2 ऑक्टोबर रोजी आपल्या भुदरगड तालुक्यातील पांगीरे या गावाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.या गावात रोज सायंकाळी 6 ते 7.30या वेळेत टीव्ही,मोबाईल, इंटरनेट बंद ठेवण्याचा हा निर्णय खरंच कौतुकास्पद आहे.सर्वात आधी या गावाला धन्यवाद देतो. आधुनिकीकरणाच्या नावाखाली आज खेडोपाडी टीव्ही,मोबाईल, इंटरनेट यांनी शिरकाव केला आणि याच्या आहारी आपण कधी गेलो हे समजले नाही.भौतिक सुखाच्या आधीन होऊन आपण खरंच प्रगतशील झालो का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आज खेडोपाडी टीव्ही आणि मोबाईल नाही असे घर शोधून सापडणे मुश्किल झाले आहे.आणि या विळख्यात आम्ही अडकून गेलो आहोत.सध्या टीव्हीवर सुरू असणाऱ्या मालिका या आपला टीआरपी वाढवून घेण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन बनवत आहेत.या मालिकेतून घरामध्ये वाद कसे निर्माण होतील,तरूण पिढी कशी भरकटली जाईल याचे दर्शन होताना दिसत आहे,आणि या मालिका आपण सगळे एकत्र बसून बघत असतो.यातून काय साध्य होईल? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.पूर्वी मर्यादित चॅनेल होती.प्रपंच, किमयागार,गोट्या, आभाळमाया यासारख्या अनेक कौटुंबिक मालिका होत्या.एकत्र कुटुंबात एक सकारात्मक परिणाम होईल अश्या या मालिका बंद होऊन आज कौटुंबिक कलह निर्माण होतील अश्या मालिका निर्माण झाल्या.घरातील संवाद कमी झाला.लहान मुले टीव्ही मधील कार्टून सोबत बोलू लागली आहेत.त्यांना नातीगोती, शेजारीपाजारी या गोष्टीचा विसर पडला आहे.शेजारच्या घरात जाताना देखील ही आजची मुले अवघडलेली दिसत आहेत.हे असं होतंय याचा अर्थ आपल्या मुलांचा समाजाशी संबंध तुटत चालला आहे.ही बाब फार चिंताजनक आहे.
मोबाईल तर आपल्या मुलांच्या हातातील खेळणे झाले आहे.सोशल
मीडियामुळे जग जवळ आले आहे अस म्हणतात,पण माणसे एकमेकांपासून दूर होऊन एकलकोंडी झाली त्याच काय?गूगल,फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून एका क्लीकवर जगातील माहिती मिळू लागली.पण एक लक्ष्यात घ्या तिथे फक्त माहिती मिळते,ज्ञान मिळत नाही,माहिती आणि ज्ञान यामध्ये खूप फरक आहे.शेतामध्ये भात पेरणी कशी करावी असा प्रश्न तुम्ही गूगल वर टाकलात तर तुम्हाला माहिती मिळते पण तुम्हाला तुम्हाला भात पेरणीसाठी शेतातच जावे लागते आणि मेहनत करावी लागते.तुम्हाला शास्वत जगायचे असेल तर मेहनत करावीच लागेल.मग ते क्षेत्र कोणत्याही प्रकारचे असो.आपणा सर्वांना गूगल फक्त त्या विश्वात अडकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.एक उदाहरण म्हणून सांगतो.आज तुम्ही यूट्यूब वर अमिताभ बच्चन यांची गाणी सर्च केलात तर तुम्हाला अनेक गाणी पटपट येतात,तुम्ही त्यांना लाईक करता, उद्या सकाळी ज्यावेळी तुम्ही पुन्हा यूट्यूब सुरू करता त्यावेळी आपोआपच तुम्हाला अमिताभ बच्चन यांची गाणी दिसतात.तुमच्या एका सर्चवर गुगलच्या लक्षात येते की तुम्हाला काय आवडतंय, आणि तेच तेच तुम्हाला दाखवुन त्यातच तुम्हाला अडकून ठेवण्याचे काम गुगल करत असते.दरवर्षी गुगलला जितका नफा होतो त्यातील अर्ध्याहून अधिक रक्कम ही माणसांची मानसिकता सोशल मीडियावर कशी अडकून राहील यावर खर्च केली जाते.आणि हेच फार धोकादायक आहे.या सगळ्यातून बाहेर पडायचे असेल.आपल्या येणारी पिढीला या विळख्यातून बाहेर काढायचे असेल तर पांगीरे गावाने घेतलेला महत्वपूर्ण निर्णय सर्वत्र होणे गरजेचे आहे.
हे सगळं करत असताना पालक म्हणून आपण देखील आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणे गरजेचे आहे,त्यांच्याशी संवाद करणे गरजेचे आहे,त्यांचं ऐकून घेणे गरजेचे आहे.चांगले वाईट या गोष्टी समजून सांगणे हे आपले कर्त्यव्य आहे.आपली जबाबदारी आहे ती आपण पार पाडलीच पाहिजे.अजूनही आपल्या ग्रामीण भागात मुले आणि पालक यांचा संवादाचा अभाव दिसून येतो. संवाद साधला तरच विचारांची देवाणघेवाण होऊन अनेक गोष्टी निरसन होतात.टीव्हीवर कोणत्या मालिका बघायच्या,मोबाईल चा वापर किती आणि कसा करायचा,ही सुद्धा पालक म्हणून आपली जबाबदारी आहे.आणि सामजिक जबाबदारी म्हणून पांगीरे गावाने जो निर्णय घेतला आहे अश्या लोकहिताच्या निर्णयाचे कौतुक केले पाहिजे.आणि एक सामाजिक परिवर्तन म्हणून असे निर्णय सर्वच गावात घेतले जावेत यासाठी आपण सर्वांनी पुढे आले पाहिजे.
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वानी योग्य प्रकारे निर्णय घेतले तर आणि तरच आपल्या मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचा वटवृक्ष त्याना भविष्यात नक्कीच सावली देईल.
- – अंबादास देसाई, म्हसवे ( गारगोटी )
मुख्यसंपादक