तर त्याची सुटका नाही.
कलाकाराला कोणी बांधून ठेवू शकत नाही. पण जरका त्याला बांधायचा प्रयत्न केला तर खूप दिवस डांबून ठेवलेल्या वासरासारखी अवस्था होते त्याची.
कानात वारं शिरलेल्या खोंडासारखा चौखूर उधळायला लागतो तो.
आशात त्याला आवरणं मुश्किल.
म्हणून त्याला मुक्त वाहू द्यावं.
त्याच्या मर्जी प्रमाणे जगू द्यावं.
कुलकर्णी……
अहो काय भिताय.?
साहित्यिकाला एक ना एक दिवस मृत्यू येणं ही साधी गोष्ट आहे…..
त्यानेही कधीतरी त्याच्या आयुष्याच्या पुस्तकाचा शेवट करावाच की….
लेखक गेला तरी त्याचं साहित्य जिवंत राहतं इतकी साधी गोष्ट तुम्हाला कळू नये कुलकर्णी.?
तो हसत सांगत होता पण…..
त्याचं असं स्पष्ट सांगणं आज कित्येक जणांना पचवणं मुश्किल जात होतं.
कुलकर्णी ……
आपलं लिखाण म्हणजे ना एक स्वतंत्र व्यवस्था असते. वादळी पर्व असतं ते.
छत्रपतींच्या तलवारीच्या धारेसारखी जरब साहित्यिकाच्या शब्दात असते हे विसरू नका.
याच लेखणीच्या जरबेवर बाबासाहेबांसारख्या कुशल माणसाने इंग्रजी सत्तेला आव्हान दिलं हेही विसरू नका.
आणि शब्द म्यान नाही वाहत ठेवायचे असतात.
जोपर्यंत कलाकारांच्या हृदयात असंतोष आहे …
तोपर्यंत आपली शाब्दिक युद्ध भडकू द्यावीत त्याने आपल्या साहित्यातून.
पण सर……
पण काय….?
भीती वाटते लोकांची?
तर सोडून द्यावं त्यानं लिखाण.
जे लिखाण क्रांती करू शकत नाही ते लिखाण भ्याड आहे असं मानतो मी.
इतक्यात कोणीतरी घामाघूम होत धावत आलं.
सर….
सर….
गर्दी इतकी उसळलीय की गेट तोडून लोकं आत यायला लागली आहेत.
निघायची वेळ आलीय तर….
तो गालातल्या गालात हसत म्हणाला.
सर मला भीती वाटायला लागलीय तुमचं काही बरं वाईट…..
खामोश…..
कलाकार कधी मरत नसतो पांडे.
त्याची कला आयुष्यभर या विश्वात भरून उरत वाहत असते.
मी ही असाच भरून उरेन.
इतक्यात आरोळ्या देत काही तरुण आत शिरले.
एकाने पूर्ण ताकदीने त्याच्याकडे दगड भिरकावला.
नागराजने फँड्रीत जसा सगळ्या व्यवस्थेवर भिरकावला होता ना..तस्सं.
फट्ट…….
रक्ताच्या चिळकांड्या खोलीभर उडाल्या…..
हातातली सिगारेट दूर उडून पडली.
सर…….
सगळे साहित्यिक त्याच्याकडे धावले.
सगळ्यांच्या डोळ्यात आसवं होती.
आणि मनात हतबलता.
आणि दूर कुठेतरी स्पीकरवर गाणं चालू होतं.
ईश्वर अल्लाह तेरो नाम….
सबको संमती दे भगवान.
राघूपती राघव राजाराम……
पतित पावन सीता राम.
संपलं……..
साहित्यिक सुर्यप्रकाशाइतका सत्य असतो.
त्याला काळोखाची भीती दाखवू नये वादळांनी.
कोण होता तो…?
क्रमशः…..
- दत्तात्रय श्रीकांत गुरव.
कोल्हापूर.
मुख्यसंपादक