Homeमाझा अधिकारग्रामपंचायत सदस्य अधिकार / कर्तव्य समजून घ्या, मगच निवडणूक लढवा

ग्रामपंचायत सदस्य अधिकार / कर्तव्य समजून घ्या, मगच निवडणूक लढवा

ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्यानंतर ग्रामपंचायतीच्या सदस्यांची भूमिका नगण्य असते, अशी काहींची विचारधारणा असते. अर्थात, ग्रामपंचायत सदस्य देखील त्यांची भूमिका पार पाडण्यात उदासीन असल्याचे दिसून येतात. काहींना आपल्या सदस्य पदाची नेमकी कर्तव्य, जबाबदारीं व भूमिका काय असते हे देखील माहीत नसते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूका संपुष्टात आल्या की, ग्रामपंचायत सदस्य हा फक्त त्याच्या पदाच्या नावापुरता मर्यादित राहतो. असे चित्र ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळते.

प्रत्यक्षात मात्र ग्रामपंचायतीचा सदस्य हा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांमधील अत्यंत महत्वाचा दुवा असतो. आपापल्या वॉर्ड (प्रभाग) मधील समस्या व विकासकामांची माहिती घेऊन ती ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामसभेत मांडणे व त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणे. ग्रामपंचायतीची मासिक सभा व ग्रामसभेत आपले विविध अधिकार गाजवणे अशी त्याची मुख्य भूमिका असते.

ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार कोणते ?

ग्रामपंचायतीची निवडणुक झाल्यावर निवडून आलेल्या सदस्यांपैकी एका सदस्याला सरपंच / उपसरपंच पदावर निवडून देण्यासाठी आपली मतं देणे हा प्राथमिक अधिकार ग्रामपंचायत सदस्याला असतो.

ग्रामपंचायत सदस्य अधिकार व कर्तव्य ?

• ग्रामपंचायतीकडून मासिक सभेची नोटीस, सभेपुर्वी किमान तीन दिवस अगोदर सदस्यांना प्राप्त करण्याचा अधिकार असतो.

• सभेची नोटीस मिळाल्यावर त्यातील विषयांचा अभ्यास करून त्यावर विधायक चर्चा घडवुन आणण्यास सहभागी होणे.

• जर मासिक सभा/बैठक सुरू होण्याच्या वेळेत आवश्यक गणपूर्ती (सरपंच/उपसरपंच समाविष्ट करून १/३ एवढी) पूर्ण झाली नसेल तर, पुढील ३० मिनिटांसाठी गणपूर्तीसाठी प्रतिक्षा केली जाते. त्या अवधीमध्ये गणपूर्ती पूर्ण नाही झाली तर अशी सभा तहकूब केली जाते व पुढील इतर नियोजित दिवशी घेतली जाते.

• विशेष मासिक सभेसाठी, ग्रामपंचायत सदस्य संख्येच्या निम्म्या किंवा त्याहून जास्त सदस्यांनी लेखी मागणी केल्यास, अशी मागणी केल्यापासून आठ दिवसांच्या आता सारपंचास विशेष सभा बोलवणे आवश्यक असते.

• सभेतील चर्चेमध्ये आवर्जून सहभाग घेऊन संबंधित विषयावर/ठरावांवर आपली मत मांडणी करण्याचा अधिकार ग्रामपंचायत सदस्यला असतो.

• सभेतील ठरावाच्या मंजुरीसाठी मत देणे कींवा मतावर तटस्थ राहणे.

• आवश्यक असल्यास ग्रामपंचायतीची कागदपत्रे पाहण्यासाठी/तपासणी करण्यासाठी मागणी करणे.

• ग्रामपंचायत मालमत्ता व निधी यांच्या गैरवापरास प्रतिबंध करणे, चुकीच्या कारभाराला विरोध करणे.

• ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या, पंचायतीच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या आणि पंचायतीच्या ठरावांची अंमलबजावणी पूर्णपणे न करणाऱ्या, पदाधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हा परिषद अध्यक्षाकडे किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार/अर्ज करणे.

• ग्रामपंचायतीचे कार्य करण्याची इच्छा राहिली नाही तर आपल्या सदस्यपदाचा राजीनामा देणे.

• सरपंचाने/उपसरपंचाने आपली कर्तव्ये व जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नाही तर त्याच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव पंचायतीत मंजूर करून घेऊन त्याला पदावरून काढून टाकणे.

ग्रामपंचायत सदस्यांची कर्तव्य/कार्य/कामे?
(ग्रामपंचायत सदस्यांची कर्तव्य/कार्य/कामे सामान्यत)

• ग्रामपंचायतीने वेळोवेळो सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे.

• ग्रामपंचायतीने बोलावलेल्या प्रत्येक मासिक सभा व ग्रामसभेत उपस्थित राहणे व सभेच्या कामकाजात भाग घेणे.

• सभेपुढे मांडावयाचे विषयाबाबत सरपंचांना पाच दिवस अगोदर लेखी पत्र देणे.

• सभा सुरू होण्यापूर्वी सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे व ती पूर्ण होईपर्यंत राहिली पाहिजे.

• आपल्या वॉर्ड मधील नागरिकांना ग्रामसभा बैठकीत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे.

• फक्त आपल्या वॉर्डच्या विकासकामांसाठी मर्यादित न राहता इतर वॉर्डच्याही सदस्यांसोबत समन्वय साधून गावातील प्रश्न सोडवण्यासाठी सहभागी होणे.

• वैयक्तिक लाभार्थी योजनांसाठी आपल्या वॉर्ड मधून योग्य व गरजू लाभार्थीची निवड होईल यासाठी ग्रामसभेमार्फत प्रयत्न करणे.

• ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा, दिवाबत्ती, रस्ते स्वच्छता इत्यादी सारख्या बाबी सुरळीत चालू राहतील याची खबरदारी घेणे.

• नागरिकांच्या समस्या व गरजा समजावून घेऊन त्यांवर ग्रामसभा बैठकीत चर्चा घडवून आणणे, त्यावर उपाययोजना सुचविणे.

• ग्रामसभा ठराव मंजूर करून घेण्यात भूमिका बजाविणे इत्यादी कार्ये ग्रामपंचायत सदस्यांची आहेत.

• गावातील महत्वाचे प्रश्न आणि समस्या सोडवणुकीसाठी ग्रामसभेला मार्गदर्शन करणे.

• ग्रामपंचायतीच्या कारभारावर व नोकरांवर देखरेख करणे.

• ग्रामपंचायतीचे उत्पन्न व ग्रामनिधी यांचा उपयोग योग्य तऱ्हेने होतो की नाही यावर लक्ष ठेवणे.

ग्रामपंचायतीमधील प्रत्येक कामकाजामध्ये ग्रामपंचायत सदस्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असतो.

आपण निवडून दिलेला ग्रामपंचायत सदस्य हे करतो का हे नीट पहा आणि तरच त्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रचंड बहुमताने निवडून द्या.

संदर्भ – सोशल मीडिया युवराज येडूरे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular