प्रिय शौर्य,
बघता बघता आज तू दुसऱ्या वर्षात पर्दापण केला आहेस. आज २ वर्षांपासून काय काय घडले हे नजरेसमोर येत आहे. तुला जेव्हा सोनोग्राफी मध्ये पहिल्यांदा हालचाल व हृदयाचे ठोके आम्ही दोघांनी ऐकलो, तेव्हा जो आनंद झाला तो शब्दांत सांगता येणार नाही.
तू जेव्हा गर्भात होता त्यावेळी आम्ही दोघांनी लोणावळ्यात गर्भ संस्कार हा तीन दिवसांचा कोर्स केला होता. त्यात सांगितल्या प्रमाणे तुझी आई आणि मी संध्याकाळी पणती लावून प्रार्थना म्हणत असायचो. कोर्समध्ये शिकविलेल्या त्राटक प्रयोगावर (पणती लावून त्याच्याकडे एकटक पाहणे) माझा आणि तुझ्या आईचा पूर्ण विश्वास असल्यामुळे तो प्रयोग तुझी आई दररोज करत असे. त्याचा फायदा आम्ही सध्या अनुभवत आहोत.
गर्भसंस्कार शिबिरात गर्भात असताना करावयाचे संस्कार या बद्दल वैज्ञानिक माहिती आम्ही शिकलो आणि त्याप्रमाणे प्रयोग नित्य नियमाने करत राहिलो. त्यात गर्भात असणाऱ्या बालकाला पत्र लिहून त्याच्याशी आई आणि वडिलांनी साधावयाचे संभाषण आम्ही करत असायचो. त्या पत्रात आम्ही लिहिलेल्या प्रमाणे तू पूर्णपणे तसा बनला आहेस. त्यात मी सांगितल्याप्रमाणे तू शांत, नावाप्रमाणे शौर्य, धाडसी आणि हुशार बनला आहेस.
तुझ्या बाललिला आम्ही सुखदपणे अनुभवत आहोत. सकाळी तू झोपून उठल्यावर आई पप्पा म्हणून हाक ऐकताना खूप छान वाटते. तुला दररोज सकाळी फेरफटका मारायला, पाण्यात खेळायला, फक्त मराठी गाणे पाहायला आवडते हे खूप कौतुकास्पद वाटते. रात्री झोपताना पाणी..तहान…असे ४ ते ५ वेळा म्हणून माझ्याकडे येऊन थोडेसे पाणी पिऊन बाकीचे पाणी बेसिन मध्ये टाकून देतो हे पाहून आम्हाला खूप हसायला येते. सध्या कोरोनाची परिस्थितीत तू कधीही बाहेर जाताना स्वतःला मास्क लावायला लावतो व मला सुद्धा मास्क लावायला लावतो हे सुद्धा खूप कौतुकास्पद वाटते.
तुझी आई तुला खूप लाडकी आहे, रात्री झोपताना तिच्या कुशीत झोपतो. आणि जर मी तुझ्या अंगावर हात ठेवला तर तू ” हात काढा” असे सांगत असतो. यावरून आम्ही खूप हसत असतो. घरा समोर कुत्र्याला तू ” घरी जा” असे सांगत असतो. तुझ्या या सर्व लिला आम्ही आनंदाने पाहत असतो. कधी कधी तू त्रास देत असताना आई ओरडली तर तू प्रेमाने ” आई, आई” हाक मारत असतो. ते ऐकून तुझ्या आईचा राग पळून जातो. तू आम्हाला रात्री नेहमी ” भुत्या आला आहे” असे हात बाहेर करून सांगत असतो तेव्हा तुझे हावभाव पाहून आम्ही खूप हसतो.
पिल्लु तुझा आज वाढदिवस आहे. तुला चांगले आरोग्य तसेच आनंदमय जीवन मिळो ही सदिच्छा.
लेखन – श्री. सनी चंद्रकांत कुंभार.
फोटो – चि. शौर्य सनी कुंभार.
मुख्यसंपादक